‘२५.७.२०२४ या दिवशी रात्री झोपेत असतांना मला आकाशवाणी झाल्याप्रमाणे पुढील वाक्य ऐकू आले. ‘श्री. निषाद यांना सध्या होत असलेले वाईट शक्तींचे त्रास दूर होण्यासाठी आणि त्यांची चित्तशुद्धी होण्यासाठी त्यांनी श्री गुरूंना विचारून या वर्षीची आषाढ अमावास्या (४.८.२०२४) ते श्रावण अमावास्या (३.९.२०२४) या कालावधीत ‘मौन’ पाळावे. या कालावधीत गुरूंनी सांगितलेला नामजप अधिकाधिक करावा. त्यामुळे त्यांची आत्मोन्नती होण्यास साहाय्य होईल.’ ‘ही माहिती सांगणारे कोण आहे ?’, असे मला कळले नाही.’
– श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ३६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.७.२०२४)
श्री. निषाद यांचे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासाठी प्रश्न
१. प्रश्न : वर सांगितल्याप्रमाणे करायचे आहे का ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘त्या कालावधीत नामजप अधिकाधिक करावा’, हे योग्य आहे; पण तेव्हा मौन पाळण्यापेक्षा अंतर्मुख व्हावे. त्यामुळे चित्तशुद्धी होऊन आत्मोन्नती होण्यास साहाय्य होईल. मौन पाळल्याने मनातील विचार थांबत नाहीत; पण नामजपात राहून अंतर्मुख राहिले, तर मनोलय लवकर होतो. त्यामुळे मौन पाळण्यापेक्षा नामजप अधिकाधिक करून अंतर्मुख होणे श्रेष्ठ ! भक्तीमार्गानुसार ‘भगवंताच्या चिंतनामध्ये गुंतल्याने बोलण्याचे भान न रहाणे’, हे खरे मौन !
२. प्रश्न : सध्या मला पुढील सेवा आहेत
अ. ज्ञानाच्या धारिकांच्या संदर्भातील समन्वय
आ. हिंदी आणि गुजराती या भाषांतील पंचांग विज्ञापनांचा समन्वय
इ. जिज्ञासूंना आश्रम दाखवणे (आश्रमदर्शन)
ई. शब्दकोशाच्या (संगणकीय प्रणाली आणि लिखाण यांच्या) संदर्भातील समन्वय
उ. डैम (नवीन संगणकीय प्रणाली) संदर्भातील बैठकांमध्ये सहभागी होणे आणि विविध समन्वय
आश्रमदर्शन सोडून अन्य सेवांचा समन्वय लेखी किंवा भ्रमणभाष संदेशाद्वारे होऊ शकतो. मग समष्टी साधनेसाठी सेवेच्या अंतर्गत आवश्यक त्या वेळी थोडेफार बोललो. असे केले, तर चालेल का ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ही सर्व समष्टी सेवा करायची; पण तेव्हाही नामजप आणि अंतर्मुखता यांकडे लक्ष द्यायचे.
|