Donald Trump Assassination Attempt : गोळीबारात डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले !

  • उजव्या कानाला घासून गेली गोळी !

  • अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश, जगभरात नाचक्की !

  • २० वर्षीय आक्रमणकार्‍याला सुरक्षारक्षकांनी ठार मारले !

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या जीवघेण्या आक्रमणात ते थोडक्यात बचावले. पेनसिल्व्हेनिया येथे एका प्रचारसभेेला संबोधित करतांना त्यांच्यावर एकाने गोळी झाडली. ती ट्रम्प यांच्या कानाला घासून गेली. या आक्रमणात ट्रम्प किरकोळ घायाळ झाले असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. पेनसिल्व्हेनिया येथील बेथेल पार्क या भागातील रहिवासी असलेला २० वर्षीय  थॉमस मॅथ्यू क्रुक्स या तरुणाने १२० मीटर अंतरावरून ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला. ट्रम्प यांच्या दिशेने आक्रमणकर्त्याने झाडलेली गोळी अवघ्या २ सेंटीमीटरने चुकली, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. ही घटना अमेरिकी वेळेनुसार १३ जुलैला सायंकाळी घडली. या घटनेमुळे अमेरिकेची जगभरात नाचक्की झाली आहे.

१. या आक्रमणामुळे अमेरिकेची गुप्तचर संस्था अपयशी ठरल्याचे सांगण्यात येत आहे. गुप्तचर यंत्रणेला या घटनेविषयी कुठलीही पूर्वकल्पना नव्हती.

२. आक्रमण झाल्यानंतर ‘सिक्रेट सर्व्हिस’चे कमांडो ट्रम्प यांच्या दिशेने धावले आणि त्यांनी ट्रम्प यांना सर्व बाजूंनी घेरले. एका मिनिटात ट्रम्प उठून उभे राहिले आणि त्यांनी हाताची मूठ आवळत त्यांच्या समर्थकांना ‘लढा, लढा, लढा !’, असे आवाहन केले.

३. ‘यू.एस्. सिक्रेट सर्व्हिस’च्या एका कमांडोने आक्रमणकार्‍याच्या डोक्यात गोळी झाडली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यावर २०० मीटर अंतरावरून गोळी झाडण्यात आली.

४. टम्प ज्या ठिकाणावरून भाषण करत होते, त्याच्या १२० मीटरवर एक कारखाना आहे. त्याच्या गच्चीवर आक्रमणर्ता थॉमस मॅथ्यू क्रुक्स हा दडून बसला होता.

५. ज्या इमारतीवर आक्रमणकार्‍याचा मृतदेह सापडला, ती ‘ए.जी.आर्. इंटरनॅशनल’ आस्थापनाची असून या आस्थापनात काच आणि प्लास्टिक यांपासून बनवणार्‍या वस्तूंचे उत्पादन होते.

६. अमेरिकेत एका माजी राष्ट्राध्यक्षावर अशा प्रकारचा गोळीबार ४ दशकांनी झाला आहे. याआधी वर्ष १९८१ मध्ये रोनाल्ड रीगन यांची अशा प्रकारेच हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता.

७. अमेरिकी नियमांनुसार माजी राष्ट्राध्यक्षांना आजीवन संरक्षण पुरवले जाते.

मारेकर्‍याला होता ट्रम्प यांचा तिटकारा !

मारेकरी क्रुक्स याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात तो ‘मी रिपब्लिकन्स आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा तिटकारा अन् द्वेष करतो’, असे म्हणत असल्याचे दिसत आहे. यामुळेच त्याने आक्रमण केले असावे, असे सांगण्यात येत आहे. या आक्रमणामागे अजून कुणी ‘मास्टरमाईंड’ आहे का ?, याचा शोध घेण्यात येत आहे.

‘ट्रम्प यांना रोखणे’, हेच डेमोक्रॅटिक पक्षाचे निवडणूक धोरण असल्याने त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला ! – रिपब्लिकन पक्षाचे नेते

आक्रमणानंतर रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी थेट राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर टीका केली. ‘ट्रम्प यांना कोणत्याही परिस्थितीत राष्ट्राध्यक्ष होण्यापासून रोखले गेले पाहिजे’, हे डेमोक्रॅटिक पक्षाचे केंद्रीय धोरण असल्याने त्यांच्यावर आक्रमण झाले, असा आरोप रिपब्लिकन पक्षाच्या अनेक नेत्यांनी केला.

भारत आणि इस्रायलकडून निषेध !

१. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन : अमेरिकेत अशा प्रकारच्या हिंसाचाराला स्थान नाही. आपण एक देश म्हणून संघटित होऊन या घटनेचा निषेध केला पाहिजे. या आक्रमणाकडे सरकार अत्यंत गांभीर्याने पहात आहे.

२. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी : माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या आक्रमणामुळे मला पुष्कळ काळजी वाटली. मी या आक्रमणाचा निषेध करतो.

लोकशाही आणि राजकारण यांमध्ये अशा प्रकारच्या हिंसाचाराला कोणतेही स्थान नाही.

३. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू : आम्हाला या घटनेवरून धक्का बसला आहे. ट्रम्प हे लवकर बरे व्हावेत, अशी मी आशा करतो.

संपादकीय भूमिका 

एरव्ही भारतातील लोकशाही धोक्यात असल्याची आवई उठवणार्‍या अमेरिकेने आधी स्वतःच्या देशातील लोकशाही किती असुरक्षित आहे, हे जाणावे !