पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – पंढरपूर येथील ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती’चे बहुचर्चित व्यवस्थापक बालाजी पांडुरंग पुदलवाड यांचे स्थानांतर झाले आहे. बालाजी पुदलवाड यांची माढा तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पंढरपूर येथील तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या मनोज बाळकृष्ण श्रोत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुदलवाड यांचा कारभार वादग्रस्त होता. त्यांच्या कारभारावर अनेक वेळा वारकर्यांनी खेद व्यक्त केला होता, विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आंदोलन केले होते. मंदिर आवारात कीर्तन बंद करण्याचा आदेश, लेखापरीक्षकांनी लेखापरीक्षणात समितीवर ओढलेले विविध ताशेरे, तसेच अन्य कारणांमुळे वारकर्यांचा त्यांच्यावर रोष होता. त्यांच्या कार्यकाळात मंदिरातील विविध गैरव्यवस्थापनाविषयी हिंदु विधीज्ञ परिषद, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समिती यांनी विविध निवेदने, आंदोलने यांच्या माध्यमातून आवाज उठवला होता.
वारकरी-भाविकांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी प्रयत्न करू ! – मनोज बाळकृष्ण श्रोत्री
व्यवस्थापक पदाचा कार्यभार स्वीकारल्यावर दैनिक ‘सनातन प्रभात’शी बोलतांना मनोज श्रोत्री म्हणाले, ‘‘पांडुरंग हे महाराष्ट्राचे आराध्य आहे. येथे येणार्या सामान्य वारकरी भाविकांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहू. येथे येणार्या प्रत्येक वारकर्यास अल्प कालावधीत आणि लवकरात लवकर दर्शन कसे मिळेल, मंदिराचा नावलौकिक कसा वाढेल यांसाठी प्रयत्न करू.’’