संपादकीय : बंगालमधील डॉक्‍टरांचा स्‍तुत्‍य निर्णय !

डॉ. शेखर बंडोपाध्‍याय

बांगलादेशातील हिंदूंवर सातत्‍याने होत असलेल्‍या आक्रमणांच्‍या निषेधार्थ बंगालमधील डॉक्‍टरांनी बांगलादेशी रुग्‍णांवर उपचार करण्‍यास नकार दिला आहे. बंगालमधील बालरोगतज्ञ डॉ. चंद्रनाथ अधिकारी यांनी असा निर्णय घेतला आहे. त्‍याही पुढे जाऊन डॉ. शेखर बंडोपाध्‍याय यांनी सिलीगुडी येथील त्‍यांच्‍या चिकित्‍सालयात तिरंगा ध्‍वज फडकवला आहे. ‘बांगलादेशी रुग्‍णांना उपचार करून हवे असतील, तर त्‍यांनी भारतीय राष्‍ट्रध्‍वजाला सलाम ठोकणे आवश्‍यक आहे’, या आशयाची सूचना डॉ. बंडोपाध्‍याय यांनी लिहिली आहे. डॉक्‍टरांसाठी रुग्‍णसेवा हे व्रत असते. हे तत्त्व अनेक डॉक्‍टर पाळतांना दिसतात. ‘रुग्‍णाची तपासणी करतांना तो शत्रू आहे कि मित्र आहे, हे पहायचे नसते’, असे डॉक्‍टरांना शिकवले जाते. ‘डॉक्‍टरांच्‍या अशा निर्णयामुळे द्वेष वाढेल, भारत-बांगलादेश यांच्‍यातील सौहार्द नात्‍यामध्‍ये दुरावा येईल’, असे फुकाचे सल्ले देऊन निधर्मीवाद्यांनी ऊर बडवल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही. बांगलादेश ज्‍या पद्धतीने हिंदू आणि भारत यांच्‍या विरोधात कारवाया करत आहे, त्‍याला सर्वच बाजूंनी विरोध होणे आवश्‍यक आहे. आतापर्यंत भारताचे शेजार्‍यांच्‍या संदर्भातील धोरण हे सहकार्याचे राहिले आहे. याचाच अपलाभ पाकिस्‍तान आणि बांगलादेश यांसारखे इस्‍लामी देश घेतांना दिसत आहेत. बांगलादेश व्‍यापार, उद्योग आदी बर्‍याच गोष्‍टींसाठी भारतावर अवलंबून आहे. मुळात बांगलादेशाच्‍या निर्मितीमध्‍ये भारताचा वाटा महत्त्वाचा आहे; मात्र तेथील उद्दाम शासनकर्ते आणि धर्मांध मुसलमान हे उपकार विसरले आहेत. ‘आम्‍ही भारत आणि हिंदू यांच्‍याशी कसेही वागलो, तरी भारत आम्‍हाला साहाय्‍य करणार’, या भ्रमात ते वावरत आहेत. हा भ्रमाचा भोपळा फोडण्‍याची वेळ आली आहे. वास्‍तविक या दृष्‍टीने भारत सरकारने कठोर पावले उचलणे आवश्‍यक होते; मात्र अशी कठोर पावले उचलली जात नसल्‍यामुळे आता जनता त्‍यांना जमेल त्‍या प्रकारे निषेध नोंदवत आहे. त्‍या दृष्‍टीकोनातून बंगालमधील डॉक्‍टरांनी घेतलेला निर्णय स्‍तुत्‍य आहे. या प्रकरणी डॉ. बंडोपाध्‍याय यांची प्रतिक्रिया बोलकी आहे. ‘बांगलादेशामध्‍ये भारताच्‍या राष्‍ट्रध्‍वजाचा अपमान होत असल्‍याचे पाहून मला वाईट वाटते. एक डॉक्‍टर म्‍हणून मला रुग्‍णांकडे दुर्लक्ष करायचे नाही; पण माझ्‍या देशात येणार्‍या लोकांनी माझ्‍या देशाच्‍या राष्‍ट्रध्‍वजाचा, माझ्‍या मातृभूमीचा आदर केला पाहिजे’, असे मला वाटते.

मागील काही दिवस बांगलादेश सरकारमधील मंत्र्यांची वक्‍तव्‍ये पाहिली, तर त्‍यांचा भारतद्वेष दिसून येतो. ‘बांगलादेशामध्‍ये हिंदू सुरक्षित आहेत’, असे तेथील सरकारने म्‍हटले आहे. त्‍यातही भारत दुटप्‍पी असून भारतातील अल्‍पसंख्‍य म्‍हणजे मुसलमानांवर मोठ्या प्रमाणात अत्‍याचार होत असल्‍याची टिमकी बांगलादेशाने वाजवली आहे. बांगलादेशाची ही वाढती आक्रमकता आणि उद्दामपणा भारतासाठी धोकादायक आहे. बांगलादेश आकाराने, तसेच अन्‍य गोष्‍टींतही भारतापेक्षा कैक पटींनी मागास आहे; मात्र तरीही तो भारताला सुनावतो, यावरून त्‍याला भारताचे भय राहिलेले नाही. अशांना वठणीवर आणण्‍यासाठी भारताने बांगलादेशावर कारवाई करावी. महासत्ता होण्‍याच्‍या दृष्‍टीने पावले उचलत असतांना भारताकडे कुणी डोळे वटारून पाहू नये, एवढी पत निर्माण करण्‍यासाठी भारताने आक्रमक भूमिका घेणे अपरिहार्य आहे.

भारताकडे कुणी डोळे वटारून पहाण्‍याचे धाडस करणार नाही, एवढी पत भारताने जगात निर्माण करणे आवश्‍यक !