Bangladesh Hindu Teachers Forced To Resign : बांगलादेशात ४९ हिंदु शिक्षकांना त्यागपत्र देण्यास भाग पाडले !

त्यागपत्र देताना हिंदु शिक्षक

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात हिंदूंवरील आक्रमणानंतर हिंदु शिक्षक, प्राध्यापक, तसेच सरकारी अधिकारी यांना बलपूर्वक त्यांच्या नोकरीचे त्यागपत्र देण्यास भाग पाडले जात असल्याच्या बातम्या यापूर्वीच समोर आल्या आहेत. आता ४९ हिंदु शिक्षकांना त्यागपत्र देण्यास भाग पाडण्यात आल्याची नवी माहिती समोर आली आहे.

१. ‘बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्‍चन ओक्य परिषदे’ची विद्यार्थी शाखा असलेल्या ‘बांगलादेश छात्र ओक्य परिषदे’चे संयोजक साजिब सरकार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडल्यापासून धार्मिक आणि वांशिक अल्पसंख्यांकांना हिंसाचाराचा सामना करावा लागत आहे. यात लूटमार, महिलांवरील आक्रमणे, मंदिरांची तोडफोड, घरे आणि कामाचे ठिकाण येथे जाळपोळ आणि हत्या यांचा समावेश आहे. देशभरातील अल्पसंख्यांक शिक्षकांना शारीरिक आक्रमणांचा सामना करावा लागला, ज्यामुळे ३० ऑगस्टपर्यंत किमान ४९ शिक्षकांना त्यागपत्र द्यावे लागले; मात्र त्यांपैकी १९ शिक्षकांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे.

२.  बरीशालच्या बेकरगंज शासकीय महाविद्यालयाच्या प्राचार्या शुक्ला राणी हलदर यांच्या कार्यालयावर २९ ऑगस्ट या दिवशी विद्यार्थ्यांच्या आणि बाहेरील लोकांच्या जमावाने आक्रमण केले अन् त्यांच्या त्यागपत्राची मागणी केली. त्यामुळे शुक्ला राणी यांना त्यागपत्र द्यावे लागले. कोर्‍या कागदावर लिहिलेले ‘मी त्यागपत्र देते’, वाक्याचे छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहे.

३. ‘बांगलादेश जातिया हिंदू मोहजोत’ (बी.जे.एच्.एम्.) या बांगलादेशातील २३ धार्मिक संघटनांच्या राष्ट्रीय युतीने सांगितले की, ५ ऑगस्टपासून देशातील ४८ जिल्ह्यांमध्ये २७८ ठिकाणी हिंदु कुटुंबांना हिंसाचाराचा सामना करावा लागला आहे.

४. ‘काझी नजरुल विद्यापिठा’चे प्रा. संजय कुमार मुखर्जी यांनी शिक्षकांचे त्यागपत्र घेतले जात असल्याच्या वृत्ताला दुजारा देत सांगितले की, त्यागपत्र देण्यासाठी माझ्यावर सक्ती करण्यात आली. बांगलादेशात आम्ही फारच असुरक्षित आहोत.

५. ढाका विद्यापिठातील गणित विभागाचे प्राध्यापक डॉ. चंद्रनाथ पोद्दार यांनाही विद्यार्थ्यांनी त्यागपत्र देण्यास भाग पाडले. ज्या शिक्षकांनी भीतीपोटी विद्यापिठामध्ये न येण्याचा निर्णय घेतला होता, त्यांच्या घरी जाऊन जिहादी गटांनी त्यांना त्यागपत्र देण्यास भाग पाडले आहे.

बांगलादेशातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक ! – तस्लिमा नसरीन

पूर्वी बांगलादेशातून पलायन करण्यास भाग पाडण्यास आलेल्या लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, बांगलादेशातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. शिक्षकांना त्यागपत्र देण्यास भाग पाडले जात आहे. पत्रकार, मंत्री आणि माजी सरकारी अधिकारी मारले जात आहेत. त्यांना कारागृहात टाकले जात आहेत. या सर्व प्रकरणात नोबेल पुरस्कार विजेते महंमद यूनुस शांत आहेत.

संपादकीय भूमिका

  • बांगलादेशातील हिंदूंविषयी भारतातील एकही निधर्मी, पुरो(अधो)गामी राजकीय पक्ष, संघटना, तथाकथित विचारवंत तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • बांगलादेशातील ‘जमात-ए-इस्लामी’च्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी ‘बांगलादेशातील हिंदूंना ‘हिंदु’ म्हणून लक्ष्य केले जात नाही’, असा दावा केला होता. हे नेते आता या हिंदु शिक्षकांच्या त्यागपत्राच्या संदर्भात गप्प का ?