Badlapur School Crime : वकीलपत्र घेण्‍यास कल्‍याण न्‍यायालयातील अधिवक्‍त्‍यांचा नकार !

बदलापूर येथील अत्‍याचार प्रकरण

बदलापूर – येथे बालिकांवर झालेल्‍या अत्‍याचाराच्‍या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे वकीलपत्र घेण्‍यास कल्‍याण न्‍यायालयातील अधिवक्‍त्‍यांनी नकार दिला आहे. त्‍यासह बदलापूर रेल्‍वे पोलिसांनी अटक केलेल्‍या आंदोलकांवर नोंदवलेल्‍या अजामीनपात्र गुन्‍ह्यांविरोधातही अधिवक्‍ते आक्रमक झाले आहेत. ‘आंदोलकांवरील गुन्‍हे मागे घेण्‍यात यावेत’, अशी मागणी त्‍यांनी केली आहे.

अधिवक्‍त्‍यांच्‍या संघटनेची रोखठोक भूमिका !

समाजासाठी घातक आरोपी बाहेर येऊच नयेत, यासाठी आम्‍ही अशी भूमिका घेतली !

अधिवक्‍त्‍यांनी सांगितले, ‘‘आम्‍ही जी भूमिका परवा घेतली, तीच आज आणि उद्या असणार आहे. बदलापूरमध्‍ये घडलेले कृत्‍य निंदनीय आहे. पशूंनाही लाजवणारे हे कृत्‍य आहे. साडे तीन वर्षाच्‍या मुलीचे वय हे अंगाखांद्यावर खेळायचे आहे. अशा मुलींवर अतिप्रसंग करणे हे अत्‍यंत घातक आहे. असे आरोपी समाजामध्‍ये वावरणे हे समाजाला घातक आहे. म्‍हणून असे आरोपी बाहेर येऊच नयेत, यासाठी आम्‍ही प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. त्‍यामुळे आमच्‍या संघटनेने निर्णय घेतला आहे की, बलात्‍काराच्‍या प्रकरणातील आरोपीचे वकीलपत्र घ्‍यायचे नाही.’’