गणेशाशी संबंधित काही उपासना !

संकटनाशासाठी कुणी श्री गणेशोपासनेची कास धरतो, तर कुणी मनोकामना पूर्तीसाठी, काही मनःशांतीसाठी किंवा विशिष्ट हेतू किंवा ईप्सित साध्य करण्यासाठी गणेशाची साधना करतात; मात्र साधकाच्या ठिकाणी चिकाटी, संयम, श्रद्धा आणि निष्ठेची आवश्यकता असते.

१. २१ दिवस गणपति मंदिरात जाऊन श्री गणरायाचे दर्शन घेणे

२. नियमित गणपति मंदिरात जाऊन श्री गणपतीच्या मूर्तीला २१ प्रदक्षिणा घालणे

३. नियमित ‘श्री गणेश अथर्वशीर्षा’ची २१ आवर्तने करणे आणि श्री गणेशमूर्तीवर सोवळ्याने अभिषेक करणे

४. गणपति मंदिरात जाऊन श्रद्धा आणि भक्तीपूर्वक दर्शन करणे

५. श्री गणेशाला दुर्वा अर्पण केल्याविना अन्नग्रहण न करणे

६. नारदकृत ‘संकष्टनाशन स्तोत्रा’चा पाठ करणे

७. ‘गणेशगीते’चा नियमित एक पाठ करणे

८. नियमित पािर्थव गणेशाची पूजा करणे

९. २१, ४८ आणि १२१ दिवस गजाननाचा विशिष्ट जप करणे

१०. ॐ श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा ।’ हा ‘संकटनिवारण’ मंत्र पाठ करून श्री गणपतीच्या मूर्तीपुढील उदबत्तीचा अंगारा गोळा करून तो स्वतःच्या आणि कुटुंबातील इतरांच्या भाल प्रदेशावर लावावा.

११. गणेश मंदिरात किंवा अष्टविनायकांपैकी एका जागृत स्थानावर बसून स्वहस्ताक्षरात ‘गणेशस्तोत्र’ लिहून काढावे. त्या स्तोत्रांच्या न्यूनतम आवृत्या, म्हणजे प्रती काढून त्या ८ बटूंना वाटाव्यात. त्यांच्याकडून स्तोत्राचे पठण करून घ्यावे. बटूंना मिष्टान्नाचे भोजन देऊन दक्षिणाही द्यावी.

१२. मातीची नवी गणेशमूर्ती स्वतः सिद्ध करावी. तिची यथासांग भावपूर्ण पूजा करावी. तिचे विसर्जन करावे.

१३. मांदार वृक्षाच्या मुळापासून सिद्ध केलेल्या गणेशमूर्तीचे पूजन करावे. याला ‘मांदारगणेश उपासना’ म्हणतात. २१ वर्षे वृक्षाची पूजा केल्यास वृक्षात गणेशमूर्ती प्रकटते.

१४. शमी वृक्षातळी बसून केलेली उपासना तात्काळ फलद्रूप होते.

१५. संकट निवारणार्थ ४२ मंगळवारांचे व्रत करावे. दिवसभर उपवास करावा. गणेशाला तांबूस फळ, गूळ, तांबडे फूल, तांब्याचे पैसे, मसुराची डाळ, तांबडी सुपारी आणि नारळ वहावा. गोडाचा शिरा खाऊन उपवास सोडावा. ४२ मंगळवारांनंतर ‘सत्यविनायक’ करावा.

असाध्य आजार किंवा व्याधी झाल्यास आणि सर्व प्रकारचे वैद्यकीय उपचार करूनही रुग्णाच्या प्रकृतीत फरक पडत नसेल, तर श्री गणेशाच्या मूर्तीवर अभिषेक करून सत्पात्र ब्राह्मणाला सुवर्णाची गणेशमूर्ती दान द्यावी. यामुळे रुग्णाच्या प्रकृतीत फरक पडतो. गणेशाचा जप केल्याने ग्रहपीडा किंवा ग्रहदोष दूर होतो. – (साभार : ‘हरी-विजय’, दीपोत्सव २००८)