आध्यात्मिक त्रासांवर मात करण्यासाठी उपयुक्त दृष्टीकोन

सनातनचा लघुग्रंथ ‘आध्यात्मिक त्रासांवर मात करण्यासाठी उपयुक्त दृष्टीकोन’ यातील काही दृष्टीकोन ६ ऑगस्ट या दिवशी पाहिले. आज पुढील दृष्टीकोन पाहूया.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/821799.html

पू. संदीप आळशी

६. आध्यात्मिक त्रासांवर मात करता येण्यासाठी उपयुक्त ठरणारे दृष्टीकोन

६ आ ८. त्रासांमुळे कृतज्ञताभाव वाढण्यास साहाय्य होणे

अ. ‘साधकांमध्ये असलेले स्वभावदोष आणि अहं यांचा लाभ घेऊन वाईट शक्ती साधकांचे त्रास वाढवतात. मात्र असे झाल्याने साधकांमध्ये स्वभावदोष आणि अहं दूर करण्याविषयी गांभीर्य वाढण्यास साहाय्य होते.

आ. साधकांना त्रास भोगावे लागत असल्यामुळे त्यांचे जीवनातील प्रारब्ध नष्ट होत असते. पुढे आपत्काळ ओसरल्यावर अशा साधकांचा प्रारब्धाचा मोठा हिस्सा भोगून संपलेला असल्याने, तसेच आपत्काळातील त्रासांमुळे शरीर आणि मन यांची दुःखांप्रती प्रतिकारक्षमता आधीच वाढलेली असल्यामुळे पुढे साधनेतील अडथळ्यांवर मात करणे त्यांना सोपे जाईल. यामुळे त्यांची आध्यात्मिक प्रगती लवकर होण्यास साहाय्य होईल.

इ. आरंभी त्रासांमुळे कंटाळा येतो, सेवा आणि साधना यांतील उत्साह अल्प होतो, मन दुःखी होते आणि मनाला नकारात्मकता किंवा निराशा येते. तेच तेच त्रास परत परत व्हायला लागले की, मनाला हळूहळू त्या त्रासांची सवय होते. त्यामुळे त्या त्रासांमुळे मनाला होणारी दुःखाची संवेदना हळूहळू अल्प होते किंवा नष्ट होते. थोडक्यात मन साक्षीभावाने त्रासांकडे पहायला शिकते. साधनेमध्ये साक्षीभावाचा टप्पा ८० टक्के आध्यात्मिक पातळीच्या पुढे साध्य होतो. त्रास असलेल्या साधकांमध्ये मात्र अल्प आध्यात्मिक पातळीलाच ‘त्रासांकडे साक्षीभावाने पहाण्याची वृत्ती’ निर्माण होत असल्यामुळे पुढे त्यांना साधनेत साक्षीभावाचा टप्पा लवकर गाठण्यास सोपे होते.

यासाठी साधकांनी त्रासांपुढे हतबल न होता उलट त्रासांप्रती कृतज्ञताच बाळगायला हवी. परात्पर गुरु डॉक्टरांची साधकांवर कृपा असल्यामुळे साधकांना त्रासांची तेवढी झळ बसत नाही आणि त्रास सुसह्य होण्यास साहाय्यही होते. यासाठी साधकांनी परात्पर गुरु डॉक्टरांप्रतीही अनन्यभावे कृतज्ञ असायला हवे.’

– (पू.) श्री. संदीप आळशी (२.११.२०१८)

सनातनच्‍या लघुग्रंथाचे मुखपृष्‍ठ

ई. कुंती भगवंताला म्हणाली, ‘‘संकटांमध्येच मला तुझी अधिक आठवण येते; म्हणून तू मला अधिकाधिक संकटेच दे.’’ त्रास असणार्‍या साधकांनी कुंतीप्रमाणे देवाकडे दुःख मागू नये; पण ‘दुःखामुळे भगवंताचे अधिक स्मरण करण्याचे भाग्य लाभले’, असा विचार करून देवाप्रती कृतज्ञताभाव वाढवावा. साधकांनी त्रासांतही नामजप, भावजागृतीचे प्रयत्न किंवा सेवा करत रहायचा प्रयत्न करावा. यामुळे दुःखाचेही दुःख वाटणार नाही आणि साधनाही होईल.

