कसबा पेठेतील रहिवाशांचा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय !

पुणे – येथील शनिवारवाडा आणि पाताळेश्वर मंदिराच्या १०० मीटर परिसरात कोणतेही बांधकाम करण्यास केंद्रशासनाने अटकाव केला आहे. परिसरातील असंख्य नागरिकांना याचा त्रास होत असून आमदार, खासदार आणि नगरसेवक याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे शहराचा विकास करतांना शासनकर्त्यांना कसबा पेठेच्या विकासाचा विसर पडल्याने आगामी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय कसबा पेठेत रहाणार्‍या नागरिकांनी घेतला आहे, असे ‘शनिवारवाडा कृती समिती’च्या अनुपमा मुजुमदार यांनी सांगितले.

कसबा पेठ आणि शनिवारवाडा परिसर दाट लोकवस्तीचा आहे. या परिसरात अनेक जुने वाडे असून यातील काही वाडे पडलेले आहेत, तर काही पडण्याच्या स्थितीत आहेत; मात्र सरकारच्या नियमांमुळे परिसरात बांधकाम करता येत नसल्याने या परिसराच्या विकासाला मर्यादा आल्या आहेत. प्रत्येक वेळी निवडणुकीच्या वेळी नुसतीच आश्वासने दिली जातात; मात्र निवडणुकीनंतरही हा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे ‘विकास नाही, तर मतदान नाही’ अशी भूमिका कृती समितीने घेतली आहे, असे मुजुमदार म्हणाल्या.