२ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात कै. (सौ.) सुरेखा केणी यांनी साधनेला केलेला आरंभ आणि नोकरी करतांना त्यांना आलेल्या अनुभूती पाहिल्या. आज त्यापुढील भाग पाहूया. (भाग २)
याच्या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/830590.html
७. ‘सेवेसाठी स्वेच्छानिवृत्ती घ्यावी’, असे वाटणे आणि गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे नोकरी करतांनाच पुष्कळ साधक मिळणे
‘सुरेखाची नोकरी चालू होती. तिला नेहमी वाटायचे, ‘स्वेच्छानिवृत्ती घ्यावी, म्हणजे सेवेला पुष्कळ वेळ मिळेल.’ तेव्हा गुरुदेवांनी तिला सांगितले, ‘‘नोकरी करतांनाच तुला पुष्कळ साधक मिळणार आहेत’’ आणि तसेच झाले. ती बेंगळुरू येथे असतांना कार्यालयात नोकरी करणारे, तसेच येणारे-जाणारे, या सगळ्यांना ती साधना सांगायची. त्या वेळी पुष्कळ जणांनी नामजपही चालू केला होता.
८. कार्यालयाच्या उपाहारगृहामध्ये ‘केटरिंग’ची सेवा पुरवणारे ‘कोनार्क’ हॉटेलचे मालक श्री. राममूर्ती सनातनशी जोडले जाणे
सुरेखा त्यांच्या कार्यालयाच्या उपाहारगृहामध्ये केटरिंगची सेवा पुरवणारे ‘कोनार्क’ हॉटेलचे मालक श्री. राममूर्ती यांनाही भेटली. ते धर्माभिमानी होते. ते ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार झाले. त्यांना ‘सनातन प्रभात’चा अंक एवढा आवडायचा की, श्री. राममूर्ती आणि त्यांची पत्नी यांना ‘कधी एकदा अंक वाचतो ?’, असे व्हायचे. अजूनही श्री. राममूर्ती ‘सनातन पंचांग’ आणि ‘सनातन प्रभात’ यांसाठी विज्ञापन देतात.
९. अधिकोषात संगणक पुरवणारे ‘श्री कृती कॉम्प्युटर’ या आस्थापनाचे मालक श्री. केतन शहा ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार आणि विज्ञापनदाते बनणे
सुरेखाच्या अधिकोषात संगणक पुरवणारे ‘श्री कृती कॉम्प्युटर’ या आस्थापनाचे मालक श्री. केतन शहा हे वर्गणीदार आणि विज्ञापनदाते झाले. त्यांनी सनातनच्या आश्रमांसाठी अगदी वाजवी दरात संगणक देणे चालू केले. त्यांचा आपल्याला पुष्कळ लाभ झाला. केतनभाई संस्थेला पुष्कळ साहाय्य करायचे.
१०. कै. (सौ.) सुरेखा यांनी कार्यालयातील १५-२० जणांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट घडवून आणणे आणि त्यानंतर चालू झालेल्या सत्संगातून १५ क्रियाशील साधक निर्माण होणे
कफ परेड (मुंबई) या विभागात सुरेखाचे कार्यालय होते. मी एकदा २२ व्या मजल्यावर तिच्या कार्यालयात गेले होते. तिची छान ‘केबिन’ होती. तेथून संपूर्ण मुंबई दिसायची. तेथे जेवणही छान मिळत असे. तेव्हा तो काळ सुरेखाच्या साधनेसाठी राजयोग होता. तिच्याकडे मोठे पद, मोठे वेतन, छान कार्यालय होते आणि तेथील वातावरणही साधनेला पोषक होते.
