Supreme Court : देशाच्‍या कोणत्‍याही भागाला पाकिस्‍तान म्‍हणता येणार नाही ! – सर्वोच्‍च न्‍यायालय

सर्वाेच्च न्‍यायालय

नवी देहली – तुम्‍ही देशाच्‍या कोणत्‍याही भागाला पाकिस्‍तान म्‍हणू शकत नाही. हे देशाच्‍या एकात्‍मतेच्‍या मूलभूत तत्त्वाच्‍या विरोधात आहे, असा आदेश सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी न्‍यायमूर्तींना दिला. कर्नाटक उच्‍च न्‍यायालयाचे न्‍यायमूर्ती व्‍ही. श्रीशानंद यांनी एका प्रकरणाच्‍या सुनावणीच्‍या वेळी बेंगळुरू येथील एका मुसलमानबहुल भागाला पाकिस्‍तान म्‍हटले होते. याची सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्‍वतःहून नोंद घेत यावर सुनावणी केली. त्‍या वेळी सरन्‍यायाधीश चंद्रचूड यांनी वरील आदेश दिला. या प्रकरणी न्‍यायमूर्ती श्रीशानंद यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयाची क्षमा मागितल्‍यावर ही सुनावणी बंद करण्‍यात आली. तसेच श्रीशानंद यांच्‍या विधानाचा व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांतून प्रसारित झाल्‍यावर उच्‍च न्‍यायालयाच्‍या कामकाजाचे थेट प्रक्षेपण थांबवले होते. तेही आता चालू करण्‍याची अनुमती न्‍यायालयाने दिली.

सरन्‍यायाधीश म्‍हणाले की,

१. निष्‍काळजीपणे केलेल्‍या टिपण्‍या एखाद्या व्‍यक्‍तीचे पक्षपाती विचार प्रकट करतात, विशेषत: जेव्‍हा ते विशिष्‍ट लिंग किंवा समुदाय यांवर केले जातात. सुनावणीच्‍या वेळी न्‍यायाधिशांनी कोणत्‍याही समुदायाच्‍या विरोधात किंवा त्‍यास हानीकारक असलेल्‍या अशा टिपण्‍या टाळल्‍या पाहिजेत.


हे वाचा – ‘Mini Pakistan’ Karnataka HC Remark : कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी बेंगळुरूमधील मुसलमानबहुल भागाला संबोधले ‘पाकिस्तान’  !


२. समुदाय आणि लिंग यांवर केलेल्‍या टिपण्‍यांविषयी आम्‍ही अतिशय चिंतित आहोत. अशा टिपण्‍या नकारात्‍मक प्रतिमा बनवतात. ते न्‍यायालय आणि संपूर्ण न्‍यायव्‍यवस्‍था यांच्‍यावरही परिणाम करतात.

३. इलेक्‍ट्रॉनिक युगात न्‍यायाधीश आणि अधिवक्‍ते यांनी योग्‍य भाष्‍य केले पाहिजे आणि या युगानुसार त्‍यांचे वर्तन जुळवून घेतले पाहिजे.