Crimes Against Women : महिलांवर अत्‍याचार करणार्‍यांना शिक्षा होण्‍यासाठी कठोर कायदे करणार ! – नरेंद्र मोदी

जळगाव – येथून पुढे महिलांना घरी बसून पोलीस ठाण्‍यात तक्रार प्रविष्‍ट (दाखल) करता येणार आहे. महिलांवरील अत्‍याचार रोखण्‍यासाठी आम्‍ही राज्‍य सरकारसमवेत आहोत. महिला अत्‍याचारांवरील शिक्षेसाठी कठोर कायदे करणार आहोत. महिलांवर अत्‍याचार करणारा गुन्‍हेगार वाचायला नको. त्‍यांच्‍या शिक्षेसाठी कठोर कायदे करण्‍यात येतील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांनी येथे केले. जळगाव येथे २५ ऑगस्‍ट या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते ‘लखपती दीदी’ या योजनेचा शुभारंभ करण्‍यात आला. त्‍या वेळी ते बोलत होते.

मोदी यांनी त्‍यांच्‍या भाषणाला मराठीतून प्रारंभ करत सर्वांना श्रीकृष्‍ण जन्‍माष्‍टमीच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या. या वेळी त्‍यांनी नेपाळमध्‍ये झालेल्‍या बस अपघातातील मृतांना श्रद्धाजंली वाहिली. मोदी यांच्‍या हस्‍ते ११ लाख ‘लखपती दीदी’ यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्‍यात आले. यापूर्वी मोदी यांनी तिथे उपस्‍थित असलेल्‍या महिलांसमवेत संवाद साधला. येथील ‘प्राईम इंडस्‍ट्रियल पार्क’ येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्‍हणाले की,

१. बचत गटासमवेत जोडल्‍या गेलेल्‍या महाराष्‍ट्रातील माझ्‍या बहिणींना मोठे साहाय्‍य झाले आहे. बचत गटांना बँकेच्‍या वतीने कर्ज उपलब्‍ध करून दिले आहे, तसेच त्‍यांच्‍या उत्‍पादनांना योग्‍य बाजारपेठ उपलब्‍ध करून दिली आहे. त्‍यामुळेे बचत गटाच्‍या माध्‍यमातून ३ कोटी ‘लखपती दीदी’ सिद्ध करण्‍याचे आमचे लक्ष्य आहे.

२. महाराष्‍ट्राचे संस्‍कार विश्‍वभरात पोचले आहेत. पोलंड दौर्‍याच्‍या वेळी मला तेथे महाराष्‍ट्राच्‍या संस्‍कृतीचे दर्शन झाले.

३. २ मासांत ११ लाख ‘लखपती दीदी’ सिद्ध झाल्‍या आहेत. महाराष्‍ट्रात ही संख्‍या १ लाख आहे. केंद्र सरकारने महिलांच्‍या हिताचे निर्णय घेतले आहेत. आता आम्‍ही त्‍यांना २० लाख रुपयांपर्यंत मुद्रा कर्ज देणार आहोत.

४. आमच्‍या सरकारच्‍या काळात ९ लाख कोटी रुपयांचे साहाय्‍य देशातील जनतेला देण्‍यात आले आहे. सरकार जे साहाय्‍य देते त्‍यांत ३० टक्‍के वाढ करण्‍यात आली आहे.

५. देशभरातील लाखो बचत गटांशी जोडल्‍या गेलेल्‍या माझ्‍या बहिणींना ६ सहस्र ४०० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. महाराष्‍ट्रातील लाखो बहिणींना या माध्‍यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळणार आहे.

‘लखपती दीदी योजना’ काय आहे ? 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्‍वातंत्र्यदिनाच्‍या भाषणात या योजनेची घोषणा केली होती. या योजनेच्‍या अंतर्गत देशभरातील २ कोटी महिलांना कौशल्‍य विकास प्रशिक्षण दिले जाते. प्‍लंबिंग, एल्.ई.डी बल्‍ब बनवणे, ड्रोन चालवणे आणि दुरुस्‍ती करणे अशा अनेक कौशल्‍यांचे प्रशिक्षण महिलांना दिले जाते. ही योजना प्रत्‍येक राज्‍यातील स्‍वयं-साहाय्‍यता गटांद्वारे चालवली जाते.

राज्‍यातील ५० लाख महिलांना लखपती बनवणार ! – अजित पवार, उपमुख्‍यमंत्री

अजित पवार

अजित पवार म्‍हणाले की, मोदींच्‍या नेतृत्‍वातील विकासाचा रथ जळगावात आला आहे. मी आजपर्यंतच्‍या माझ्‍या राजकीय जीवनात एवढ्या प्रचंड संख्‍येने महिलांनी महाराष्‍ट्रात पंतप्रधानांचे स्‍वागत केल्‍याचे पाहिले नव्‍हते. देशातील ३ कोटी महिलांना लखपती बनवण्‍याचे पंतप्रधान मोदी यांचे स्‍वप्‍न आहे. महाराष्‍ट्रातील ५० लाख महिलांना लखपती बनवणार आहे.

वर्ष २०२६ पासून देशाचा कारभार महिलांकडे देणार !- देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री

देवेंद्र फडणवीस

उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस म्‍हणाले की, महिलांना संधी दिली, तर त्‍या विश्‍व बदलू शकतात. महिला अर्थव्‍यवस्‍थेचा मुख्‍य प्रवाहात आल्‍या तरच विकास होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्‍हणाले की, देशाचा कारभार वर्ष २०२६ पासून महिलांकडे देणार आहेत. महाराष्‍ट्रातील ७५ लाख परिवार हे बचत गटापासून जोडले आहे. २ कोटी जनतेला बचत गटाशी जोडण्‍याचा सरकारचा मानस आहे.

पंतप्रधान मोदी यांचा महिलांना सक्षम करण्‍याचा निर्धार ! – शिवराजसिंह चौहान, केंद्रीय कृषीमंत्री

शिवराजसिंह चौहान

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान म्‍हणाले की, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असतांना इतक्‍या मोठ्या प्रमाणात महिला पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऐकण्‍यासाठी जमल्‍या. पंतप्रधान मोदींचा महिलांना सक्षम करण्‍याचा निर्धार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्‍वप्‍न पूर्ण करण्‍यासाठी आपण सर्वांनी त्‍यांना साथ द्यावी.

लाडकी बहिण योजनेमुळे महिला आनंदी ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

एकनाथ शिंदे

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे म्‍हणाले की, लाडकी बहिण योजनेमुळे महिला आनंदी झाल्‍या आहेत. जळगाव ही सोन्‍याची भूमी असून माझ्‍या बहिणी सोन्‍यापेक्षा सरस आहेत. आमच्‍या सरकारकडून महिलांना ३ सिलिंडर निःशुल्‍क देण्‍यात येत आहेत. मोदींच्‍या काळात १० कोटी महिला स्‍वावलंबी झाल्‍या आहेत.