बेस्ट बसमधील सूचनांतील व्याकरणाच्या चुका सुधारण्याचा खर्च उत्तरदायींकडून वसूल करा !

मुंबईला सतत धावत्या ठेवणार्‍या ‘बेस्ट’ बस

‘मुंबईला सतत धावत्या ठेवणार्‍या ‘बेस्ट’ (बृहन्मुंबई विद्युत् पुरवठा आणि परिवहन उपक्रम) बसगाड्यांमध्ये प्रवाशांना विविध प्रकारच्या सूचना देणार्‍या पाट्या असतात. या सूचनांमध्ये मराठी भाषेच्या संदर्भातील शुद्धलेखन आणि व्याकरण यांच्या अनेक चुका असल्याचे लक्षात आले आहे. या संदर्भात ‘बेस्ट’चे जनता संपर्क अधिकारी सुदास सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि ‘चुकांच्या संदर्भात आम्हाला सूचित केल्यास आम्ही वरील अधिकार्‍यांना त्याविषयी सांगू आणि त्यावर अवश्य विचार करू’, असे आश्वासन दिले. ‘हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने लवकरच त्यांना ‘बेस्ट’च्या बसगाड्यांमधील आणि संबंधित सूचनांमधील चुकांविषयीचे निवेदन देण्यात येणार आहे अन् त्या चुका सुधारण्याची विनंती करण्यात येणार आहे’, अशी माहिती ‘सुराज्य अभियाना’चे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे यांनी दिली.’ (१६.१०.२०२४)