६ इ. त्रासांमुळे पुनःपुन्हा चुका झाल्यास निराश न होणे : त्रास असणार्‍या साधकांचे मन आणि बुद्धी यांवर सूक्ष्म त्रासदायक आवरण सारखे सारखे येत असते. त्यामुळे बर्‍याचदा अशा साधकांकडून त्याच त्याच चुका पुनःपुन्हा होतात. उपाययोजना काढूनही परत परत त्याच त्याच चुका झाल्यामुळे काही साधकांना निराशा येते. अशा चुका होण्यामागील मुख्य कारण ‘मन आणि बुद्धी यांवर सूक्ष्म त्रासदायक आवरण येणे’, हे असल्याने साधकांनी निराश होऊ नये. आता चुका होत असल्या, तरी त्याविषयी सतर्कता बाळगून परत परत योग्य उपाययोजना काढल्यामुळे त्याचा चित्तावर संस्कारच होतो. हा संस्कार अनेकदा होत असल्यामुळे पुढे त्रासाचा प्रभाव ओसरला की, तशा प्रकारच्या चुका पुन्हा होणार नाहीत, याची निश्चिती बाळगावी.

६ ई. त्रास असणार्‍या साधकांनी अती चिंता किंवा अती चिंतन टाळणे : ‘मध्यम ते तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांवर त्रासाचा अल्प ते अधिक प्रमाणात पगडा असतो. त्यामुळे त्यांच्याकडून साधनेचे प्रयत्न परिपूर्ण होण्यात थोड्या मर्यादा येतात. आध्यात्मिक त्रास असणारे काही साधक साधनेच्या प्रयत्नांच्या संदर्भात अती चिंता किंवा अती चिंतन करतात. अती चिंता करण्यामुळे अनावश्यक विचार किंवा ताण वाढून आध्यात्मिक त्रासांत वाढ होते. यासाठी अशा साधकांनी ‘साधनेच्या प्रयत्नांच्या संदर्भात किंवा स्वतःला प्रतिकूल वाटणार्‍या प्रसंगांच्या संदर्भात अती चिंता किंवा अती चिंतन न करता साधनेच्या दृष्टीने आवश्यक तेवढे चिंतन करून आणि त्यातून शिकून साधना करत रहाणे’, हे अधिक योग्य आहे. अती चिंता किंवा अती चिंतन टाळण्यासाठी शक्य असेल, तर लगेच दायित्व असलेल्या साधकाचे दिशादर्शन घ्यावे. परिणामी आपल्या मनाची ऊर्जा वाचते आणि योग्य दृष्टीकोनही शिकायला मिळतो.

‘आपल्याला साधनेतील सर्व परिपूर्णच जमले पाहिजे’, हा दुराग्रह बाळगू नये. ‘तीव्र स्वरूपातील एखादा स्वभावदोष किंवा अहंचा पैलू यांवर लवकर मात करता येत नाही’, याचा अर्थ ‘आपली साधनाच होत नाही’, असे नाही; कारण तो एकूण साधनेचा एक लहानसा भाग असतो. नामजप, सेवा, भावजागृतीचे प्रयत्न यांसारख्या अन्य प्रयत्नांनीही आपली साधना होतच असते. त्यामुळे ‘साधनेचे प्रयत्न परिपूर्णतेने जमत नाहीत’; म्हणून वाईट वाटून न घेता ‘ते परिपूर्ण जमण्यासाठी प्रयत्न करत रहाणे’, ही साधनाच आहे’, असा विचार करावा. पुढे आध्यात्मिक त्रास अल्प झाल्यावर सर्व प्रयत्न परिपूर्णतेने करायला जमतील.’

