हौद नव्हे, भ्रष्टतेचा हैदोस !

गणेशोत्सव विशेष…

गेल्या काही वर्षांपासून श्री गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन केल्यामुळे नदी प्रदूषित होते, असा खोटा प्रचार करत कृत्रिम हौद सिद्ध करून त्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. गतवर्षीही गणेशमूर्तींचे अवशेष हौदात अस्ताव्यस्त पडलेले असल्याने त्याचे पावित्र्य राखले गेले नसल्याचे दिसले. गणेशोत्सवात मूर्ती विसर्जनासाठी बांधलेले कृत्रिम हौद देखभालीअभावी डासांच्या उत्पत्तीची केंद्रे बनली आहेत. सध्याचे कृत्रिम हौद हे न्यायालयाच्या सूचनेनुसारही नाहीत. या हौदांसाठी व्यय मात्र लाखो-कोट्यवधी रुपयांचा होतो. या हौदांतील मूर्ती कित्येकदा नदीतच सोडत असल्याने असे हौद बांधण्यापेक्षा मूर्तीचे पाण्यात विसर्जन करण्यासाठी शासनाने निधी व्यय केला, तर ते अधिक योग्य होणार नाही का ?

वर्ष २०२१ मध्ये पुण्यात ‘फिरते विसर्जन हौद’ संकल्पना राबवतांना गाड्या जागेवरच थांबून असतांनाही ठेकेदाराचे पैसे देण्यात आले होते. गणेशोत्सवात ४ दिवसच विसर्जनाचे असतात; मात्र वर्ष २०२१ मध्ये पुणे महापालिकेने थेट ११ दिवसांसाठी फिरते हौद घेतले होते आणि त्यांसाठी तब्बल १ कोटी २६ लाख १९ सहस्र ८६० रुपये ठेकेदाराला दिले जाणार होते. यामध्ये ८० लाख रुपये अधिक व्यय झाले असते. ४ दिवसांसाठी ही निविदा काढली असती, तर ४६ लाख रुपयांत विसर्जन झाले असते.  ‘ही सरळ सरळ जनतेची लूट आहे’, असा आरोप त्या वेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी केला होता. वर्ष २०२२ मध्येही ही योजना राबवण्यात आली; पण फिरते हौद नागरिकांना उपलब्ध होत नसल्याने ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले. वर्ष २०२३ मध्ये कोरोना महामारीचा धोका नसूनही महापालिकेने फिरत्या हौदांसाठी दीड कोटी रुपयांची निविदा काढली. शहरात एकूण ५ लाख ६१ सहस्र ४२८ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन झाले होते. त्यामध्ये फिरत्या हौदात केवळ ५९ सहस्र १२६ मूर्ती विसर्जित करण्यात आल्या होत्या. वरील आकडेवारी पहाता विसर्जन घाट बंद करून फिरते हौद फिरवण्यातून कंत्राटदारांची मात्र मौजमजा झाली.

‘या माध्यमातून जमवलेल्या मूर्तींचे नेमके काय केले जाते ?’, हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच रहातो. विसर्जनाच्या नंतर मात्र हौदातील मूर्तींची संख्या आणि कोणत्या खाणीत विसर्जन केल्या, यांविषयीच्या बातम्या येतात. काही ठिकाणी हा विषय चक्क घनकचरा विभागाने हाताळल्याचे आढळले. कृत्रिम हौदातील मूर्ती कचर्‍याच्या गाडीतून कुठेतरी नेऊन टाकल्या जातात आणि त्याची कुठे नोंदही ठेवली जात नाही. त्यामुळे हौदाच्या माध्यमातून धर्मश्रद्धा पायदळी तुडवल्या जात आहेत, एवढे मात्र नक्की. त्यामुळे भक्तांनी श्रद्धापूर्वक पूजलेल्या गणेशमूर्तीचे विसर्जन कचर्‍यात करायचे कि वहात्या पाण्यात ? हे पक्के ठरवायला हवे आणि प्रशासनासही त्यासाठी सोय करण्यास भाग पाडायला हवे !

– सौ. अपर्णा जगताप, पुणे