हिंदूसंघटन आणि लोकजागृती यांचे प्रभावी माध्यम बनत असलेला गणेशोत्सव !

सध्या चालू असलेल्या ‘गणेशोत्सवा’च्या काळात हिंदूसंघटन आणि लोकजागृती यांच्या संधीवर प्रकाश टाकणारा लेख !

मुंबईच्या ‘गणेश गल्लीचा राजा’ मंडळाने सादर केलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबाराचा देखावा


लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदूंच्या संघटनासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ केला. त्या वेळी गणेशोत्सव हे देशावरील आघात अल्पावधीत सर्वांपर्यंत पोचवण्याचे माध्यम बनले. टिळकांच्या नंतर वेळोवेळी गणेशोत्सवाचे स्वरूप टप्प्याटप्प्याने पालटू लागले. गेल्या काही वर्षांत गणेशोत्सव मंडळांमध्येही सामाजिक परिवर्तन दिसून येत आहे. गणेशोत्सव हा हिंदूसंघटन, लोकजागृती आणि प्रबोधन यांचे एक प्रभावी माध्यम बनत आहे. अनेक मंडळे गेल्या काही वर्षांपासून हिंदुजागृतीचे कार्य प्रभावीपणे करत असून त्यांची त्या दिशेने वाटचाल चालू आहे. चांगल्या समाजनिर्मितीच्या दृष्टीने हे नक्कीच सकारात्मक चित्र आहे.

१. ऐतिहासिक, पौराणिक विषयांवर प्रकाश टाकणारे देखावे

गेल्या काही वर्षांपासून विविध शहरांतील गणेशोत्सव मंडळे प्रबोधन करणार्‍या विषयांवर देखावे करण्यास प्राधान्य देत आहेत. गेल्या काही वर्षांत गावागावांतील मंडळे व्यसनाधीनता, प्रथमोपचार, रक्तदान, वाढती लोकसंख्या अशा सामाजिक विषयांवर देखावे करून प्रबोधन करत आहेत. पालघर जिल्ह्यातील श्रद्धा वालकर हिची लव्ह जिहादमधून निर्घृण हत्या झाल्यानंतर अनेक मंडळांनी लव्ह जिहादविषयी जागृती निर्माण करणारे देखावे सादर केले. वर्ष १९९० मध्ये जिहाद्यांनी काश्मिरी हिंदूंना स्वतःच्या घरातून नेसत्या वस्त्रानिशी विस्थापित होण्यास भाग पाडले. काही मंडळांनी देखाव्याच्या माध्यमातून काश्मिरी हिंदूंच्या समस्यांवर प्रकाश टाकला होता. बांगलादेशातून होणार्‍या घुसखोरीवरही एका मंडळाने देखावा केला होता. गड-दुर्ग, मंदिरांची निर्मिती या विषयांवरील देखाव्यांच्या माध्यमातून अनेक मंडळे इतिहासाविषयी जागृती करत आहेत. काही मंडळे त्या त्या काळात घडलेल्या महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर प्रकाश टाकत आहेत. थोडक्यात गणेशोत्सव मंडळांतील देखावे हे एक ‘समाजप्रबोधनाचे स्थान’, अशी नवीन ओळख रूजत आहे. मधल्या काही दशकांमध्ये लोकमान्यांच्या गणेशोत्सवातील प्रबोधनाच्या चळवळीला थोडे वेगळे वळण लागले होते. ती परिस्थिती आता हळूहळू पालटू लागली आहे.

मुंबईतील गिरगावात केशवजी नाईक चाळ गणपति आहे. हा मुंबईतील पहिला आणि सर्वांत जुना गणपति आहे. या गणेश मंडळाला लोकमान्य टिळक यांनीही भेट दिली होती. तेथे अजूनही आरती, सजावट पारंपरिक पद्धतीने केली जाते.

