शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंह बादल यांच्यावर अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात जीवघेणे आक्रमण करण्यात आले. या वेळी आजूबाजूला असलेल्या लोकांच्या सतर्कतेमुळे बादल यांचे प्राण वाचले. बादल हे सुवर्ण मंदिरामध्ये त्यांना मिळालेली धार्मिक शिक्षा भोगत आहेत. गोळीबार करणारा खलिस्तानी आतंकवादी नारायण सिंह चौरा हा बंदी घालण्यात आलेली खलिस्तानी आतंकवादी संघटना बब्बर खालसाचा सदस्य आहे. तो वर्ष १९८४ मध्ये पाकिस्तानात गेला. तेथून तो शस्त्रास्त्रांची तस्करी करत असे. आतंकवाद्यांना साहाय्य करण्यापासून अन्य कारवायांमध्ये त्याने कारावास भोगला आहे. सुखबीरसिंह यांच्यावरील जीवघेण्या आक्रमणावरून अनेक प्रश्न उपस्थित होतात. एक म्हणजे सुवर्ण मंदिरासारख्या ठिकाणी एखादा आतंकवादी मोकाटपणे कसा फिरतो आणि तो दिवसाढवळ्या एका धार्मिक स्थळी जाऊन आक्रमण कसे करू शकतो ? तेथे काही सुरक्षाव्यवस्था वगैरे आहे कि नाही ? समाजासाठी घातक असणार्या व्यक्ती किंवा संघटना यांच्या हालचालींवर सुरक्षाव्यवस्था लक्ष ठेवतात कि नाही ? दुसरे म्हणजे पंजाबसारख्या राज्यात राजकारणीच सुरक्षित नसतील, तर तेथे सामान्य जनता कशा स्थितीत रहात असेल ? याचा विचारही न केेलेला बरा. पंजाब पूर्वीप्रमाणेच आता खलिस्तानी आतंकवाद्यांमुळे धुमसू लागला आहे. येथे कळीचे सूत्र म्हणजे पंजाब सरकार सोडाच केंद्र सरकारही हा आतंकवाद नष्ट करण्यासाठी कठोर पावले उचलतांना दिसत नाही. काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये २ इमारतींच्या बाहेर स्फोट झाले होते, तसेच एका बंद असलेल्या पोलीस ठाण्याच्या बाहेरही स्फोट झाला होता. त्यासह एका पोलीस ठाण्याच्या बाहेर शक्तीशाली स्फोटके सापडली होती. एका कट्टरतावादी शिखाने बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. या सर्व घटनांवर पंजाबमध्ये खलिस्तानी आतंकवाद हाताबाहेर गेला आहे, हेच स्पष्ट होते.
खलिस्तानी आतंकवाद्यांचे पाकिस्तानशी साटेलोटे आहे. पंजाबमध्ये अमली पदार्थांचे जाळे विणून तेथील तरुणांना व्यसनी बनवण्याचे षड्यंत्रही या आतंकवाद्यांनी रचले आहे. पूर्वी खलिस्तानी आतंकवादी हे ‘खलिस्तान’ या स्वतंत्र देशाच्या मागणीसाठी आतंकवादी कारवाया करत होते. आता स्वतंत्र देशाची मागणी मागे राहिली असून त्यांच्या भारतविरोधी आणि हिंदुविरोधी कारवाया वाढल्या आहेत. कॅनडामध्ये खलिस्तानी समर्थक आंदोलने करतांना ‘मोदी यांना ठार मारा’ यांसारख्या घोषणा ऐकायला मिळतात. पंजाबमध्येही हिंदूंच्या नेत्यांवर जीवघेणी आक्रमणे झाली आहेत. यावरून खलिस्तानी आतंकवादी हा जिहादी आतंकवादाइतपत धोकादायक झाल्याचे आपल्याला दिसून येते. या आतंकवाद्यांना कॅनडा, पाकिस्तान, तसेच अन्य देशांमध्ये वास्तव्य करणारे खलिस्तानी आर्थिक साहाय्य करतात. या सर्व परिस्थितीचा आढावा घेता खलिस्तानी आतंकवाद्यांच्या विरोधात विदेशात आणि भारतात अशा दोन्ही ठिकाणी आक्रमक मोहीम राबवणे आवश्यक आहे. कॅनडामधील खलिस्तान्यांच्या कारवाया पहाता ‘तेथे सरकार किंवा प्रशासन नावाची काही गोष्ट शेष आहे का ?’, असा प्रश्न पडला आहे. भारतात १९९० च्या दशकात मोठ्या प्रमाणात बोकाळलेला जिहादी आतंकवाद रोखण्यासाठी त्याच वेळी तत्कालीन काँग्रेस सरकारने प्रयत्न केले नाहीत. त्याचा परिणाम भारताला अजूनही भोगावा लागत आहे. खलिस्तानी आतंकवादाचेही असेच झाले, तर त्याची विषारी फळे भारतातील अनेक पिढ्यांना भोगावी लागतील !
संपादकीय भूमिकाखलिस्तानी आतंकवाद आताच नष्ट केला नाही, तर त्याची विषारी फळे भारतातील अनेक पिढ्यांना भोगावी लागतील ! |