चारचाकी आणि दुचाकी यांची पडताळणी
नवी मुंबई – दीपावलीनिमित्त महापालिकेचे ठेकेदार अधिकारी आणि कर्मचारी यांना नेहमी भेटवस्तू देण्याची पद्धत पडली आहे; परंतु यंदाच्या वर्षी हे परंपरा खंडित करण्यात आली आहे. या संदर्भात वरिष्ठ अधिकार्यांनी दीपावलीनिमित्त पालिका मुख्यालयात भेटवस्तू देण्यास बंदी केली आहे. महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार यांचे, तसेच समाजातील काही राजकीय पदाधिकारी आणि समाजसेवक यांचे आर्थिक हितसंबंध असू शकतात. प्रेमापोटी दीपावली हा आनंदाचा सण असल्याने एकमेकांना भेटवस्तू देऊन आनंद द्विगुणीत करण्याची परंपरा आहे; परंतु गेल्या काही वर्षांमध्ये या परंपरेला काहीसे अयोग्य स्वरूप आले आहे.
दीपावलीच्या कालावधीत काही ठेकेदार अधिकारी आणि कर्मचारी यांना भेटवस्तू देण्याकरता नवी मुंबई पालिका मुख्यालयात दिवसभर गर्दी करत असल्याचे चित्र दिसू लागले. काही कर्मचारी ‘भेटवस्तू चुकू नये’ यासाठी दिवसभर कार्यालयातील खुर्चीही सोडत नव्हते. इतकेच काय, तर मागील वर्षी एक निवृत्त अधिकारी भेटवस्तू घेण्याकरिता चक्क मुख्यालयातील वाहनतळामध्ये गाडीमध्ये बसून होते आणि भेटवस्तू स्वीकारत होते. इतकेच नव्हे, तर एखाद्या ठेकेदाराने भेटवस्तू न दिल्यास त्याला चांगलेच ‘लक्षात’ ठेवले जात होते. काही ठेकेदारांना इच्छा नसतांनाही भेटवस्तू द्याव्या लागत होत्या. त्यामुळे यंदा थेट वरिष्ठ अधिकार्यांनीच अशा प्रकारे भेटवस्तू पालिका मुख्यालयात आणण्यास बंदी केल्याने काही ठेकेदारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर सर्व दुचाकी आणि चारचाकी कसून तपासल्या जात आहेत. तसेच कोणतीही भेटवस्तू मुख्यालयामध्ये नेऊन दिली जात नाही; परंतु त्यातही मुरलेल्या काही जणांनी यातून पळवाट शोधत भेटवस्तू थेट घरपोच करण्याचा सल्ला (कि तंबी ?) ठेकेदारांना दिला आहे, असे समजते.
संपादकीय भूमिका :अशी बंदी घालण्याची वेळ येते ? हीच गोष्ट ठेकेदार आणि अधिकारी यांच्यातील आर्थिक संबंध उघड करते ! |