Yogi Adityanath In Tripura : भारताला श्रीकृष्‍णाच्‍या ‘मुरली’ची नाही, तर ‘सुदर्शन चक्रा’चीही आवश्‍यकता !

उत्तरप्रदेशाचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांचे विधान

उत्तरप्रदेशाचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ

आगरतळा (त्रिपुरा) – भारताला आज श्रीकृष्‍णाची केवळ ‘मुरली’ पुरेशी नाही, तर सुरक्षेसाठी ‘सुदर्शन’ चक्रही आवश्‍यक आहे. पाकिस्‍तान हा मानवतेला झालेला कर्करोग आहे. त्‍याच्‍यावर वेळीच उपाययोजना करण्‍यासाठी जागतिक शक्‍तींना एकत्र यावे लागेल, असा घणाघात उत्तरप्रदेशाचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी केला. ते राजधानी आगरतळाजवळ असलेल्‍या मोहनपूर गावात सिद्धेश्‍वरी मंदिराच्‍या उद़्‍घाटनप्रसंगी बोलत होते. या वेळी थोर संत स्‍वामी चित्तरंजन महाराज, आसामचे मुख्‍यमंत्री हिमंत बिस्‍व सरमा, त्रिपुराचे मुख्‍यमंत्री माणिक साहा, तसेच त्रिपुराच्‍या शाही परिवाराचे प्रमुख बुबागरा प्रद्योत विक्रम माणिक्‍य आदी मान्‍यवर उपस्‍थित होते.

योगी आदित्‍यनाथ यांनी मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे !

१. उत्तरप्रदेशातील अयोध्‍या, मथुरा आणि काशी येथील ३ मंदिरे ही सनातन हिंदु धर्माचे महत्त्वाचे स्‍तंभ आहेत. ती आपल्‍यासाठी अत्‍यंत मौल्‍यवान आहेत.

२. उत्तरप्रदेशात ‘डबल इंजिन’चे सरकार (केंद्रात आणि राज्‍यात भाजपचे सरकार) आले आहे. त्‍यामुळेच राज्‍यात सुरक्षित वातावरण आहे. दंगलखोरांना वठणीवर आणण्‍यासाठी बुलडोझर वापरण्‍यात आला आणि त्‍याच वेळी भाविकांसाठी श्रीराममंदिरही बांधण्‍यात आले.

३. जो सक्षम आहे, तसेच जो शत्रूंना त्‍याच्‍या सामर्थ्‍याची जाणीव करून देतो, तो नेहमीच सुरक्षित असतो.

४. काँग्रेसने स्‍वतःच्‍या स्‍वार्थासाठी देशाची फाळणी स्‍वीकारली.

५. भाजप सरकारने ‘विकास आणि वारसा’ ही मोहीम सातत्‍याने पुढे नेली आहे. श्री अयोध्‍या धाममधील प्रभु श्रीरामाच्‍या मंदिराचे बांधकाम असो किंवा त्रिपुरातील मां त्रिपुरासुंदरीच्‍या मंदिराचे सुशोभीकरण आणि पुनरुज्‍जीवन यांचे काम असो, ही सर्व त्‍याची जिवंत उदाहरणे आहेत.