वर्ष २००३ मध्ये सुरेखाने आय.डी.बी.आय. च्या कार्यालयातून १५ – २० जणांना देवद (पनवेल) येथील आश्रमात नेले आणि त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट घडवून आणली. (त्यांतील १५ जण पुढे क्रियाशील साधक झाले.) त्यानंतर वर्ष २००४ मध्ये सनातन संस्थेच्या साधकांना कर्मचारी संघटनेने प्रवचन करण्याची संधी दिली. त्या प्रवचनानंतर संघटनेने संस्थेला सत्संग घेण्यासाठी जागाही उपलब्ध करून दिली. तेथे दुपारच्या जेवणाच्या वेळात सत्संग चालू झाला. बाजूला असलेल्या ‘रिझर्व्ह बँके’तूनही काही महिला जेवणाचा डबा लवकर संपवून सत्संगासाठी येत असत. कुणीतरी तक्रार केली. तेव्हा ‘तेथे सत्संग घेऊ शकत नाही’, असे त्यांना सांगण्यात आले. दुसर्या दिवशी नेमके त्यांचे चेअरमन श्री. गोडबोले हे उद्वाहनाजवळ (लिफ्टपाशी) भेटले. सुरेखाने ती संधी सोडली नाही. तिने पुढाकार घेऊन त्यांना याविषयी सांगितले. त्यावर ते म्हणाले, ‘‘तुम्ही माझ्या घरी सत्संग घ्या. माझी पत्नीसुद्धा सहभागी होईल.’’ त्यानंतर श्री. गोडबोले यांच्या घरी सत्संग चालू झाला आणि सौ. गोडबोले संस्थेशी जोडल्या गेल्या.
श्री. गोडबोले सेवानिवृत्त झाल्यानंतर पुन्हा एकदा आय.डी.बी.आय.च्या कार्यालयातील स्टोअर रूममध्ये सत्संगासाठी जागा उपलब्ध झाली आणि सत्संग चालू ठेवला. वर्ष २००६ मध्ये सुरेखा बेंगळुरूला गेल्यावर श्री. जयवंत जगताप यांनी अन्य साधकांच्या साहाय्याने वर्ष २०१७ पर्यंत हा सत्संग चालू ठेवला.
या सत्संगातून सौ. विजया जाधव, सौ. यशोदा शेट्टी, सौ. हेमा कानसे, सौ. वनिता धोत्रे, सौ. तोंडवळकर, श्रीमती जयश्री चुडजी, श्रीमती मोघे, श्री. जयवंत जगताप आणि श्री. आनंद जोशी हे क्रियाशील साधक निर्माण झाले. या साधकांनी आय.डी.बी.आय.चे कार्यालय असलेल्या इमारतीत विज्ञापने आणि अर्पण गोळा करण्याची सेवा केली. या इमारतीत सात्त्विक उत्पादनांचे वितरणही चांगले होत असे.
११. ‘सगळ्या शाळांनी ‘संस्कार वह्या’ घ्याव्यात’, असे वाटणे आणि तसे प्रयत्नही करणे
वर्ष २००६ मध्ये सुरेखा स्वेच्छानिवृत्ती घेऊन बेंगळुरूला आली. तेव्हा ‘सनातन संस्कार वह्यां’चा उपक्रम चालू झाला होता. सुरेखाला वाटायचे, ‘सगळ्या शाळांनी ‘संस्कार वह्या’ घ्याव्यात.’ तिने तसे प्रयत्नही केले. सिंधी शाळेत तिने हा प्रस्ताव मांडला. तेव्हा त्यांनी त्यांच्या शाळेसाठी २ वर्षे ६३ सहस्र वह्या छापून घेतल्या.
१२. रुग्णाईत असतांनाही सेवारत असणे
अ. वर्ष २००६ मध्ये सुरेखाला कर्करोग झाल्याचे निदान झाले, तरीसुद्धा ती सकाळी ९ ते १० या वेळेत २ साधकांसाठी सत्संग घ्यायची.
आ. त्या स्थितीतही तिने स्वतःच्या हातांनी टाके घालून गुरुदेवांसाठी गोधडी शिवली. ती गोधडी पाहून गुरुदेव म्हणाले, ‘‘यांच्यात पुष्कळ भाव आहे. ही गोधडी आपल्या संग्रहालयात ठेवूया.’’
१३. मृत्यू
वर्ष २००९ मध्ये वयाच्या ५३ व्या वर्षी सुरेखाचा मृत्यू झाला. मृत्यूसमयी तिची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के होती.’ (समाप्त)
– श्रीमती पूर्णिमा प्रभु (कै. (सौ.) सुरेखा केणी यांची लहान बहीण, वय ६५ वर्षे), बेंगळुरू, कर्नाटक. (२७.६.२०२२)