संपादकीय : ग्रेटा आणि इकोसिस्टीम !

लहानपणापासून पर्यावरणासाठी आंदोलन करणारी सध्या २० वर्षांची असलेली ग्रेटा थनबर्ग हिला डेन्मार्क देशाची राजधानी असलेल्या कोपनहेगन येथील पोलिसांनी इस्रायलच्या विरोधातील आंदोलनाच्या प्रकरणी अटक केली. तेथील विद्यापिठाने ‘इस्रायली शिक्षणसंस्थांना वगळावे’ यासाठी ती अन्य विद्यार्थ्यांसमवेत आंदोलन करत होती. तिने स्वतःच सामाजिक माध्यमावरून हा व्हिडिओ प्रसारित केला आहे. या व्हिडिओमध्ये बोलतांना ‘पोलीस खांद्यावर रायफल घेऊन आले आहेत’, हे सांगायला ती विसरलेली नाही. तिच्या अटकेमुळे (मानवता धोक्यात आल्याने !) अर्थात्च जगभरातील तिचे समर्थक पर्यावरणवादी आणि साम्यवादी यांच्याकडून सामाजिक माध्यमांवर प्रतिक्रिया येऊन आदळत आहेत. ग्रेटा हिला ‘उभे’ करण्यापासून तिला जागतिक स्तरावर मोठे करण्यापर्यंत सारे काही आंतरराष्ट्रीय ‘इकोसिस्टीम’चा (विशिष्ट उद्देशाने कार्यरत एकमेकांना साहाय्य करणार्‍या विविध यंत्रणेचा) भाग आहे, हे आता सहजपणे लक्षात येत आहे.

ग्रेटा प्रथम भारतातील लोकांना प्रकर्षाने लक्षात आली, ती वर्ष २०२१ मध्ये भारतातील शेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या संदर्भात तिने सामाजिक माध्यमांवर केलेल्या पोस्टमुळे ! त्यानंतर हा एका आंतरराष्ट्रीय ‘टूलकीट’चा (एका विशिष्ट हेतूने नियोजनबद्धरित्या विविध भागांतून चालवलेली यंत्रणा, मोहीम किंवा षड्यंत्राचा) भाग असल्याचे लक्षात आले. साम्यवाद्यांच्या आंतरराष्ट्रीय इकोसिस्टीमने पर्यावरण आणि हवामान पालट यांच्या नावाखाली विविध देशांत याविषयी काम करणारे तरुण कार्यकर्ते निर्माण केले आहेत. एक प्रकारे संपूर्ण देशाला कोंडीत पकडणार्‍या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ‘टूलकीट’ सामाजिक माध्यमांवर टाकल्याच्या प्रकरणी अटक झालेली दिशा रवि ही पर्यावरणवादी कार्यकर्ती आणि ग्रेटा थनबर्ग या संपर्कात आहेत. खलिस्तानी संघटना ‘पोएटिक जस्टिस फाऊंडेशन’शी भारतद्वेष निर्माण करण्यासाठी हातमिळवणी केल्याचा गंभीर आरोप दिशावर आहे. ग्रेटा थनबर्गनेही तिचीच पोस्ट (टूलकीट) सामाजिक माध्यमांवर टाकली होती. ही भारतविरोधी आंतरराष्ट्रीय यंत्रणा कशी कार्यरत आहे ? हे त्या वेळी पोलिसांच्या सायबर शाखेनेच उघड केले होते.

ग्रेटाची पार्श्वभूमी !

ग्रेटा थनबर्ग

ग्रेटाला ती ११ वर्षांची असतांना ‘एस्परगर सिंड्रोम’ हा मानसिक आजार होता. यात मुले इतरांशी संबंध ठेवणे बंद करतात. तिने शाळेत जाणे बंद केले होते. ही एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. या पार्श्वभूमीवर देशातील प्रश्न, जागतिक स्तरावरील प्रश्न, अन्य देशांतील प्रश्न आदींचा अभ्यास असणे आणि त्या विरोधात आंदोलने उभारणे, हे १५ वर्षांच्या मुलीला कसे काय जमले ? हा प्रश्न कुणालाही पडू शकतो. (१५ वर्षांची असतांना तिने पहिले आंदोलन केले होते.) या वयामध्ये स्वतःहून आंदोलन करण्याएवढी कुठल्या मुलांची वैचारिकता किंवा अभ्यास असू शकतो ? ज्याला ‘टीनएजर’ म्हणतात, अशा पौगंडा अवस्थेतील विदेशातील मुलांची बौद्धिक आणि वैचारिक मानसिकता जगातील विविध देशांतील समस्या समजून घेण्याएवढी प्रगल्भ असू शकते का ? त्यामुळे कुणीतरी सांगितल्याविना, प्रभावित केल्याविना हे होऊ शकते का ? वर्ष २०१९ आणि २०२० या २ वर्षी तिने शाळा सोडून जगभरातील देशांच्या नेत्यांना उद्देशून ‘पर्यावरण’ या विषयावरील अतिशय भावनात्मक असे व्हिडिओ प्रसिद्ध केले. ‘आमचे घर तुटत आहे आणि नेत्यांनी काहीतरी करावे’, असे आवाहन तिने या व्हिडिओतून केल्याच्या ५ महिन्यांनंतर ती ‘संयुक्त राष्ट्र जलवायू शिखर संमेलना’साठी न्यूयॉर्क येथे गेली. एवढी प्रसिद्धी मिळाल्यावर तिचे काही म्हणणे, बोलणे हे प्रत्येक देशाला ‘दखल’ घेण्याजोगे झाले. याचाच लाभ आंतरराष्ट्रीय साम्यवाद्यांनी तिला भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यास लावून उचलला, हे स्पष्ट आहे. भारतातील शेतकरी आंदोलन हे आंतरराष्ट्रीय भारतद्वेष्ट्यांचा ‘अजेंडा’ आहे, हे लपून राहिलेले नाही. आताही या आंदोलनाच्या नेत्याची थेट पंतप्रधानांना हटवण्याची भाषा चालू आहे.

