गुमला (झारखंड) – गेल्या २ सहस्र वर्षांत जगभरात वेगवेगळे प्रयोग केले गेले; पण ते भारताच्या पारंपरिक जीवनपद्धतीत रुजलेले आनंद आणि शांती देण्यात अयशस्वी ठरले. कोरोनानंतर जगाला कळले की, भारताकडे शांती आणि आनंद यांचा प्रशस्त मार्ग आहे, असे गौरवोेद्गार प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे काढले. ते ‘विकास भारती’ या संस्थेने आयोजित केलेल्या ग्रामस्तरीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते.
The world has started following the roadmap of happiness and peace provided by India after the Corona pandemic – H.H. Sarsanghchalak Mohanji Bhagwat.#SanatanDharma #RSSChiefMohanBhagwat #JharkhandNews pic.twitter.com/ScjJwk8T2k
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 19, 2024
सरसंघचालक पुढे म्हणाले की, सनातन संस्कृती आणि धर्म राजवाड्यांमधून आलेले नाहीत, तर आश्रम अन् जंगल यांतून आले आहेत. पालटत्या काळानुसार आपले कपडे पालटू शकतात; पण आपला स्वभाव कधीच पालटणार नाही. पालटत्या काळात आपले कार्य आणि सेवा चालू ठेवण्यासाठी आपल्याला नवीन मार्ग अन् पद्धती यांच्याशी जुळवून घेणे आवश्यक आहे. समाजाच्या हितासाठी सर्वांनी अविरतपणे काम केले पाहिजे.
विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया !
सरसंघचालक विकासाविषयी म्हणाले की, जेवढा विकास करण्याचा विचार केला होता, तेथे आपण पोचलो. तेथे पोचल्यावर दिसते की, यापुढेही बरेच काही करण्यासारखे आहे; पण ज्या माणसात माणुसकी नाही, त्याने आधी माणूस बनावे; पण काही लोक विकासाच्या निर्धारीत टप्प्यावर पोचल्यावर मानवाचे ‘सुपरमॅन’ बनू पहातात. ‘सुपरमॅन’ बनल्यावरही ते थांबत नाहीत, त्यांना वाटते आता पूजनीय बनायला हवे; पण पूजनीय म्हणतात ‘आमच्यापेक्षा देव मोठे’, तर देव म्हणतो ‘माझ्यापेक्षा विश्वरुप मोठे.’ आता विश्वरूपाच्या पुढेही काही आहे का?, हे कुणाला ठाऊक नाही. विकासाला काही अंत नाही. ही निरंतर चालत राहणारी प्रक्रिया आहे.