२. मिरवणुकीतील पथकांच्या माध्यमातून हिंदु संस्कृतीचे जतन

वर्ष २००७ ते साधारण २०२० पर्यंत, म्हणजे साधारण कोरोना महामारीच्या काळापर्यंत गणेशोत्सव मिरवणुकांमध्ये धांगडधिंगा आणि डीजेच्या दणदणाटाचे पेवच फुटले होते. कोरोना महामारीनंतर मात्र तेही स्वरूप पालटत आहे. आता अनेक ठिकाणी ‘डीजेमुक्त गणेशोत्सव’सारख्या संकल्पना रुजत आहेत. विविध पारंपरिक वाद्यांना आता मिरवणुकीमध्ये मानाचे स्थान मिळत आहे. पथनाट्यांमध्येही विविध लोककलांचा समावेश केलेला असतो. त्यामुळे विस्मृतीत गेलेल्या अनेक लोककलांना पुन्हा सामाजिक प्रतिष्ठा मिळत आहे.

लोकमान्य टिळक यांनी जो सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला, त्या वेळी तो पारंपरिक पद्धतीने आणि हिंदूंना संघटित करण्याच्या उद्देशाने चालू केला. गेल्या काही वर्षांत गणेशोत्सव मंडळांची वाटचाल ही ‘पुन्हा एकदा पारंपरिकतेकडे’, असा संदेश मिळत आहे.

३. एकतेचा आणि संघटनाचा संदेश

उरी (काश्मीर) येथील आतंकवादी आक्रमणानंतर देशभर आतंकवादाचे सावट होते. अशा स्थितीतही कोणत्याच गणेशोत्सव मंडळाने माघार घेतली नव्हती. महाराष्ट्रातील अनेक मुसलमानबहुल भागांत मशिदीतून गणेशोत्सव मिरवणुकांवर दगडफेक होण्याचे प्रकारही घडलेले आहेत. अशा स्थितीतही हिंदू जराही न डगमगता उत्साहाने मिरवणुका काढतात. त्याने हिंदूंमधील एकी तर वाढत आहेच; त्यासह सतर्कताही वाढत आहे. गेल्या काही वर्षांपासून ‘एक गाव, एक गणपति’, ’एक वॉर्ड (प्रभाग) एक गणपति’, अशा संकल्पनाही मोठ्या प्रमाणात स्वीकारल्या गेल्या आहेत. हे संघटनाच्या दिशेने उचललेले मोठे पाऊल आहे.

४. स्वयंसेवी संघटनांचे कार्य

अनेक स्वयंसेवी संघटना गणेशोत्सव काळात प्रथमोपचार देण्याचे, गर्दी नियंत्रणाचे कार्य करत आहेत. या माध्यमातूनही समाजासाठी काही तरी करण्याचा संदेश सर्वत्र जात आहे.

५. गणेशोत्सव मंडळांना सरकारचे प्रोत्साहन

अनेक शहरांमध्ये आदर्श मिरवणुका काढणार्‍या मंडळांना शासन आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडूनही पारितोषिक देण्यात येते. सरकारने चालू केलेल्या ‘एक खिडकी योजने’मुळे एकाच ठिकाणी सर्व अनुमती मिळत आहेत. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना साहाय्यच होत आहे. अशा प्रकारे गणेशोत्सव मंडळांकडून जे कार्य होत आहे, त्याला सरकारचेही प्रोत्साहन मिळत आहे.

गणेशोत्सव मंडळांनी राष्ट्र आणि धर्म यांच्यासमोर असलेल्या मोठ्या समस्या उदा. लव्ह जिहाद, धर्मांतर यांच्या विरोधात कायदे करावे, इत्यादी मागण्या शासनदरबारी केल्यास ही हिंदूशक्ती विधायक कारणासाठी वापरली गेली, असे होईल. गणेशोत्सवाच्या काळात गावागावांत जागृत असणारा हा सामाजिक आणि हिंदुत्वाचा विचार राष्ट्रीय पातळीवर पोचल्यास हिंदु राष्ट्राविषयीही जागृती होणार आहे. येत्या काळात श्री गणेशाच्या चरणी एकवटणार्‍या या प्रचंड मोठ्या हिंदूसंघटनाच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राचा प्रसार सर्वदूर पोचावा, हीच प्रार्थना !

