बेंगळुरू येथील कै. (सौ.) सुरेखा केणी यांनी साधनेला केलेला आरंभ आणि उच्च पदावर नोकरी करत असतांना त्यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत. (भाग १)
१. कुलदेवतेच्या नामजपास आरंभ
‘माझी मधली बहीण सौ. सुरेखा केणी ‘आय.डी.बी.आय.’ या अधिकोषात ‘मॅनेजर’ होती. वर्ष १९९४ मध्ये तिची भेट सनातनचे साधक श्री. अरविंद ठक्कर आणि आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. आशा ठक्कर यांच्याशी बेंगळुरू येथे झाली. त्यांनी तिला साधनेविषयी माहिती दिली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिने कुलदेवतेचा नामजप चालू केला.
२. नामजप चालू असल्याने अपघातातून वाचल्याची अनुभूती येणे
एकदा दुचाकीवरून कार्यालयातून येतांना तिचा मोठा अपघात झाला. ती एकीकडे आणि तिची दुचाकी दुसरीकडे पडली. आजूबाजूच्या सगळ्यांना वाटले, ‘ही जिवंत तरी आहे का ?’; पण ती उठून उभी राहिली. तेव्हा ‘तिचा कुलदेवतेचा नामजप चालू होता’, असे तिच्या लक्षात आले. देवाने तिला वाचवले होते. नामजपाचे महत्त्व कळल्यावर तिच्या साधनेला आरंभ झाला. पुढे तिने आम्हा सगळ्यांना साधनेत आणले. तिने मला बोटाला धरून सेवा आणि साधना शिकवली.
३. प.पू. भक्तराज महाराज यांच्या ‘अमृत महोत्सवा’साठी इंदूरला जाण्याची संधी मिळणे आणि साधिकेने स्वतःच्या हातांनी शिवलेली गोधडी त्यांनी स्वीकारणे
वर्ष १९९५ मध्ये सौ. सुरेखा आणि तिचे पती आधुनिक वैद्य (डॉ.) राजेंद्र केणी यांना प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या ‘अमृत महोत्सवा’साठी इंदूरला जाण्याची संधी मिळाली. तेव्हा आम्हा सगळ्यांना आश्चर्य वाटले, ‘सुरेखा एकदम इंदूरला जायला कशी सिद्ध झाली ?’ यावर ती मला म्हणाली, ‘‘अगं, तेच तर आता आपले आई-बाबा आहेत.’’ तिने प.पू. बाबांसाठी स्वतःच्या हाताने छान गोधडी शिवली होती. सुरेखा सभागृहात गेली. तेव्हा तेथे पुष्कळ गर्दी होती. ‘प.पू. बाबांच्या हातांत गोधडी देता येणार नाही’, असा विचार मनात आल्याने ती तेथेच थांबली होती. तिकडच्या दरवाजातूनच प.पू. बाबा बाहेर आले आणि त्यांनी तिच्याकडून ती गोधडी स्वीकारली. यातून तिला साधनेसाठी त्यांचा आशीर्वादच लाभला. जेव्हा प.पू. बाबांनी आशीर्वादस्वरूप चांदीची नाणी उधळली, तेव्हा तिला त्यांतील एक नाणे मिळाले.
४. पुष्कळ ठिकाणी प्रवचने आयोजित करणे आणि सत्संग घेतांना देहभान विसरणे
सुरेखाने पुष्कळ ठिकाणी प्रवचने आयोजित केली. सत्संगामुळे ती पुष्कळ आनंदात होती. देवाच्या कृपेने तिच्या यजमानांचा साधनेला विरोध नव्हता. जेव्हा संधी मिळेल, तेव्हा ती सेवेला जायची. तिच्या घरी होणार्या सत्संगाला तिचे सासू-सासरे, नवरा, मुली आणि घरकाम करणारी बाईसुद्धा बसायची. सुरेखा सत्संगात तल्लीन होऊन जायची. असे तल्लीन होऊन आणि देहभान हरपून सत्संग घेतांना मी कोणाला बघितले नाही.
५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेची अनुभूती घेत उच्च पदावरील नोकरी करणे
वर्ष १९९९ मध्ये सुरेखाने ‘कॉम्प्युटर सायन्स’ या विषयात ‘एम्.ए.’ ही पदवी घेतली होती. ती ‘आय.डी.बी.आय.’ या अधिकोषात अधिकारी होती. निवृत्त होईपर्यंत ‘सी.जी.एम्.’ (चीफ जनरल मॅनेजर (मुख्य महाव्यवस्थापक)) या पदापर्यंत पोचली होती. ती सेवेसाठी भरपूर सुट्या घ्यायची. त्यामुळे तिला वाटायचे, ‘तिच्या सुट्यांमुळे तिला पदोन्नती मिळेल का ?’ याविषयी तिने मला एक अनुभूती सांगितली. ‘डी.जी.एम्.’ (डेप्युटी जनरल मॅनेजर (उप महाव्यवस्थापक)) तिची मुलाखत घेत होते. तेव्हा मुलाखत झाल्यावर ते म्हणाले, ‘‘तुला बढती मिळाली आहे; पण तुझ्या सुट्यांचे ई-मेल मला अजून मिळाले नाही’’ आणि त्यांना ते ई-मेल मिळालेच नाही. तिची मुलाखत झाली आणि तिला पदोन्नतीही मिळाली. गुरुदेवांच्या कृपेची अनुभूती घेत घेत तिची नोकरी चालू होती.
६. नोकरीसाठी मुंबई येथे आल्यावर मिळालेल्या सदनिकेचा सेवेसाठी पुष्कळ लाभ होणे
पुढे वर्ष २००३ मध्ये २ वर्षांसाठी तिचे मुंबईला स्थानांतर झाले. ती ‘जी.एम्’ (जनरल मॅनेजर (महाव्यवस्थापक)) होती. त्यामुळे तिला मुंबईत प्रभादेवी विभागात ‘ट्विन टॉवर’मध्ये ३ शयन खोल्यांची छान सदनिका (३ बेडरूम्स असलेला फ्लॅट) मिळाली. तिचे घर मध्यवर्ती असल्यामुळे साधनेच्या संदर्भातील सेवेच्या दृष्टीने त्या घराचा पुष्कळ लाभ झाला. तेव्हा ‘अध्यात्मप्रसार, तसेच विज्ञापने आणि अर्पण गोळा करणे’, या सेवा गुरुदेवांच्या कृपेने चांगल्या झाल्या. पुष्कळ नवीन साधक जोडले गेले.’ (क्रमशः)
– श्रीमती पूर्णिमा प्रभु (कै. (सौ.) सुरेखा केणी यांची लहान बहीण, वय ६५ वर्षे), बेंगळुरू, कर्नाटक. (२७.६.२०२२)
याच्या नंतरचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/830869.html
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |