पणजी, २१ सप्टेंबर (वार्ता.) – रस्त्यावर कचरा टाकणार्या व्यक्तीला मोठा दंड करून त्याचे वाहन जप्त करण्यात येईल, अशी चेतावणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. २१ सप्टेंबर या दिवशी ऑनलाईन पद्धतीने त्यांनी राज्यभरातील पंच आणि सरपंच यांना ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाची माहिती दिली.
सावंत म्हणाले, ‘‘सध्या गोवा राज्य कचरा निर्मूलनासाठी प्रयत्न करत आहे; मात्र काही लोक आजही रस्त्यावर कचरा टाकत आहेत. यापुढे असले प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. कचरा व्यवस्थापनासाठी शासनाने विविध प्रकल्प उभारले आहेत. या दर्जेदार प्रकल्पांची केंद्रशासनानेही नोंद घेतली आहे. सध्या पंचायत आणि नगरपालिका यांच्याकडून घरोघरी जाऊन कचरा उचलला जातो. असे जरी असले, तरी लोकांची मानसिकता पालटलेली नाही. काही लोक रात्री पिशवीत कचरा भरून रस्त्यावर टाकत आहेत. याच्या विरोधात आत कडक कारवाई केली जाईल. याविषयी मी पोलीस खात्याला आदेश दिले आहेत. कुणीही रस्त्यावर कचरा टाकतांना आढळून आल्यास त्याचे छायाचित्र काढून पोलिसांकडे तक्रार नोंदवावी. अशा वेळी या व्यक्तींना मोठा दंड द्यावा लागेल.
‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान २ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या कालावधीत पंचायत आणि नगरपालिका यांनी विशेष मोहीम राबवून घराघरातील रद्दी, जुने फर्निचर किंवा अन्य टाकावू वस्तू गोळा कराव्यात आणि कचरा विकून मिळालेले पैसे कचरा वेचणार्या कामगारांच्या कल्याणासाठी वापरावेत. सरपंच आणि नगरसेवक यांनी पुढाकार घेऊन परिसर स्वच्छ ठेवावा.’’
कचरा गोळा करणार्या कंत्राटदारांनी नोंदणी करणे आवश्यक
राज्यातील हॉटेल्स, औद्योगिक वसाहती किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी कचरा गोळा करणार्या कंत्राटदारांनी घनकचरा व्यवस्थापन महामंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. यामुळे कचरा कुठून आला ? कुठे गेला ? आणि त्याची विल्हेवाट कशी लावली ? याविषयी महामंडळाला माहिती गोळा करता येईल.
सर्वांत स्वच्छ आणि नीटनेटके असणार्या तालुका स्तरावरील सरकारी कार्यालयांना बक्षिस
२ ऑक्टोबरपर्यंत सरकारी कार्यालयातील कचरा हटवण्याचे निर्देश दिले आहेत. या कार्यालयांपैकी सर्वात स्वच्छ आणि नीटनेटके असणार्या तालुका स्तरावरील कार्यालयांना बक्षिस देण्याचा आमचा विचार आहे.