Marathi Language :  मराठीसह ५ भाषांना अभिजात भाषेचा दर्जा

मुंबई – मराठीसह पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांना केंद्रीय सांस्‍कृतिक विभागाकडून अभिजात भाषेचा दर्जा देण्‍यात आला आहे. ३ ऑक्‍टोबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या केंद्रीय मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत केंद्रीय मंत्री श्री. अश्‍विनी वैष्‍णव यांनी याविषयीची घोषणा केली. केंद्रशासनाच्‍या या निर्णयाविषयी महाराष्‍ट्र शासन आणि सर्व मराठीप्रेमी यांनी आनंद व्‍यक्‍त केला आहे.
महाराष्‍ट्र शासनाने वर्ष २०१३ मध्‍ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी केंद्रशासनाकडे प्रस्‍ताव आणि त्‍याविषयीचा अहवाल पाठवला होता. तेव्‍हापासून महाराष्‍ट्र शासनाकडून याविषयी पाठपुरावा चालू होता. पाठपुराव्‍यासाठी महाराष्‍ट्र शासनाने फेब्रुवारी २०२४ मध्‍ये समितीही स्‍थापन केली होती. यापूर्वी तमिळ, संस्‍कृत, मल्‍ल्‍याळम्, तेलुुगु, कन्‍नड आणि ओडिया या ६ भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्‍यात आला आहे.

मराठी भाषा ‘अभिजात’ असल्‍याचा अभ्‍यास करण्‍यासाठी वर्ष २०१२ मध्‍ये साहित्‍यिक रंगनाथ पठारे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली समिती स्‍थापन करण्‍यात आली होती. वर्ष २०१३ मध्‍ये समितीने याविषयीचा अहवाल महाराष्‍ट्र शासनाला सादर केला. वर्ष २०१३ मध्‍ये तो केंद्रीय सांस्‍कृतिक मंत्रालयात पाठवण्‍यात आला होता.

अभिजात दर्जा प्राप्‍त झालेला दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्‍हणून साजरा केला जाणार ! – मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा !

एकनाथ शिंदे

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्‍त झालेला दिवस मराठी भाषा आणि मराठीप्रेमी यांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा, असा ऐतिहासिक आहे. जगात विविध देशांमध्‍ये वास्‍तव्‍य करूनही तिथे मराठी भाषा, सण-उत्‍सव जोपासणार्‍यांसाठीही हा दिवस गौरवाचा आणि अभिमानाचा आहे, अशी भावना व्‍यक्‍त करून मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्‍त झालेला ‘घटस्‍थापनेचा दिवस’ (३ ऑक्‍टोबर) हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्‍हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आग्रह होता. त्‍यांच्‍यासाठी हा निर्णय म्‍हणजे ‘स्‍वप्‍नपूर्ती’ आहे. निती आयोगाच्‍या बैठकीत ‘मराठीला अभिजात दर्जा द्यावा’, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍याकडे मी मागणी केली होती. या निर्णयामुळे आपल्‍या प्रदीर्घ लढ्याला यश मिळाले आहे. मराठी माणसांच्‍या जिव्‍हाळ्‍याचा हा निर्णय आदिशक्‍तीच्‍या नवरात्रोत्‍सवाच्‍या पहिल्‍याच दिवशी घेतला गेल्‍याने दुग्‍धशर्करा योग जुळून आला आहे. मराठी भाषा प्रगल्‍भ आहेच. आता तिचा प्रचार, प्रसार आणखी जोमाने करता येईल. मराठी भाषा आपल्‍या संतांनी जतन केली आणि वाढवली. तिचा आपण व्‍यवहारात आवर्जून उपयोग केला पाहिजे, अशी भावना एकनाथ शिंदे यांनी व्‍यक्‍त केली.

 मराठी भाषेचे आध्‍यात्मिक महत्त्व !


