भारतात दिवाळीचा सण हा पुष्कळ पूर्वीपासून साजरा केला जात आहे. ‘दीपोत्सव’ अशा सणाचे संदर्भ पुराणकथांमध्येही आढळून येतात, असे तज्ञांचे म्हणणे आहे. पेशवेकाळासह संतपरंपरेतही या सणाचे संदर्भ सापडतात.
वैदिक वाङ्मयात ‘अश्वायुजी’ किंवा ‘नवान्नपौर्णिमा’ या यज्ञांचा उल्लेख
वैदिक वाङ्मयात ‘अश्वायुजी’ किंवा ‘नवान्नपौर्णिमा’ या यज्ञांचा उल्लेख येतो. दिवाळी हा त्याच्या जवळ जाणारा सण आहे. जेव्हा शेतात नवीन धान्य येते, ‘कामसूत्र यक्षरात्री’ या नावाने कुबेरपूजेचा, म्हणजेच ‘लक्ष्मीपूजना’चा उल्लेख येतो. रामायण आणि महाभारत यांतही ‘दिवाळी’ या शब्दाचा उल्लेख नसला, तरीही त्याचे बीजरूप आहे, असे म्हणता येईल.
पुराणांमध्ये ‘दिवे कसे लावावेत ?’ याचा उल्लेख !
‘चतुर्वर्ग चिंतामणी’ किंवा ‘नीलमतपुराण’ या ग्रंथांत ‘दिवे कसे लावावेत ?’ याचे वर्णन येते. पाडव्याच्या बलीची कथा आहे, ज्यात वामनावतार आहे, त्या ‘बलीप्रतिपदे’चा उल्लेख पुराणात आलेला आहे.
अकराव्या शतकात मराठी भाषेत ‘दिवाळी’ शब्दाचा उल्लेख
‘दिवाळी’ या शब्दाचा स्पष्ट उल्लेख हा अकराव्या शतकानंतर मराठी भाषेच्या साहित्यात स्पष्ट दिसतो; पण त्याच्या आधी ‘दीपोत्सव’ असा उल्लेख आहे. याच काळात जे ‘लीळाचरीत्र’ लिहिले गेले, त्यात भाऊबीजेचे वर्णन येते.
पेशव्यांच्या काळात फटाके आणल्याचा उल्लेख !
शनिवारवाड्यात आता दीपोत्सवाच्या निमित्ताने जेवढे दिवे लावले जातात, त्याहीपेक्षा कितीतरी अधिक पट दिवे हे पेशवेकाळात लागत होते. त्या वेळची फटाक्यांची नावेही रंजक होती. चंद्रज्योती, निळे सिंगटी, फुलबाज्या अशी. ‘राजश्री पंत नाना स्वामींनी खेलावयास जिनस आतसबाजी आणले’, असा वर्ष १७४० मधील उल्लेख मिळतो, अशी माहिती इतिहासाचे अभ्यासक मंदार लवाटे यांनी दिली आहे.
सवाई माधवराव यांच्यासाठी पर्वतीवर ‘आतषबाजी’ केल्याचा उल्लेख !
महादजी शिंदे यांनी राजस्थानातील कोटा येथे होणार्या आतषबाजीचे वर्णन पुण्यात येऊन सांगितले. त्यानंतर ‘अशी मजा सवाई माधवराव पेशवे यांच्याही दृष्टीस पडावी’, अशी मागणी झाल्यावर पुण्यात ८ ते १० दिवस त्याची सिद्धता शिंदे यांनी केली. त्यानंतर शिंदे यांनी सवाई माधवराव यांच्यासाठी पर्वतीवर मोठ्या प्रमाणात आतषबाजी आयोजित केली होती. ‘ही आतषबाजी पहाण्यासाठी अनेक लोक संध्याकाळच्या वेळी पर्वती परिसरात बसले होते’, अशी माहिती इतिहासाचे अभ्यासक लवाटे यांनी दिली.
इंग्रजांच्या काळात आतषबाजी पहायला लोक तिकीट काढून येत !
१८ व्या शतकाच्या आधी लंडनच्या राजवाड्यात चार्ल्स टॉमस बॉक यांनी चालू केलेली शोभेच्या दारूकामाची प्रथा ७० वर्षे चालू राहिली होती. आरंभीच्या काळात शब्द आणि चित्रे अन् नंतर व्यक्तीचित्रे रेखाटणारे दारूकाम त्या काळात झाले. हे दारूकाम म्हणजेच फटाक्यांतून बनणार्या कलाकृती पहाण्यासाठी ८० सहस्रांपर्यंत प्रेक्षक तिकिटे काढत असत. (संदर्भ : मराठी विश्वकोश)
सैन्यात शोभेच्या दारूचा उपयोग !
एखादे क्षेत्र प्रकाशमान करण्यासाठी तेजस्वी प्रकाश आणि संदेशवहनासाठी सांकेतिक रंगीत प्रकाश किंवा धूर निर्माण करणे याचा सैन्य कामांसाठी उपयोग केला जात असे. रशियातील पहिल्या निकोलस राजाने ऑस्ट्रियन आघाडीवर वॉर्सापासून सेंट पीटर्सबर्गपर्यंत संदेशवहनासाठी शोभेच्या दारूकामाच्या २२० स्थानकांची प्रणाली उभारली होती. असा उल्लेख इतिहासात मिळतो.
विविध गटांमधील पूर्वनियोजित संकेतांसाठी प्रकाश उत्सर्जक आणि धूम्रकारी पदार्थ वापरून संदेशवहनासाठीही शोभेची दारू वापरण्याचे प्रयोग झाले. त्याचप्रमाणे युद्धकाळात विमान उतरवतांना धावपट्टी प्रकाशमान करण्यासाठी छत्रीयुक्त ज्योती, तर रणक्षेत्र उजळण्यासाठी चांदण्या निर्मिणारे गोळे वापरले जात असत. (संदर्भ : मराठी विश्वकोश)
भांडारकर इन्स्टिट्यूट आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर काम केलेल्या संस्कृत विषयातील प्राध्यापिका आणि वैदिक विषयात संशोधन करणार्या डॉ. सुचेता परांजपे यांनी दैनिक ‘सकाळ’शी या विषयाच्या संदर्भात संवाद साधला. त्या वेळी त्यांनी वरील माहिती दिली.
– श्रद्धा कोळेकर (साभार : दैनिक ‘सकाळ’)