कृती दलाच्या मते कला अकादमीच्या नूतनीकरणाची कामे निकृष्ट दर्जाची !

पणजी, २२ ऑक्टोबर (वार्ता.) – कला अकादमी कृती दलाचे अध्यक्ष विजय केंकरे यांनी कला अकादमीच्या इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामाच्या गुणवत्तेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली असून ‘या कामांना प्राथमिक उत्तीर्णता पूर्ण करण्याएवढेही गुण कृती दलाकडून मिळू शकत नाहीत मी समाधानी नाही. कामाची उत्तीर्णतेची टक्केवारीही देणार नाही’, असे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. १३ सदस्यांच्या विशेष कृती दलाची २२ ऑक्टोबरला पहिली बैठक झाली. कला अकादमीच्या दुरुस्तीच्या कामाचा सद्यःस्थितीचा आढावा घेणे आणि काम अजून चांगले होण्यासाठी सूचना करणे यांसाठी सरकारने कृती दल स्थापन केले आहे.

हे कृती दल १० नोव्हेंबर या दिवशी नूतनीकरण प्रकल्पात सहभागी असलेल्या सर्व कंत्राटदारांची बैठक घेईल. जे काही पालट केलेले आहेत, त्यांचा आढावा घेण्यात येईल आणि स्वतंत्र तज्ञांचे साहाय्य घेऊन काही कामे नव्याने करावी लागतील, असे कृती दलाने सांगितले. या पथकाने २१ ऑक्टोबर या दिवशी प्राथमिक स्वरूपात कला अकादमीच्या कामाची पहाणी केली. या वेळी उपस्थित असलेले समितीचे अध्यक्ष विजय केंकरे यांनी ‘कला अकादमीच्या कामामध्ये ध्वनी आणि वातानुकूलन यंत्रणा यांसंबंधी समस्या आहेत’, असे म्हटले होते.

संपादकीय भूमिका 

शासन संबंधितांवर कारवाई करणार का ?