संस्‍कृत ही देवांची भाषा असल्‍याने ती सर्व भाषांत अधिक सात्त्विक आहे. मराठी भाषेची मातृभाषा संस्‍कृत आणि लिपी ही देवनागरी असल्‍यामुळे संस्‍कृतच्‍या खालोखाल मराठी भाषा सात्त्विक आहे. संस्‍कृतमधील अक्षरे ही निर्गुणाशी, तर मराठीतील अक्षरे ही सगुण ब्रह्माशी संबंधित आहेत. सामवेदाची गेयात्‍मता मराठी भाषेत दडलेली असल्‍याने ती नितांत सुंदर आणि मनाला निर्मळ आनंद देणारी आहे. मराठी आध्‍यात्मिक प्रगल्‍भता  असल्‍याने तिच्‍या उच्‍चारणाने बुद्धी सत्त्वशील बनत जाते. मराठी अक्षरांतून शांती, चैतन्‍य आणि शक्‍ती यांची स्‍पंदने प्रक्षेपित होत असतात.

(संदर्भ : सनातनचे भाषाविषयक ग्रंथ)
चैतन्‍यमय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्‍याने मराठीचे आदान-प्रदान वाढण्‍यास साहाय्‍य होऊन पुढील पिढीला हा चैतन्‍यदायी वारसा मिळेल !

मराठी भाषेच्‍या भारताच्‍या इतिहासातील समृद्ध सांस्‍कृतिक योगदानाचा हा गौरव ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

नरेंद्र मोदी

मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे. या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्‍याविषयी अभिनंदन. हा सन्‍मान म्‍हणजे मराठी भाषेने आपल्‍या देशाच्‍या इतिहासात दिलेल्‍या समृद्ध सांस्‍कृतिक योगदानाचा गौरवच आहे. मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्‍तंभ राहिली आहे. मला निश्‍चिती आहे की, अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्‍याने ही भाषा शिकण्‍यासाठी असंख्‍य लोकांना प्रेरणा मिळेल.

अभिजात भाषेच्‍या दर्जासाठीचे काही प्रमुख निकष !

सातवाहनकालीन नाणेघाटातील शिलालेख

१. भाषा १ सहस्र ५०० ते २ सहस्र वर्षे इतकी प्राचीन असावी.

२. भाषेतील साहित्‍यही तेवढेच प्राचीन असावे.

३. भाषा स्‍वयंभू असावी. कुणा भाषेची उपभाषा असू नये.

अभिजात भाषेच्‍या दर्जामुळे मराठीला कोणता लाभ होईल ?

१. भारतातील सर्व ४५० विद्यापिठांमध्‍ये मराठी शिकवण्‍याची सुविधा केली जाईल.

२. प्राचीन मराठी ग्रंथांचे अन्‍य भाषांमध्‍ये अनुवादीत करण्‍यासाठी प्रोत्‍साहन मिळेल.

३. महाराष्‍ट्रातील सर्व १२ सहस्र ग्रंथांलयांत विविध साहित्‍य प्रकारांतील मराठी ग्रंथसंपदा वाढवण्‍यात येईल.

४. मराठीच्‍या उत्‍कर्षासाठी काम करणार्‍या संस्‍था, व्‍यक्‍ती, विद्यार्थी यांना प्रोत्‍साहनपर साहाय्‍य केले जाईल.

५. अभिजात भाषेच्‍या अभ्‍यासाकरता देशपातळीवर स्‍वतंत्र केंद्राची (सेंटर ऑफ एक्‍सलंन्‍स फॉर स्‍टडिज्) निर्मिती होईल.

६. प्रत्‍येक विद्यापिठातही अभिजात भाषेसाठी एक अध्‍यासन केंद्र स्‍थापन केले जाईल.

मान्‍यवरांच्‍या प्रतिक्रिया

मराठी भाषेचा सन्‍मान प्रत्‍येकाला सुखावणारा ! – सी.पी. राधाकृष्‍णन्, राज्‍यपाल

संत ज्ञानेश्‍वर माऊली, संत चक्रधरस्‍वामी, जगद़्‍गुरु संत तुकाराम यांसह महाराष्‍ट्रातील अनेक संत आणि समाजसुधारक यांची भाषा असलेल्‍या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्‍यामुळे तिचा सन्‍मान झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्‍मा फुले, क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले, लोकमान्‍य टिळक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसह सर्वांच्‍या लाडक्‍या मराठी भाषेचा सन्‍मान प्रत्‍येकाला सुखावणारा आहे.

