पुणे – एका ज्येष्ठ नागरिकाला मोहजाळात (हनी ट्रॅप) अडकवण्यात आले होते. त्याच्याकडून खंडणी वसूल केली. या प्रकरणी पुणे पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ उभे याला पोलीसदलातून बडतर्फ करण्याचा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. (‘हनी ट्रॅप’ लावून नागरिकांना लुटणार्या टोळ्यांना शोधून काढून संबंधित सर्वांवरच कठोर कारवाई व्हायला हवी ! – संपादक)
कोथरूड भागातील एका ज्येष्ठ नागरिकाला एका महिलेने प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. लक्ष्मी रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये नेऊन त्याच्यावर बलात्काराचा खोटा आरोप केला. धमकी देऊन ५ लाख रुपये वसूल केले. या प्रकरणामध्ये पोलीस उपनिरीक्षक उभे आणि ३ महिला यांनी साहाय्य केले होते. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात ३० जुलै या दिवशी गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हा नोंद होताच उभे याला पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्याचे अन्वेषण केल्यानंतर काशिनाथ उभे हा दोषी आढळून आल्यानंतर बडतर्फ करण्याचे आदेश देण्यात आले.
संपादकीय भूमिका :नागरिकाला लुबाडणारे पोलीस खात्यासाठी कलंकच ! |