– श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती.

हिंदूंच्या सणांना विरोध करणार्‍यांचे पितळ उघडे पाडणारा गणेशोत्सव !

श्री सुनील घनवट

१. तथाकथित पर्यावरणवाद्यांचा हिंदूविरोध

गणेशोत्सवात खरे पर्यावरणप्रेमी कोण आहेत आणि कुणी केवळ हिंदुविरोधासाठी पर्यावरणप्रेमाचा बुरखा पांघरलेला आहे, तेही उघड होते. नास्तिकतावाद्यांकडून जलप्रदूषणाचे दाखले देत श्री गणेशमूर्तींचे वाहत्या पाण्यात विसर्जन न करता मूर्तीदान चळवळ राबवण्यात येते. भाविकांनी श्रद्धेने पूजन केलेल्या मूर्ती घेऊन त्यांची अत्यंत अवमानकारक हाताळणी करून पुन्हा त्याचे पाण्यातच विसर्जन केले जाते अथवा खाणींमध्ये टाकण्यात येते, हे अनेकदा उघड झाले आहे. गेल्या काही वर्षांत मुंबई उच्च न्यायालयाने वाहत्या पाण्यात विसर्जन करण्याला बंदी घातलेली नसतांना अंनिसने त्याप्रमाणे वातावरण निर्माण केले. याचा परिणाम असा झाला की, कोल्हापूर येथे तथाकथित पर्यावरणप्रेमींनी लावलेले बॅरिकेट्स धुडकावून भाविकांनी पंचगंगेत गणेशमूर्तींचे विसर्जन केले. काही वर्षांपूर्वी संगमनेर येथे तर वाहत्या पाण्यात विसर्जनाला विरोध होत असतांना गणेशोत्सव मंडळांनी २ दिवस मिरवणूक थांबवून ठेवली.

एरव्ही कारखाने, कत्तलखाने, महानगरपालिका, कार्यालये यांतून लाखो लिटर सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नद्यांमध्ये सोडले जात असतांना त्याकडे कानाडोळा करणारे हे तथाकथित पर्यावरणवादी हिंदूंच्या सणात मात्र पर्यावरणाच्या नावाने खोडा घालतात. ही मंडळी बकरी ईदच्या वेळी लाखो बकर्‍यांची हत्या होत असतांना, ख्रिसमसच्या वेळी प्रदूषण होत असतांना कोणत्या बिळात लपलेली असतात, हे कळत नाही !

२. पोलिसांच्या सर्वधर्मसमभावाचे बिंग पडते उघडे !

एरव्ही पहाटे ५ वाजण्याच्या पूर्वीपासूनच चालू होणारी मशिदीतील बांग दिवसभरात ५-५ वेळा परिसरातील नागरिकांचे जगणे नकोसे करते; मात्र ती पोलिसांना ऐकू येत नाही. गणेशोत्सवात मात्र रात्रीचे १० वाजले की, वाद्यवादन बंद करण्यासाठी पोलीस पुढे सरसावलेले असतात. ज्या पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटण्याचा पराक्रम केला, त्याच पुण्यात गणेशोत्सव मिरवणुकीत शाहिस्तेखानाची बोटे छाटल्याचा देखावा सादर करण्यास पोलिसांनी अनुमती नाकारली होती. पुण्यातील गणेशोत्सवात असे अनेकदा घडते. त्यामुळे पोलिसांचा हिंदूंकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे, ते गणेशोत्सव काळातच दिसून येते.

– श्री. सुनील घनवट

संपादकीय भूमिका :

यंदाच्या गणेशोत्सवात राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांनी हिंदूशक्तीचा विधायक कार्यासाठी वापर करून हिंदु राष्ट्राचा प्रसार सर्वदूर पोचवावा !