मराठीचा गौरवशाली इतिहास जगभरात पोचेल ! – अजित पवार, उपमुख्‍यमंत्री

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्‍याचा निर्णय ऐतिहासिक आहे. या निर्णयामुळेे जगभरातील मराठी भाषिक आनंदित झाले आहेत. यामुळे मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, समृद्ध सांस्‍कृतिक वैभव जगभर पोचेल. मराठी ज्ञानभाषा आणि अर्थार्जनाची भाषा होण्‍यास साहाय्‍य होईल.

मराठी भाषेचा समृद्ध वारसा जपण्‍याचे हे महत्त्वाचे पाऊल ठरेल ! – दीपक केसरकर, मराठी भाषामंत्री

मराठी भाषामंत्री या नात्‍याने सातत्‍यपूर्ण पाठपुरावा केल्‍याचे फलित मिळाले. प्रत्‍येक मराठी माणसासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. आपल्‍या भाषेची समृद्ध वारसा जपण्‍यास हे महत्त्वाचे पाऊल ठरेल.

मराठीच्‍या सर्वांगीण विकासासाठी मराठीला जागतिक दर्जाची भाषा करण्‍याचा आपला प्रयत्न असला पाहिजे ! – राज ठाकरे, अध्‍यक्ष, मनसे

प्रत्‍येक माणूस जन्‍माला आल्‍यावर त्‍याची भाषा निश्‍चित होते. मराठी भाषा ही आपली ओळख आणि अस्‍मिता आहे. या भाषेला ज्ञानाची, व्‍यापारउदीमाची आणि जागतिक विचारांची भाषा करण्‍यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. जगाकडे बघण्‍याची आपली चौकटही ‘मराठी’ असली पाहिजे, ही माझी आणि माझ्‍या पक्षाची इच्‍छा आणि हेच आमचे अंतिम ध्‍येय आहे.

आपली भाषा ही पराक्रमाची आणि सर्वोत्तम साहित्‍याची भाषा आहे. ‘अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळू नये ?’, हे मनसेचे सूत्र होते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी आम्‍ही वेळोवेळी पाठपुरावा केला. १२ वर्षांच्‍या दीर्घ प्रतीक्षेनंतर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, हाच माझ्‍यासाठी आणि माझ्‍या पक्षासाठी आनंदाचा क्षण आहे.

मराठी भाषा प्राचीन असल्‍याचा कुठला पुरावा दिला ?

नाणेघाट

मराठी भाषेची प्राचीनता सिद्ध करण्‍यासाठी ‘सातवाहनकालीन नाणेघाटातील शिलालेखा’चा पुरावा देण्‍यात आला. नाणेघाट परिसरात असलेल्‍या लेण्‍यांमध्‍ये सातवाहन राजवंशाविषयी (इ.स.पूर्व २००) माहिती देणारे अनेक शिलालेख आहेत. या शिलालेखात वापरण्‍यात आलेली भाषा ‘महाराष्‍ट्री प्राकृत’ असून लेखाची लिपी ब्राह्मी आहे.   आजच्‍या मराठीचा इतिहास हा किमान २ सहस्र वर्षांहून अधिक जुना असला, तरी आजच्‍या मराठीशी साधर्म्‍य दर्शविणारे अभिलेख ७ व्‍या शतकापासून अस्‍तित्‍वात असल्‍याचे पुरावे आहेत. आजच्‍या कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील बाहुबली किंवा गोमटेश्‍वराच्‍या पायापाशी असणारा १११६ मधील ‘आक्षीचा शिलालेख’ मराठी भाषेतील ज्ञात असलेला सर्वांत प्राचीन शिलालेख असल्‍याचे मानले जाते.