डोनाल्‍ड ट्रम्‍प यांना भगवान जगन्‍नाथाने वाचवले ! – इस्‍कॉन

वर्ष १९७६ मध्‍ये अमेरिकेतील पहिल्‍या जगन्‍नाथ रथयात्रेसाठी ट्रम्‍प यांनीच केले होते मोठे साहाय्‍य !

अमेरिकेचे माजी राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प

कोलकाता (बंगाल) – अमेरिकेचे माजी राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प यांच्‍यावर पेनसिल्‍व्‍हेनिया येथे झालेल्‍या जीवघेण्‍या आक्रमणावर सर्वत्र संताप व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे. अशातच ‘इस्‍कॉन’ या आध्‍यात्मिक संस्‍थेचे उपाध्‍यक्ष आणि प्रवक्‍ते राधारमण दास यांनी ट्रम्‍प हे आज केवळ भगवान जगन्‍नाथ यांच्‍या कृपेनेच वाचले, असे वक्‍तव्‍य केले आहे. यासाठी त्‍यांनी ४८ वर्षांपूर्वीचा एक दैवी प्रसंग वर्णिला.

‘एक्‍स’वरून पोस्‍ट करतांना इस्‍कॉनचे दास यांनी सांगितले की,

१. वर्ष १९७६ मध्‍ये न्‍यूयॉर्कमध्‍ये रथयात्रा आयोजित करण्‍यात भगवान श्रीकृष्‍णाच्‍या अनुयायांना डोनाल्‍ड ट्रम्‍प यांनीच साहाय्‍य केले होते. त्‍यांच्‍या साहाय्‍यानेच रथ उभारता आला. आज भगवान जगन्‍नाथाने या साहाय्‍याची परतफेड करत ट्रम्‍प यांना जीवनदान दिले.

२. सध्‍या पुरी येथे जगन्‍नाथ रथयात्रा उत्‍सव चालू असून अमेरिकेत ही घटना घडली. त्‍यांचा प्राण वाचला, हा निश्‍चित दैवी हस्‍तक्षेप आहे, असे मी मानतो.

३. वर्ष १९७६ मध्‍ये इस्‍कॉनच्‍या दहाव्‍या वर्धापनदिनानिमित्त न्‍यूयॉर्क शहरातील प्रतिष्‍ठित मॅनहॅटन भागात प्रथमच जगन्‍नाथ रथयात्रा आयोजित करण्‍याची सिद्धता केली जात होती. तथापि अनेक आव्‍हाने होती. येथील ‘फिफ्‍थ व्‍हेन्‍यू’ मार्ग वापरण्‍याची अधिकृत अनुमती मिळाली होती.

४. असे असले, तरी प्रचंड लाकडी रथ बांधण्‍यासाठी मोकळी जागा मिळणे आवश्‍यक होते. अनेक आस्‍थापने त्‍यांच्‍याकडील अशी जागा देण्‍यास कचरत होत्‍या. त्‍यांना इतर गोष्‍टींसह संभाव्‍य कायदेशीर समस्‍यांविषयी काळजी वाटत होती. परिसरातील रेल्‍वेमार्ग परिसरातील जागा मिळण्‍यासाठी पुष्‍कळ प्रयत्न झाले; परंतु तो मिळू शकला नाही. काही दिवसांनी समजले की, तेथील मोठा परिसर ३० वर्षीय उद्योगपती डोनाल्‍ड ट्रम्‍प यांच्‍या आस्‍थापनाने विकत घेतला आहे. कृष्‍णभक्‍तांनी ट्रम्‍प यांच्‍याकडे हा भाग मिळण्‍याची विनंती केली. ‘विनंती मान्‍य होणार नाही’, असे ट्रम्‍प यांच्‍या आस्‍थापनातील वरिष्‍ठ अधिकारी म्‍हणत होते; परंतु ट्रम्‍प यांनी भक्‍तांनी आणलेला श्रीकृष्‍णाचा प्रसाद ग्रहण केला आणि त्‍यांच्‍या मागणीपत्रावर स्‍वाक्षरी करून त्‍यास अनुमोदन दिले. सर्वत्र आश्‍चर्य व्‍यक्‍त केले गेले.

५. सरतेशेवटी रथयात्रा जाण्‍यासाठी अनुमती मिळवण्‍यासाठी कृष्‍णभक्‍तांनी मॅनहॅटनच्‍या पोलीस प्रमुखांना एक विशेष विनंती सादर केला. ‘त्‍याच्‍याकडून अर्ज कसा स्‍वीकारला जाईल ?’, हे कुणालाच ठाऊक नव्‍हते. मात्र सखोल तपासणी केल्‍यानंतर वरिष्‍ठ अधिकार्‍याने हसून कागदपत्रांवर स्‍वाक्षरी केली. ‘मी हे का करत आहे, हे मला कळत नाही’, असे म्‍हणत त्‍याने स्‍वाक्षरी केली. हा प्रसंग सांगतांना राधारमण दास यांनी ईश्‍वरी कृपा कशी असते, हे सुरेखपणे वर्णन करून सांगितले.