पुणे गणेशोत्सवातील पावित्र्य आणि संस्कृती जपण्याचे आवाहन !

गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीतील मत

संग्रहित छायाचित्र

पुणे – गणेशोत्सवात विशेषत: विसर्जन मिरवणुकीमध्ये मद्यपींकडून होणार्‍या धांगडधिंग्यांमुळे उत्सवाचे स्वरूप पालटत आहे. त्यामुळे शहराची संस्कृती आणि उत्सवाचे पावित्र्य जपण्यासाठी मंडळांचे पदाधिकारी अन् कार्यकर्ते पुढे आले आहेत. या वेळी मिरवणुकीमध्ये गोंधळ घालणार्‍या मद्यपींवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी केली. ‘सकाळ समूहा’ने आयोजित केलेल्या बैठकीत गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी व्यसनाधीनतेचा विषय प्रकर्षाने मांडला.

पुणे शहरातील गणेशोत्सव आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवलेला असा उत्सव आहे. त्यासाठी जगभरातून भाविक पुण्यात येतात; परंतु गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सव मिरवणुकीचे स्वरूप पालटत आहे. शहरामध्ये अमली पदार्थांचे व्यसन करणार्‍यांची संख्या वाढत आहे. त्याचा तरुण पिढीवर वाईट परिणाम होत आहे. मिरवणूक शांततेत आणि समयमर्यादेनुसार होण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाई करावी, तसेच मद्यपान करून गोंधळ घालणार्‍यांचा बंदोबस्त करावा. ज्या युवा पिढीच्या जिवावर उत्सव साजरा केला जातो, ती युवा पिढी व्यसनांपासून दूर असली, तरच उत्सवही आनंदात आणि चांगल्या पद्धतीने साजरा होणार आहे. पुणे शहराची संस्कृती आणि पावित्र्य टिकवण्याचे काम मंडळांतील प्रत्येक कार्यकर्त्याचे आहे, असे मत उपस्थित कार्यकर्त्यांनी मांडले.

मद्यपींवर कारवाई करण्यासाठी पोलिसांची स्वतंत्र पथके नेमू !प्रवीणकुमार पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त

विसर्जन मिरवणुकीमध्ये धांगडधिंगा करणार्‍या मद्यपींवर कारवाई करण्यासाठी पोलिसांची स्वतंत्र पथके नेमण्यात येतील. त्यासाठी मंडळांनी स्वयंसेवक नेमून पोलिसांना सहकार्य करावे, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी सांगितले.