CM Yogi On Gyanvapi : ज्ञानवापीला ‘मशीद’ म्‍हणणे दुर्दैवी ! – मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ

ज्ञानवापीला ‘मशीद’ म्‍हणणे दुर्दैवी – उत्तरप्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) : ज्ञानवापी हे साक्षात् श्री विश्‍वनाथाचे धाम आहे. असे असतांना ज्ञानवापीला ‘मशीद’ म्‍हणणे दुर्दैवी आहे, असे विधान उत्तरप्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी केले.

ज्ञानवापीतील व्‍यासजी तळघराच्‍या वरच्‍या बाजूला नमाजपठणासाठी मुसलमानांना प्रवेश न देण्‍याची आणि तळघर दुरुस्‍त करण्‍याची मागणी करणारी हिंदूंची याचिका वाराणसीच्‍या दिवाणी न्‍यायालयाने १३ सप्‍टेंबर या दिवशी फेटाळून लावली. तसेच ज्ञानवापीच्‍या तळघरात चालू असलेली पूजा मात्र नेहमीप्रमाणे चालू राहील, असे न्‍यायालयाने सांगितले. त्‍या पार्श्‍वभूमीवर योगी आदित्‍यनाथ यांच्‍या वरील प्रतिक्रिया व्‍यक्‍त केल्‍याचे सांगितले जात आहे.

योगी आदित्‍यनाथ यांच्‍या वक्‍तव्‍याचे स्‍वागत ! – अधिवक्‍ता मदन मोहन यादव

अधिवक्ता मदन मोहन यादव

याविषयी प्रतिक्रिया व्‍यक्‍त करतांना ज्ञानवापी प्रकरणी न्‍यायालयात हिंदु पक्षाची बाजू मांडणारे अधिवक्‍ता मदन मोहन यादव म्‍हणाले, ‘‘योगी आदित्‍यनाथ यांनी केलेल्‍या वक्‍तव्‍याचे आम्‍ही स्‍वागत करतो. आता विधीमंडळानेही ज्ञानवापीला आदि विश्‍वेश्‍वर काशी विश्‍वनाथाचे मूळ स्‍थान म्‍हणून मान्‍यता दिली आहे. कल्‍याण सिंह यांच्‍यानंतर असे रोखठोक वक्‍तव्‍य ऐकणे दुर्लभ झाले होते.’’