मंगळुरू येथे पहिल्‍यांदाच ६ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्‍त

मंगळुरू (कर्नाटक) – अनुमाने ६ कोटी रुपये किमतीचे ६ किलोग्रॅमपेक्षा अधिक ‘एम्.डी.एम्.ए.’ हे अमली पदार्थ पोलिसांनी जप्‍त करून या प्रकरणी नायजेरियाच्‍या एका नागरिकाला अटक केली. इतक्‍या मोठ्या मूल्‍याचे अमली पदार्थ मंगळुरू शहरातून जप्‍त करण्‍याचीही आतापर्यंतची पहिलीच घटना असल्‍याचे पोलिसांनी सांगितले.

एक आठवड्यापूर्वी हैदर अली नावाच्‍या व्‍यक्‍तीला कह्यात घेतले होते आणि त्‍याच्‍याकडून १५ ग्रॅम एम्.डी.एम्.ए. जप्‍त करण्‍यात आले होते. त्‍याची सखोल चौकशी केल्‍यानंतर या काळ्‍या धंद्याची माहिती समोर आली. नायजेरियाचा नागरिक गेली अनेक वर्षे मंगळुरूमध्‍ये राहत होता. त्‍याच्‍या व्‍हिसाची मुदत २ वर्षांपूर्वीच संपली होती. (झोपलेले प्रशासन आणि सुरक्षायंत्रणा ! असे किती विदेशी भारतात बेकायदेशीरित्‍या राहून गुन्‍हेगारी आणि भारतविरोधी कृत्‍य करत असतील याची कल्‍पनाच करता येत नाही ! – संपादक) त्‍याच्‍याकडून ३५ डेबिट कार्ड, १७ निष्‍क्रीय सिम कार्ड आणि बँक पासबुक जप्‍त करण्‍यात आले आहे. त्‍याचे कुटुंबही येथे रहात असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.