नरकासुराचा वध म्हणून आनंदोत्सव !
आश्विन कृष्ण चतुर्दशीस ‘नरकचतुर्दशी’ म्हणतात. सर्वांना पिडणार्या नरकासुराचा भगवान श्रीकृष्णाने याच दिवशी संहार केला. म्हणून या तिथीला ‘नरकचतुर्दशी’ हे नाव पडले. मरतांना नरकासुराने भगवंताकडे वर मागितला, ‘माझा हा मृत्यूदिन सर्वत्र दिवे लावून साजरा व्हावा आणि या दिवशी जो मंगलस्नान करेल, त्याला नरकाची पीडा होऊ नये !’ श्रीकृष्णाने त्याला ‘तथास्तु’ म्हटले. तेव्हापासून श्रीकृष्णाचा विजयोत्सव आणि नरकासुराचा वध दिवे लावून साजरा केला जातो. नरकासुराचा वध झाल्याने या दिवशी सूर्योदयापूर्वी मंगलस्नान आणि दीप लावून आनंदोत्सव साजरा केला जाऊ लागला.
कारिट फोडणे आणि त्याचा रस चाखणे या कृती का करतात ?
नरकासुराच्या नि:पाताचे प्रतीक म्हणून या दिवशी कारिटाचे फळ चिरडतात आणि त्याचा रस जिभेला लावतात. नरकासुराची शेणमातीची प्रतिमा करून त्यावर घरादारातील कचरा टाकून जणू काही दुष्टप्रवृत्तीचा निषेध करतात !
घरात करायची धर्मकृत्ये !
या दिवशी घरातील देवांनाही पंचामृतस्नान आणि अभिषेक करून, अत्तर लावून उष्णोदकाने स्नान घालतात अन् देवपूजाही सूर्योदयाच्या आत करतात. गोड पक्वान्नाचा नैवेद्य दाखवतात. पणत्याही पहाटेच लावतात. सर्वत्र सुख, समृद्धी यावी म्हणून अंगणात दोन, तुळशीपुढे एक, पाण्याजवळ एक, देवाजवळ एक पणती लावतात. या दिवशी केरसुणी आणि मीठ यांचीही पूजा केली जाते; कारण हे दोन्ही लक्ष्मीचे अंश मानले जातात. ‘जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मी !’ म्हणून दिवाळीआधी स्वच्छता करून घर लख्ख करतात आणि लक्ष्मीपूजन करून लक्ष्मीला प्रसन्न करून घेतात.
या दिवशी काही वेळा अमावास्या येत असल्याने पितृतर्पणही केले जाते. एक दिवा पितरांसाठी लावला जातो. दुपारच्या जेवणाचे वेळी कावळा, गाय आणि कुत्रा यांना नैवेद्य अर्पण केला जातो.
आनंदाच्या उत्सावाचा आरंभ !
नरकचतुर्दशीला नवे कपडे घालून आप्तस्वकियांची गाठभेट घेतली जाते. फराळाला बोलावले जाते. पाहुणचार केला जातो. अलीकडे ‘दिवाळी पहाट’ या निमित्ताने सुरेल गाण्यांची मैफल रंगते. फटाके, आतषबाजी, रंग-रांगोळ्या, मिठाई, आनंद आणि थंडीची चाहूल या वातावरणामुळे दिवाळीची रंगत आणखीनच चढत जाते.
असा हा दिवाळीचा रंग, गंध, स्पर्श अनुभवूया आणि आपल्या आतील अन् बाहेरील नरकासुराच्या दुष्ट प्रवृत्तीला चिरडून टाकण्याचा प्रयत्न करूया; जेणेकरून प्रत्येक दिवस आनंदाचा, मांगल्याचा आणि चैतन्याचा साजरा करता येईल. नाही का ?
नरकासुरवध !
प्राग्ज्योतिषपूर नगरीचा राजा नरकासुर नावाचा राक्षस होता. त्याने त्याच्या सामर्थ्याने इंद्र, वरुण, अग्नि, वायू इत्यादी सर्व देवांना त्रास दिला. तो संतांनाही त्रास देऊ लागला. महिलांवर अत्याचार करू लागला, तसेच १६ सहस्र महिलांनाही कह्यात घेतले. जेव्हा त्याचे अत्याचार पुष्कळ वाढले, तेव्हा देव आणि ऋषी यांनी भगवान श्रीकृष्णाचा आश्रय घेतला. भगवान श्रीकृष्णाने त्यांना नरकासुरापासून मुक्त करण्याचे आश्वासन दिले; पण नरकासुराला एका स्त्रीच्या हातून मरण्याचा शाप मिळाला होता; म्हणून भगवान श्रीकृष्णाने त्याची पत्नी सत्यभामाला त्याचे सारथी बनवले आणि तिच्या साहाय्याने नरकासुराचा वध केला. अशा रितीने कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून देव आणि ऋषिमुनी यांना त्याच्या दहशतीतून मुक्त केले.या आनंदात लोक दुसर्या दिवशी म्हणजे कार्तिक महिन्यातील अमावास्येला आपापल्या घरी दिवे लावतात. तेव्हापासून ‘नरकचतुर्दशी’ आणि ‘दिवाळी’ हे सण साजरे होऊ लागले. – पूजा कारंडे-कदम (साभार : दैनिक ‘सकाळ’)
…म्हणून नरकासुर दहनाच्या नावाखाली होणारे उदात्तीकरण रोखा !
(साभार : दैनिक ‘लोकमत’)