सांगली येथे भाजपमध्ये बंडखोरी !
सांगली, २८ ऑक्टोबर (वार्ता.) – विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी न दिल्यामुळे अप्रसन्न झालेले भाजपचे नेते शिवाजी उपाख्य पप्पू डोंगरे यांनी २८ ऑक्टोबर या दिवशी मोठे शक्तीप्रदर्शन करून अपक्ष म्हणून उमेदवारी आवेदन प्रविष्ट केले. डोंगरे यांनी बंडखोरी केल्याने त्याचा पहिला फटका भाजपला बसला आहे. डोंगरे हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. शिवाय त्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्षपद ही भूषवले आहे.
या मतदारसंघातून विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे; मात्र त्यांच्या उमेदवारीला शिवाजी डोंगरे यांनी विरोध दर्शवला आहे. पक्षाशिवाय निवडणूक लढणार, असा निश्चय त्यांनी माधवनगर येथे झालेल्या बैठकीत केला होता.
भाजपमध्ये बंडखोरी होऊ नये. नेत्यांमध्ये अप्रसन्नतेचे प्रमाण अधिक वाढू नये, यासाठी अनेक विद्यमान आमदारांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे; मात्र त्यांच्या उमेदवारीमुळे अप्रसन्नतेचे सूर उमटत आहेत. सांगली मतदारसंघातून शिवाजी डोंगरे हे इच्छुक होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला उमेदवारी देणार असा शब्द दिला होता, असा दावा त्यांनी केला होता, तसेच फलकही त्यांनी शहरात लावले होते. त्यामुळे शब्द देऊनही आपल्याला डावलले गेल्याचा आरोप डोंगरे यांनी केला आहे.
मला फसवले गेले आहे !पत्रकारांशी बोलतांना शिवाजी डोंगरे म्हणाले की, सुधीर गाडगीळ यांची उमेदवारी आपल्याला अमान्य आहे. यापूर्वी मी २ वेळा उमेदवारी आवेदन मागे घेतले होते. त्या वेळी वर्ष २०२४ मध्ये भाजपने मला पक्षाची उमेदवारी देतो, असे आश्वासन दिले होते. आता मला उमेदवारी न दिल्यामुळे शहरात वेगळे वातावरण आहे. मला फसवले गेले आहे. सामान्य माणसांमध्ये वेगळा उत्साह आहे. त्यामुळे मी अपक्ष म्हणून आवेदन प्रविष्ट केले आहे. लोकांमध्ये उत्साह आहे. मी येत्या २३ नोव्हेंबर या दिवशी १०० टक्के निवडून येणार आहे. मला सामान्य जनतेचा प्रतिसाद आहे. माझी टक्कर कुणाशी नाही. माझी निवडणूक सामान्य लोकांनी हातात घेतली आहे. सर्व जाती-धर्मातील लोक माझ्या पाठीशी १०० टक्के आहेत. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे. |