सांगवी (पिंपरी) येथे कोयत्याने तिघांवर वार !
पिंपरी-चिंचवड – येथील सांगवीमध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या दरम्यान कोयत्याने तिघांवर वार केला आहे. पूर्ववैमनस्त्यातून खून करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी रिद्धेश उपाख्य लाला हेमंत पाटील आणि शुभम बाबुराव नावळे या दोघांना अटक केली आहे. या घटनेप्रकरणी गालीब करीम शेख यांनी तक्रार दिली आहे.
पुणे येथे चिमुकल्यावर कुत्र्यांचे आक्रमण !
पुणे – चाकण मधील कडाचीवाडी येथे ५ वर्षाच्या मुलावर कुत्र्यांच्या टोळक्याने आक्रमण केले. या घटनेत चिमुकला गंभीर घायाळ झाला आहे. सुदैवाने वेळीच तेथील नागरिकांनी कुत्र्यांना पिटाळून लावल्यामुळे चिमुकल्याचा जीव वाचला.
बँकेवर दरोडा टाकणार्यांना जन्मठेप !
पुणे – पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दौंड तालुक्यातील राहू गावातील शाखेवर सशस्त्र दरोडा टाकून ६५ लाख ५७ सहस्र रुपये लुटणार्या चौघांना जन्मठेपेची शिक्षा विशेष मोक्का न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी सुनावली. या प्रकरणातील ३ आरोपींना ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, तसेच ७ आरोपींना प्रत्येकी १० लाख रुपये दंड ठोठावण्यात आला. चोरट्यांच्या टोळीने पुण्यासह सातारा आणि नगर जिल्ह्यातील बँकांवर दरोडा घातला होता.
कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना साहाय्य !
मुंबई – गतवर्षीच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना १ सहस्र ६०० कोटी रुपयांचे साहाय्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून या साहाय्याचे तातडीने वितरण करण्याचे आदेश कृषी आयुक्तांना दिले आहेत.
गणेशोत्सवासाठी रात्री लोकलच्या जादा फेर्या
मुंबई – गणेशोत्सवाच्या कालावधीत श्री गणेशभक्तांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे / कल्याण दरम्यान शनिवारी मध्यरात्रीपासून मंगळवारी रात्रीपर्यंत लोकलच्या २२ जादा फेर्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सी.एस्.एम्.टी. ते ठाणे / कल्याण दरम्यान मुख्य मार्गावर या जादा फेर्या चालवण्यात येणार आहेत.
‘एस्.टी.’च्या कोल्हापूर विभागास २ कोटी १६ लाख रुपयांचा लाभ !
कोल्हापूर – राज्य परिवहन महामंडळ ९ वर्षांनंतर प्रथमच ऑगस्ट २०२४ मध्ये लाभात आले आहे. राज्य स्तरावर महामंडळाने १६ कोटी ८६ लाख रुपयांचा लाभ मिळवला असून कोल्हापूर विभागास २ कोटी १६ लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे. कोल्हापूर विभागाच्या या नफ्याविषयी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांनी विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.