मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना पुणे न्यायालयाकडून अजामीनपात्र अटकेची नोटीस !

नाटक निर्मात्याची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप !

मराठा आंदोलक मनोज जरांगे

पुणे – मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या विरोधात पुणे न्यायालयाने अजामीनपात्र नोटीस (वॉरंट) जारी केली आहे. नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप मनोज जरांगे यांच्यावर करण्यात आला आहे. याविषयी जरांगेसह अन्य २ व्यक्तींवर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यापूर्वीही न्यायालयाने २ वेळा नोटीस बजावली होती. मराठा आंदोलनांमुळे ते न्यायालयात उपस्थित राहिले नव्हते.
मनोज जरांगे, अर्जुन जाधव आणि दत्ता बहिर यांनी वर्ष २०१३ मध्ये नाटकाचे आयोजन केले होते. नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी या तिघांवर आर्थिक फसवणूक केल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी धनंजय घोरपडे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. जरांगे सुनावणीसाठी गैरहजर होते. न्यायालयाने त्यांना ५०० रुपयांचा दंड केला होता, तसेच पुढील सुनावणीसाठी नियमित हजर रहाण्याचे निर्देश देत अगोदरची अटक नोटीस रहित केली होती. आताही ते अनुपस्थित राहिल्याने न्यायालयाने पुन्हा अजामीनपात्र नोटीस जारी केली आहे.