इस्रायलच्या विरोधातील ‘टूलकीट’

आज जागतिक स्तरावर इस्रायलच्या विरोधात आणि इस्लामी देशांच्या बाजूने मोठे ‘टूलकीट’ (किंवा आंतरराष्ट्रीय षड्यंत्र) राबवले जात आहे. अर्थात्च यात मुसलमान आणि साम्यवादी नेहमीप्रमाणे एकत्र आले आहेत अन् त्यांना संलग्न असणारे, म्हणजे त्यांच्या इकोसिस्टीमचा भाग असणारे सर्व घटक त्यात सहभागी झाले आहेत. भारतातील हिंदी चित्रपटसृष्टी (‘बॉलीवूड’) डोके गुडघ्यात असल्याप्रमाणे या इकोसिस्टीमचा भाग झाली आहे. एके दिवशी सकाळी एकाच वेळी २९ चित्रपट अभिनेत्यांनी ‘ऑल आईज ऑन राफा’ (सर्वांची दृष्टी ‘राफा’वर आहे)ची पोस्ट सामाजिक माध्यमांवर टाकली, तेव्हा ही गोष्ट अधिकच प्रकर्षाने अधोरेखित झाली. (इस्रायल आक्रमण करत असलेल्या पॅलेस्टाईनमधील राफा हा एक प्रदेश आहे.) कुठल्याही गोष्टीच्या पूर्वइतिहासाचा अभ्यास न करता, सत्य-असत्य न पडताळता धादांत खोटे बोलत असलेल्या डाव्या विचारसरणीने प्रभावित होणारे काठावरील भारतीय हिंदू आताही ग्रेटा हिच्या अटकेने हळहळले, तर नवल वाटायला नको. चित्रपट कलाकार, पर्यावरणवादी, स्त्रीवादी आदी या आंतरराष्ट्रीय इकोसिस्टीमचा भाग झाल्याचे आता स्पष्टच झाले आहे. एका अर्थाने हे ध्रुवीकरण होत असल्याने चांगलेच आहे. त्यामुळे सामान्य हिंदूंची पूर्वापार होत असलेली फसवणूक तरी टळेल.

हिंदू आणि भारतविरोधी इकोसिस्टीम

या सर्व तथाकथित पर्यावरणप्रेमींना भारतात सहस्रो गोहत्या होतात, त्याचे काही वाटत नाही. बांगलादेशात हिंदूंवर अद्यापही अनन्वित अत्याचार होत आहेत, हिंदू मरत आहेत. अमेरिकेसारख्या सर्वाेच्च सत्तेचा यात हात असल्याचे उघड झाले, त्याविषयी किती पर्यावरणप्रेमी आणि तत्सम साम्यवादी संघटना यांनी आवाज उठवला ? ग्रेटाच्या विविध पर्यावरणविषयक प्रगल्भ भाषणातील सूत्रे चुकीची आहेत, असे कुणीच म्हणणार नाही; परंतु ही प्रगल्भता कुणी पढवलेली असण्याची शक्यताच अधिक आहे; कारण पर्यावरणापर्यंत समजू शकतो; परंतु भारतातील शेतकरी िकंवा इस्रायल यांसारख्या आंतरराष्ट्रीय विषयावरही जेव्हा ती आंदोलन करते, तेव्हा तिला जगाची सत्यस्थिती ठाऊक नसल्याने तीही या साम्यवादी आणि इस्लामी इकोसिस्टीमचा भाग बनली आहे, हे लपून रहात नाही. थोडक्यात ही इकोसिस्टीम भारतालाही घातक असून भारतियांनी त्याविषयी जागरूक रहायला हवे !

भारतविरोधी यंत्रणेचा भाग असलेल्या ग्रेटा थनबर्ग हिच्या विचारांकडे भारतियांनी वळू नये, यासाठी सरकारने पावले उचलावीत !