Baba Siddique Murder Case : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्‍या करणारे २ मारेकरी अटकेत !

  • एका आरोपीचे पलायन

  • आरोपींकडून २८ जिवंत काडतुसे जप्‍त

हत्या करण्यात आलेले माजी मंत्री बाबा सिद्दीकी व आरोपी

मुंबई – माजी मंत्री आणि राष्‍ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते बाबा सिद्दीकी (वय ६६ वर्षे) यांची १२ ऑक्‍टोबरला रात्री ९.३० वाजता गोळ्‍या घालून हत्‍या करण्‍यात आली. सिद्दीकी यांच्‍यावर ३ जणांनी गोळ्‍या घातल्‍या. पोलिसांनी करनैल सिंह आणि अन्‍य एक आरोपी यांना अटक केली आहे, तर आरोपी शिवानंद पळून गेला आहे. अटक करण्‍यात आलेला अन्‍य एक आरोपी हा अल्‍पवयीन असल्‍याचा त्‍याच्‍या अधिवक्‍त्‍यांचा दावा आहे. त्‍याच्‍या वयाची पडताळणी करण्‍यात येणार आहे. पळून गेलेल्‍या शिवानंद याला शेवटचे पनवेल येथे पहाण्‍यात आले. तो राज्‍याबाहेर गेल्‍याची शक्‍यता वर्तवण्‍यात येत आहे. त्‍याला शोधण्‍यासाठी उज्‍जैन (मध्‍यप्रदेश), हरियाणा, उत्तरप्रदेश, देहली येथे गुन्‍हे शाखेची पथके गेली आहेत. करनैल सिंह हा हरियाणा, तर कथित अल्‍पवयीन आरोपी हा उत्तरप्रदेश येथील रहिवासी आहे. या आरोपींकडून २८ जिवंत काडतुसे जप्‍त करण्‍यात आली आहेत.

गुन्‍हे शाखेच्‍या पोलिसांनी आरोपींना न्‍यायालयात उपस्‍थित करण्‍यात आले होते. सरकारी अधिवक्‍ते आणि आरोपीचे अधिवक्‍ते यांच्‍यात युक्‍तीवाद झाला. दोन्‍ही बाजूंच्‍या अधिवक्‍त्‍यांचा युक्‍तीवाद ऐकल्‍यानंतर न्‍यायालयाने आरोपी गुरुनैल सिंग याला २१ ऑक्‍टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

कसा झाला गोळीबार ?

बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आमदार झिशान सिद्दीकी यांच्‍या वांद्रे कार्यालयाच्‍या येथे सिद्दीकी यांच्‍यावर गोळ्‍या झाडण्‍यात आल्‍या. गोळीबारानंतर सिद्दीकी यांना तात्‍काळ लीलावती रुग्‍णालयात नेण्‍यात आले; मात्र पोटात आणि छातीत गोळ्‍या लागल्‍यामुळे मोठ्या प्रमाणात रक्‍तस्राव होऊन त्‍यांचा मृत्‍यू झाला. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिद्दीकी यांच्‍या मृत्‍यूविषयी दुःख व्‍यक्‍त करून त्‍यांच्‍यावर शासकीय सन्‍मानाने अंत्‍यसंस्‍कार करण्‍याचा आदेश दिला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचे सखोल अन्‍वेषण केले जात असल्‍याचे म्‍हटले आहे.

लॉरेन्‍स बिश्‍नोई गँगगे हत्‍येचे दायित्‍व स्‍वीकारले !

काही माहिन्‍यांपूर्वी सलमान खान याच्‍या घरावर गोळीबार करण्‍यात आला होता. या प्रकरणी बिश्‍नोई गँगचा सदस्‍य अनुज थापन याला पोलिसांनी अटक केली होती. त्‍याचा पोलीस कोठडीत मृत्‍यू झाला. अनुज याच्‍या मृत्‍यूला बाबा सिद्दीकी उत्तरदारी होता, तसेच बाबा सिद्दीकी याचे सलमान खान आणि दाऊद इब्राहिम यांच्‍याशी संबंध असल्‍यामुळे त्‍यांची हत्‍या केली, असे ‘एक्‍स’वरील संदेशात म्‍हटले आहे. या संदेशात तथ्‍य आहे का ?, याची पडताळणी पोलीस करत आहेत.

वरील घटनेनंतर मलबार हिल परिसरातील मंत्र्यांच्‍या बंगल्‍याच्‍या सुरक्षेत वाढ करण्‍यात आली आहे. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्‍ही उपमुख्‍यमंत्र्यांच्‍या बंगल्‍याच्‍या ठिकाणची सुरक्षा वाढवण्‍यात आली आहे. मलबार हिल परिसरातील अतीमहत्त्वाच्‍या ठिकाणी नाकाबंदी करण्‍याच्‍या वरिष्‍ठ पोलीस अधिकार्‍यांकडून सूचना देण्‍यात आल्‍या आहेत.