अन्न आणि औषध प्रशासनाकडून गोव्यात विविध ठिकाणी खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई
मडगाव, २९ ऑक्टोबर (वार्ता.) – सोमवार, २८ ऑक्टोबर या दिवशी मडगाव येथे अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करून खाद्यपदार्थांची विक्री करणार्यांवर कारवाई करण्यात येऊन अंदाजे ५६ सहस्र ४०० रुपयांचे खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले. मडगाव येथील कदंब बसस्थानकाचा परिसर आणि इतरत्र ही कारवाई करण्यात आली. मडगाव कदंब बसस्थानकावर अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करून २ पिशव्यांमध्ये भरून आणलेला ३८ सहस्र ४०० रुपये किमतीचा जवळजवळ १२ किलो खवा जप्त करण्यात आला आणि तो नष्ट करण्यात आला. त्याचप्रमाणे बसमधून आणण्यात आलेला १८ सहस्र रुपये किमतीचा १६ किलो आग्रा पेठा आणि ३० किलो बाँबे हलवा जप्त करण्यात आला. अन्न आणि औषधे प्रशासनाकडे आलेल्या तक्रारीवरून मालभाट, मडगाव येथील एक हॉटेल; मांडोप, नावेली येथील खाद्यपदार्थ सिद्ध करणारे एक केंद्र आणि कर्मशियल प्लाझा इमारतीमधील एक उपाहारगृह यांची पडताळणी करण्यात आली, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनाच्या संचालक श्वेता देसाई यांनी दिली आहे.
म्हापसा येथे रसायनाचा वापर करून पिकवण्यात आलेली ९ टन केळी जप्त
अन्न आणि औषधे प्रशासनाने म्हापसा येथील बाजाराच्या गोदामामध्ये एका केळीविक्रेत्याला केळी पिकवण्यासाठी रसायनाचा वापर करतांना रंगेहात पकडले. त्याच्याकडील ९ टन केळी जप्त करण्यात आली. या केळ्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी ती पालिकेच्या कह्यात देण्यात आली आहेत.
कळंगुट म्हापसा येथे ३ लाख रुपये किमतीचे काजू जप्त
कळंगुट येथे अन्न आणि औषध प्रशसनाच्या अधिकार्यांनी काजूपुरवठा करणार्या एका व्यक्तीच्या घरावर धाड घालून दुय्यम दर्जा असलेले सुमारे ३०० किलो काजू जप्त केले. या काजूंची अंदाजे किंमत ३ लाख रुपये आहे.