Tirupati Laddu Controversy : तिरुपती मंदिराच्या प्रसादाच्या लाडूमध्ये सापडली तंबाखूची पुडी !

वर्ष २०१२ मध्येही गुटख्याचे पाकीट सापडले होते.

प्रसादाच्या लाडूमध्ये सापडली तंबाखूची पुडी

तिरुपती (आंध्रप्रदेश) – तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी पासून बनवलेले तूप वापरण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर आता याच लाडूमध्ये तंबाखू असलेली कागदाची पुडी सापडली आहे. खम्मम् जिल्ह्यातील ग्रामीण मंडळ परिसरातील कार्तिकेयनगर येथे रहाणार्‍या दोंतु पद्मावती यांनी १९ सप्टेंबर या दिवशी तिरुपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि पूजा केली. त्यानंतर त्यांनी तेथून प्रसादाचे लाडू घेतले होते. २२ सप्टेंबरला त्यांनी शेजार्‍यांना प्रसाद वाटण्यासाठी हे लाडू बाहेर काढल्यावर त्यात ही पुडी सापडली, असे त्यांनी सांगितले.

तिरुमला तिरुपती बालाजी मंदिराच्या परिसरामध्ये गुटखा, मद्यपान, धूम्रपान आणि मांस यांवर कठोर निर्बंध आहेत. असे असतांना या लाडूमध्ये तंबाखू कशी आली ?, असा प्रश्‍नही उपस्थित झाला आहे. या घटनेमुळे तेथील काही कर्मचार्‍यांवर संशय वाढला आहे. तिरुपतीतील लाडूमध्ये वर्ष २०१२ मध्येही गुटख्याचे पाकीट सापडले होते.

संपादकीय भूमिका

सरकारीकरण झालेले तिरुपती मंदिर पानटपरीप्रमाणे चालवणारी आतापर्यंतची सर्व सरकारे ! अशांचा निषेध करावा तितका थोडाच आहे ! मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी ती भक्तांच्याच कह्यात असण्यासाठी हिंदूंनी आग्रही राहिले पाहिजे !