विदेशातील एका साधिकेने घरी आणि तिच्या शाळेतील नोकरीच्या ठिकाणी केलेले साधनेचे प्रयत्न अन् साधनेमुळे तिला परात्पर गुरु डॉक्टरांचे जाणवत असलेले अस्तित्व

१. विदेशातील एका शाळेमध्ये साधिकेने भावजागृतीसाठी प्रयत्न करणे, तसेच विद्यार्थ्यांना प्रार्थना म्हणायला शिकवणे, त्यामुळे वर्गात चैतन्याची अनुभूती येऊन विद्यार्थ्यांची आकलनशक्ती वाढणे

‘मी शिक्षिकेची नोकरी करते. भाववृद्धी सत्संगात सांगितल्यानुसार मी ईश्वरी अनुसंधानात राहून भावाचे प्रयत्न करत आहे. मी एकदा आमच्या ‘सुपरवायझर मॅडम’च्या खोलीत गेले होते. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘तू खोलीत आलीस की, मला पुष्कळ प्रकाश जाणवतो आणि सुरक्षित वाटते.’’ शाळेत माझ्याकडून पुढील प्रयत्न होतात.

अ. मी शाळेत जातांना ‘परात्पर गुरु डॉक्टर आणि श्रीकृष्ण सतत माझ्या सोबत आहेत’, असा भाव ठेवते.

आ. सकाळी शाळेची पायरी चढतांना ‘मी रामनाथी आश्रमात सेवेला आले आहे’, असे मला वाटते. त्यामुळे माझी शाळेतील कामे इतर शिक्षकांच्या तुलनेत लवकर आणि चुकांविरहित होतात.

इ. वर्गात प्रतिदिन प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त होत असल्याने मलाही वर्गात चैतन्याची अनुभूती येते.

२. शिक्षिकांनीही साधनेला आरंभ करणे

आमच्या शाळेतील शिक्षिका नामजप, मीठ-पाण्याचे उपाय, सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचे वाचन, तसेच वास्तूशुद्धी आदी करू लागल्या आहेत अन् काही जणी सत्संगालाही जोडल्या आहेत.

३. मोठ्या आवाजात अन्य धर्मियांची प्रार्थना चालू असतांना साधिकेने ‘स्वतः रामनाथी आश्रमात आहे’, असा भाव ठेवल्याने तिला श्लोक आणि मंत्र पठण ऐकू येणे

अन्य धर्मीय त्यांच्या प्रार्थना मोठ्या आवाजात म्हणतात; परंतु त्या वेळी मला मात्र अनेकदा ‘हिंदु धर्मातील श्लोक आणि मंत्र यांचे पठणच चालू आहे’, असे ऐकू येते. त्या वेळी ‘मी मनाने रामनाथी आश्रमात आहे’, असा भाव ठेवलेला असतो.

४. साधनेमुळे वास्तूत जाणवणारे पालट

४ अ. वास्तूत प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. डॉक्टर यांचे अस्तित्व जाणवणे अन् घरातील सर्वांनी साधनेला आरंभ करणे : मी प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार ‘नामजप, आध्यात्मिक उपाय, स्वयंसूचना सत्रे आणि भाववृद्धीसाठी प्रयोग करणे’, हे सर्व प्रयत्न नियमित करत आहे. त्यामुळे आमच्या वास्तूत चैतन्य जाणवते, तसेच प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) आणि प.पू. डॉक्टर यांचे अस्तित्वही जाणवते. नियमित आध्यात्मिक प्रयत्न केल्यामुळे माझे मन शांत राहू लागले आहे. आता आमच्या घरातील सर्वजण साधना करू लागले आहेत.

५. अनुभूती

५ अ. गुरुपौर्णिमेपूर्वी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप अधिक भावपूर्ण होणे आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी गुरुपौर्णिमेला श्री दत्तगुरूंच्या रूपात साधकांना दर्शन देणे : गुरुपौर्णिमेच्या आधी २ मासांपासून माझा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप अधिक भावपूर्ण होऊ लागला. नित्य कामे करतांनाही माझ्याकडून हाच नामजप होत होता. आध्यात्मिक उपायांसाठीचा ‘निर्गुण’ हा जप करतांना माझ्या डोळ्यांसमोर परात्पर गुरु डॉ. आठवले येत होते. या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ‘गुरुमाऊलींनी सर्व साधकांना श्री दत्तगुरूंच्या रूपात दर्शन दिले’, असे मला नंतर समजले.

५ आ. विविध चैतन्यमय अनुभूती येत असल्याने ‘परात्पर गुरु डॉक्टर समवेत आहेत’, याची निश्चिती होणे : गुरुकृपेने मला घरात विविध चैतन्यमय अनुभूती येतात. ‘देवघरातील निरांजनात घातलेल्या तुपाच्या दिव्यात कमळाची प्रतिमा उमटणे, भिंतींवर ॐ दिसणे’ आदी अनुभूती म्हणजे ‘परात्पर गुरु डॉ. आठवले सतत आमच्या समवेत आहेत’, याविषयीचीच अनुभूती आहे. यासाठी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’

– एक साधिका (४.८.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक