हिंदु राष्ट्र-स्थापनेचा काळ जवळ येत असल्याने वाईट शक्तींचा प्रकोप झाला आहे. आज जवळजवळ प्रत्येकालाच अल्प-अधिक प्रमाणात वाईट शक्तींचा त्रास आहेच. काही जणांचे आजार पुष्कळ औषधोपचार करूनही बरे होत नाहीत. काही जण सांसारिक अडचणींनी अती त्रस्त होतात. काही जणांना वारंवार अकारण नकारात्मकता किंवा निराशा येते आणि अती निराशेमुळे काहींच्या मनात ‘आता जीवनाचा अंत करूया’, असे टोकाचे विचारही येतात. बरेच साधक आध्यात्मिक त्रास दूर करण्यासाठी नामजप इत्यादी ‘आध्यात्मिक उपाय’ करतात; पण वाईट शक्ती ‘साधकांकडून आध्यात्मिक उपाय परिणामकारक होऊ नयेत’, यासाठीही प्रयत्न करतात. त्यामुळे साधकांचे त्रास लवकर अल्प होत नसल्याने त्यांना हळूहळू उपायांमध्येही स्वारस्य वाटेनासे होते. ‘आध्यात्मिक त्रास होणे’, हे जरी आपल्या हातात नसले, तरी ‘आध्यात्मिक उपायांनी त्रास नियंत्रणात ठेवणे आणि हळूहळू ते संपुष्टात आणणे’, हे आपल्या हातात आहे. यासाठी त्रासांकडे पहाण्याची स्वतःची दृष्टी पालटावी लागते. ‘आध्यात्मिक उपायांनी आपण त्रासांवर नक्की मात करू शकतो’, हा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करावा लागतो. प्रस्तुत लेखमालिकेत दिलेले बहुतांशी दृष्टीकोन हे सर्वांनाच उपयोगी पडणारे आहेत. ‘त्यांच्या अभ्यासाने त्रास असलेल्यांना त्रासांवर मात करण्याची प्रेरणा अन् दिशा मिळो आणि त्यांच्याकडून चांगली साधना होऊन त्यांचे जीवन आनंदी बनो’, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !’ – संकलक
१. ‘आध्यात्मिक त्रास’ म्हणजे काय ?
अध्यात्मानुसार व्यक्तीची प्रकृती ही सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांनी बनलेली असते. सत्त्वगुण हा मनाला स्थिरता देणारा, आनंददायी अन् व्यक्तीचा प्रवास ईश्वरतत्त्वाकडे होण्यास पूरक असतो. रज आणि तम हे गुण सत्त्वगुणाच्या विरुद्ध असतात. व्यक्तीमध्ये रज आणि तम या गुणांचे आधिक्य झाले, तर त्याचा अनिष्ट परिणाम व्यक्तीवर होतो. यालाच ‘व्यक्तीला आध्यात्मिक त्रास आहे’, असे म्हणतात. प्रामुख्याने भुवर्लोक आणि सप्तपाताळ यांमध्ये वास करणार्या वाईट शक्ती (त्रासदायक सूक्ष्म-देह म्हणजे लिंगदेह), भुवर्लोकात रहाणारे पूर्वजांचे अतृप्त लिंगदेह आणि ग्रहांचे अशुभ योग यांच्यामुळे व्यक्तीला आध्यात्मिक त्रास होतो.
सध्याच्या कलियुगात मनुष्याच्या जीवनातील शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक यांसारख्या ८० टक्के समस्यांच्या मुळाशी काही ना काहीतरी आध्यात्मिक कारण (उदा. वाईट शक्तींचा त्रास, अतृप्त पूर्वजांचा त्रास, प्रारब्ध) असतेच. सध्याच्या काळात वाईट शक्तींचा तर प्रकोप झाला आहे. त्यामुळे जवळजवळ प्रत्येकालाच अल्प-अधिक प्रमाणात वाईट शक्तींचा त्रास आहेच किंवा आज जरी होत नसला तरी भविष्यात होऊ शकतो.
२. सध्याच्या काळात सनातनच्या साधकांना वाईट शक्तींचे त्रास अधिक प्रमाणात होण्यामागील कारण
सध्याच्या कलियुगात अधर्मी वाईट शक्ती भूतलावर ‘आसुरी राज्य’ स्थापण्यासाठी प्रयत्नशील आहेत, तर सनातनचे साधक समष्टी साधनेद्वारे, म्हणजे समाजात अधिकाधिक धर्माचा प्रसार करून सर्वांसाठी कल्याणकारक असे ‘हिंदु राष्ट्र (कलियुगांतर्गत सत्ययुग, म्हणजेच ईश्वरी राज्य)’ स्थापण्यासाठी प्रयत्न करत आहेत. साधक त्यांच्या या ध्येयापासून परावृत्त व्हावेत यासाठी वाईट शक्ती साधकांना शारीरिक, मानसिक, कौटुंबिक अशा विविध स्तरांवर त्रास देत आहेत, तसेच त्यांच्या धर्मप्रसाराच्या सेवेत अडथळेही आणत आहेत. या दृष्टीने साधकांकरता हा सूक्ष्मातील आपत्काळच चालू आहे. सूक्ष्मातून वाईट शक्तींना हरवल्याविना स्थुलातून हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ शकत नाही. यासाठी सनातनचे साधक गुरुकृपेच्या बळावर, संत अन् देवता यांच्या आशीर्वादाने आणि नामजप इत्यादी साधनेद्वारे वाईट शक्तींशी सूक्ष्मातून लढत आहेत.
३. आध्यात्मिक त्रासांची काही लक्षणे
आध्यात्मिक त्रास सूक्ष्मातून होत असले, तरी ‘आध्यात्मिक त्रास आहे कि नाही’, हे ओळखण्याची लक्षणेही असतात. अशी काही लक्षणे पुढे दिली आहेत.
३ अ. शारीरिक लक्षणे : कोणतेच कारण नसतांना ‘थकवा येणे, डोके जड होणे, चक्कर येणे, भूक न लागणे’, तसेच योग्य औषधोपचार आणि पथ्यपाणी कित्येक मास (महिने) किंवा वर्षे करूनही शारीरिक विकार बरे न होणे इत्यादी.
३ आ. मानसिक लक्षणे : कोणतेच कारण नसतांना ‘चिडचिड होणे, नकारात्मकता किंवा निराशा येणे, निरुत्साह जाणवणे, तसेच साधनेतील मार्गदर्शक, देवता किंवा साधना यांच्याविषयी विकल्प निर्माण होणे’ इत्यादी.
३ इ. बौद्धिक लक्षणे : अकारण गोंधळून जाणे, समोरची व्यक्ती बोलत असतांना त्याचे आकलन न होणे इत्यादी.
३ ई. कौटुंबिक लक्षणे : सातत्याने लहानसहान प्रसंगांतही कुटुंबियांमध्ये मतभेद किंवा अपसमज निर्माण होऊन एकमेकांविषयी दुरावा, संशय किंवा वैर निर्माण होणे; कुटुंबातील काही सदस्यांना व्यसन लागणे; कुटुंबात सतत कुणी ना कुणी तरी व्याधीग्रस्त असणे इत्यादी.
३ उ. अन्य लक्षणे : वारंवार वाईट स्वप्ने पडणे, एखादे स्तोत्र म्हणतांना अकारण जांभया येणे, नामजप न होणे, अचानक साधना सोडावीशी वाटणे इत्यादी.
वरीलपैकी एक किंवा अनेक त्रास होत असल्यास ‘आपल्याला वाईट शक्तींचे त्रास होत आहेत’, असे समजावे. ‘आपल्याला वाईट शक्तींमुळे एखादा त्रास होत आहे का ?’, हे लक्षात येत नसल्यास चांगली साधना असणार्या आणि सूक्ष्मातील जाणू शकणार्या साधकाला किंवा संतांना याविषयी विचारता येते.
४. आध्यात्मिक त्रासांवर मात करणे का आवश्यक ?
आध्यात्मिक त्रासांमुळे व्यक्तीकडून आध्यात्मिक उन्नतीसाठी करायचा नामजप आणि अन्य साधनाही नीट होऊ शकत नाही. व्यक्ती करत असलेल्या साधनेची शक्ती अधिकतर त्रासांशी लढण्यात व्यय (खर्च) होते. साधना व्यय होत असल्यामुळे अशा व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती लवकर होत नाही. याउलट आध्यात्मिक त्रास दूर झाल्यावर व्यक्तीचे जीवन आनंदी होते, तसेच तिची साधनाही चांगली होते. यासाठी सर्वांनीच प्राधान्याने आध्यात्मिक त्रास दूर करण्यासाठी नामजप इत्यादी आध्यात्मिक उपाय करणे अत्यावश्यक असते.
५. आध्यात्मिक त्रासांवर मात करण्याचे
प्रभावी अस्त्र : आध्यात्मिक उपाय !
आध्यात्मिक त्रास दूर करण्यासाठी योजावयाच्या उपायांना ‘आध्यात्मिक उपाय’, असे म्हणतात. नामजप करणे, मंत्रपठण करणे, रिकाम्या खोक्यांचे उपाय करणे इत्यादी आध्यात्मिक उपायांचे विविध प्रकार आहेत.
(क्रमशः)
(वाचा : सनातनचा लघुग्रंथ ‘आध्यात्मिक त्रासांवर मात करण्यासाठी उपयुक्त दृष्टीकोन’)
सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने यांच्या ऑनलाईन खरेदीसाठी – http://SanatanShop.com
संपर्क क्र. : ९३२२३ १५३१७
|
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/821799.html