मनोज जरांगे यांनी महाविकास आघाडीची सुपारी घेतली आहे ! – प्रवीण दरेकर, गटनेते, विधान परिषद

देवेंद्र फडणवीस, जरांगे आणि प्रवीण दरेकर

मुंबई – मनोज जरांगे यांचे आवाहन स्वीकारले आहे. मराठ्यांच्या जिवावर ते असे बाळबोध आव्हान करत आहेत. या सगळ्याच्या पाठीमागे कोण वरिष्ठ नेते आहेत, ते लपून राहिलेले नाही. जरांगे पाटील यांना सत्तेची आस लागली आहे. त्यांच्या विधानातून हे आता स्पष्ट होत आहे. त्यांच्या या ‘नौटंकी’पुढे आता मराठा समाज झुकणार नाही. मनोज जरांगे यांनी महाविकास आघाडीची सुपारी घेतली आहे, अशी टीका विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी २४ जुलै या दिवशी पत्रकार परिषदेत केली.

दरेकर या वेळी म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या भावनांशी खेळ मांडला आहे. त्यांना आता सत्तेची आस लागलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावरील मराठा समाजाचा विश्वास उडाला आहे. प्रथम जरांगे यांनी कुणबी नोंदीचा विषय मांडला. त्यामध्ये सरकारने पुढाकार घेतला. त्यानंतर सगेसोयरेंचा विषय आला. त्यावरही सरकारने सकारात्मकता दाखवली. त्या दृष्टीने कामेही चालू झाली आहेत; परंतु आता महाविकास आघाडीला विधानसभेत कसे साहाय्य होईल, या दिशेने जरांगे यांची पावले पडत आहेत.

जरांगे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे ! – फडणवीस, उपमुख्यमंत्री

मागच्या वेळी उपोषण सुटल्यावर ते माझ्या आईविषयी बोलले होते, नंतर त्यांनी क्षमा मागितली. आता पुन्हा त्यांचा संताप झाला आहे. उपोषणामुळे पुन्हा त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. गुन्ह्यामध्ये अजामीनपात्र पात्र वॉरंट निघतो, तुम्ही उपस्थित झालात की, तो वॉरंट संपतो, ही नेहमीची प्रक्रिया आहे.


भाजपचा एकही उमेदवार निवडून आणून देणार नाही ! – जरांगे पाटील

मनोज जरांगे यांचे सरकारला १३ ऑगस्टपर्यंत मुदत देऊन उपोषण स्थगित

जालना – भाजपचा एकही उमेदवार निवडून येता कामा नये. फडणवीस यांनी मला आत टाकून मारण्याचे कारस्थान रचले होते, असे सांगून जरांगे पाटील यांनी महायुतीसह भाजप आणि भाजप नेते, उपमुख्यमंत्री यांना थेट आवाहन दिले. मराठा समाजाला ‘ओबीसी’तून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसलेले मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी २४ जुलै या दिवशी आपले उपोषण मागे घेतले. त्यानंतर ते बोलत होते. त्यांनी सरकारला त्यांच्या मागण्यांसाठी १३ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे.

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांनी २ महिन्यांचा वेळ मागितला होता, तो आम्ही देत आहोत. सरकार ‘आमरण उपोषणा’च्या शक्तीला आणि त्यांच्या सत्तेच्या आसंदीला घाबरतात. मी उपोषण न करता मतदारसंघाची सिद्धता करीन.