पात्र-अपात्रतेच्या सूत्रांवरून वाद
पुणे – शहरातील नामवंत गोखले संस्थेच्या ‘राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र’ संस्थेचे कुलगुरु डॉ. अजित रानडे यांनी स्वत:चे त्यागपत्र (राजीनामा) संस्थेचे कुलपती डॉ. संजीव सन्याल यांना दिले आहे. डॉ. अजित रानडे यांच्या निवडीवरून पात्र-अपात्रतेचे सूत्र गाजत होते. त्याविषयीची न्यायालयीन प्रक्रियाही पूर्ण झाली होती. गोखले संस्थेच्या कुलगुरुपदी डॉ. अजित रानडे यांच्या निवडीवरून वाद निर्माण झाला होता. डॉ. रानडे यांच्याकडे या पदासाठी आवश्यक अशी पात्रता नसल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. त्यानुसार तत्कालीन कुलपती डॉ. विवेक देबराय यांनी ‘सत्यशोधन समिती’ नियुक्त करून समितीच्या शिफारशीनुसार डॉ. रानडे यांची नियुक्ती रहित करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाला डॉ. रानडे यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने डॉ. देबराय यांच्या निर्णयाला स्थगिती देत डॉ. रानडे यांचे कुलगुरुपद कायम ठेवले होते. आपण वैयक्तिक कारणास्तव त्यागपत्र देत आहोत. गोखले संस्थेचे अडीच वर्षे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याविषयी डॉ. रानडे यांनी कृतज्ञता व्यक्त करत त्यागपत्र दिले. माझी नेमणूक कोणत्याही पद्धतीने त्रुटी किंवा अपात्रता दर्शवत नाही, असेही त्यांनी त्यागपत्रामध्ये नमूद केले.