RSS Bangladesh Hindus : विविध देशांतील हिंदूंना नष्‍ट करण्‍याचे प्रयत्न केले जात आहेत ! – दत्तात्रेय होसबाळे, रा.स्‍व. संघाचे सरकार्यवाह

रा.स्‍व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांचे विधान

दत्तात्रेय होसबाळे

बेंगळुरू (कर्नाटक) – विविध देशांतील हिंदूंना नष्‍ट करण्‍याचे प्रयत्न केले जात आहेत, असे विधान राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे सरकार्यवाह (सरचिटणीस) दत्तात्रेय होसबाळे यांनी केले आहे. ते येथे संघाच्‍या एका कार्यक्रमात बोलत होते.

होसबाळे म्‍हणाले की, जगात अनेक ठिकाणी हिंदूंच्‍या मानवी हक्‍कांचे हनन केले जात आहे. त्‍याविषयी आवाज उठवावा लागेल. जगातील विविध भागांतील हिंदू ते रहात असलेल्‍या देशांच्‍या विकासात योगदान देत आहेत. ते नियमांचे पालन करतात आणि शांततेने रहातात, ही अभिमानाची गोष्‍ट आहे. अजूनही विविध देशांतून हिंदूंना संपवण्‍याचे प्रयत्न चालू आहेत. बांगलादेशात काय चालले आहे, ते आपण पहात आहोत. भारत सरकार हिंदूंच्‍या रक्षणासाठी प्रयत्न करत आहे. बांगलादेशमध्‍ये हिंदु, बौद्ध आणि इतर धार्मिक अल्‍पसंख्‍यांकांचे संरक्षण झाले पाहिजे. हिंदू कुणाच्‍या विरोधात नाही, तर स्‍वतःच्‍या सुरक्षेसाठी एकत्र येत आहेत.

संपादकीय भूमिका

भारतासह जगभरातील हिंदूंच्‍या रक्षणासाठी हिंदू आणि त्‍यांच्‍या विविध संघटना यांनी संघटित होऊन प्रयत्न केले पाहिजेत अन् सरकारवरही यासाठी दबाव निर्माण केला पाहिजे !