सांगली जिल्ह्यात श्री गणेशमूर्तींची भक्तीभावात स्थापना !

संग्रहित छायाचित्र

सांगली, ८ सप्टेंबर (वार्ता.) – ७ सप्टेंबर म्हणजेच श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व गावांतील घरी आणि मंडळांमध्ये सार्वजनिक श्री गणेशमूर्तींची भक्तीभावाने प्रतिष्ठापना करण्यात आली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वाजतगाजत मिरवणुकीने श्री गणेशाचे स्वागत केले. सांगली संस्थानच्या श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेशोत्सव मंडळांनी मिरवणुकीत डॉल्बी, लेसर दिवे, बॅण्ड, झांजपथक यांचा सर्रास वापर केला, त्यामुळे ध्वनीप्रदूषण झाल्याच्या तक्रारी होत्या. वाहतूककोंडी आणि डॉल्बी अन् बँजोचे आवाज यांमुळे लोक हैराण झाले होते.

आरती, पूजा यांमुळे वातावरण भक्तीमय झाले होते. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या वतीने सांगली येथील कर्मवीर भाऊराव पाटील चौक अणि मिरज येथील सराफ कट्टा ते लक्ष्मी मार्केटपर्यंत श्री गणेशमूर्ती विक्रेत्यांची दुकाने थाटली होती. सांगली आणि मिरज येथील बाजारपेठा गजबजून गेल्या होत्या. बाहेरगावातील मूर्तीकारांकडून मूर्ती घेणार्‍या गणेशोत्सव मंडळांनी मूर्ती आदल्या दिवशी सांगली आणि मिरज येथे आणून ठेवल्या होत्या. आदल्या दिवशी मिरवणुकीची संपूर्ण सिद्धता करून दुसर्‍या दिवशी मिरवणूक काढली.