जिल्हा शासकीय रुग्णालयात ‘रेंज’अभावी रुग्णांची गैरसोय !

सातारा, १५ सप्टेंबर (वार्ता.) – जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या सोयीसाठी भ्रमणभाषद्वारे ओटीपी सेवा चालू करण्यात आली आहे; मात्र ‘रेंज’ मिळत नसल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. याची नोंद रुग्णालय प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी रुग्णांकडून होत आहे. (अशी मागणी का करावी लागते ? रेंजची अडचण लक्षात आल्यानंतर लगेचच प्रशासन पर्यायी व्यवस्था का करत नाही ? – संपादक)

येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण जिल्हा रुग्णालयामध्ये तपासणीसाठी येणार्‍या रुग्णांना रांगेत उभे रहायला लागू नये, यासाठी ‘फास्टर ओपीडी रजिस्ट्रेशन’ उपक्रम राबवला जात आहे. याचा लाभ घेण्यासाठी एका ‘ॲप’वर नाव नोंदणी करावी लागते; परंतु भ्रमणभाषला रेंज मिळत नसल्यामुळे बर्‍याचदा ओटीपी येत नाही. त्यामुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना अडचण निर्माण होते.

जिल्हा प्रशासनाने रेंजची गैरसोय दूर करावी, तसेच जे रुग्ण योग्य ती उपाययोजना करून रुग्णालयामध्ये येत आहेत, त्यांना दिलासा देण्याचे काम करावे, अशी मागणी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक करत आहेत. यामुळे रुग्णालयातील आधुनिक वैद्य, परिचारिका आणि रुग्ण यांचा वेळ वाचून रुग्णावर योग्य वेळेत आणि योग्य ते उपचार होतील.

संपादकीय भूमिका 

सुविधा चालू केल्यानंतर त्यामध्ये येणार्‍या अडचणी प्रशासनाने लगेचच सोडवाव्यात अशी अपेक्षा !