– (पू.) श्री. संदीप आळशी (१४.२.२०२१)

६ उ. त्रासांच्या आहारी न जाता मनोबल वाढवून त्रासांशी झुंजणे : ‘बरेच साधक त्रासांच्या आहारी जातांना दिसतात, उदा. त्रास वाढला की, दुःखी वा नकारात्मक होणे, ‘त्रास आहे’ म्हणून सेवेत सवलत घेणे, ‘त्रास आहे’ म्हणून झोपून रहाणे, ‘आध्यात्मिक उपाय करूनही त्रास अल्प होत नाही’, या विचाराने उपाय करण्याची टाळाटाळ करणे किंवा ते मनापासून न करणे.

बहुतांशी क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांना साधना ठाऊक नव्हती, त्यांचे कुणी गुरु नव्हते, तसेच त्यांना संरक्षण पुरवणारेही विशेष कुणी नव्हते. असे असतांनाही ते धीरोदात्तपणे लढले. सनातनचे साधक साधना करत असल्याने त्यांचा पाठीराखा भगवंत आहे, परात्पर गुरु डॉक्टरांसारखे साधकांची स्थुलातून आणि सूक्ष्मातून काळजी घेणारे महान गुरु आहेत अन् साधकांनी देवाच्या अनुभूतीही घेतल्या आहेत. तरीही साधक त्रासांपुढे एवढे हतबल का होतात ? वाईट शक्ती त्यांचे काम चोखपणे करतात, पण साधक आपले काम, म्हणजे साधना चोखपणे करत नाहीत, हेच याचे उत्तर आहे !

परात्पर गुरु डॉक्टर समष्टी आध्यात्मिक त्रासांचे आघात स्वतःवर झेलतात; म्हणून त्या त्रासांची झळ साधकांना विशेष लागत नाही. ‘आपण नामजप आदी आध्यात्मिक उपाय परिणामकारपणे केले, तर परात्पर गुरु डॉक्टरांवर होणारे समष्टी आध्यात्मिक त्रासांचे आघात अल्प होतील’, याचा विचार साधकांनी करायला हवा. मनापासून आणि भावपूर्ण आध्यात्मिक उपाय करणे, ही साधकांची साधनाच आहे !’ – (पू.) श्री. संदीप आळशी (२३.३.२०१५)

६ ऊ. लहानसहान शारीरिक आणि मानसिक त्रासांकडे दुर्लक्ष न करणे : ‘शारीरिक आणि मानसिक त्रास वाढले की, साधना नीट होत नाही’, हे सत्य लक्षात घेऊन शारीरिक आणि मानसिक त्रासांविषयी सतर्क राहून ते अल्प स्वरूपात असतांनाच त्यांच्यावर परिणामकारक उपाययोजना करावी.

६ ए. त्रास न्यून न होण्यामागील कारणांचे चिंतन करणे : ‘आध्यात्मिक त्रास असणारे बरेच साधक ‘त्रास आहे’; म्हणून केवळ आध्यात्मिक उपायांवरच भर देतात; पण ‘उपाय गुणवत्तापूर्ण होतात का ? त्रास बळावण्यामागील स्वभावदोष दूर करण्यासाठी तळमळीने प्रयत्न होतात का ? (लहानशा स्वभावदोषामुळेही त्रास बळावू शकतो.)’ इत्यादी गोष्टींचा जास्त विचार करत नाहीत. त्यामुळे त्यांचा त्रास लवकर अल्प होत नाही. त्रास असणार्‍या साधकांनी वरीलप्रमाणे चिंतन केल्यास त्रास दूर करण्यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळण्यास साहाय्य होईल. साधकांना आवश्यकता भासल्यास हे चिंतन करण्यासाठी ते कुटुंबीय किंवा सेवांचे दायित्व असलेले साधक यांचे साहाय्य घेऊ शकतात.’

- (पू.) श्री. संदीप आळशी (२६.८.२०२०)

(क्रमशः)

(वाचा : सनातनचा लघुग्रंथ ‘आध्यात्मिक त्रासांवर मात करण्यासाठी उपयुक्त दृष्टीकोन’)                                             

सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने यांच्या ऑनलाईन खरेदीसाठी – http://SanatanShop.com

संपर्क क्र. : ९३२२३ १५३१७

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/822446.html

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.