काही दिवसांपूर्वी ‘ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पा’मध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांनी वाघिणीला जिप्सी वाहने लावून चारही बाजूंनी घेरले होते. पुष्कळ पर्यटकांसह जाणार्या जिप्सी वाहनांच्या गराड्यात वाघीण सापडल्याने तिला वावरणे अवघड जात असल्याची छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्याचे दिसले. अशा घटनांचे प्रमाण गेल्या काही मासांत वाढत आहे. पर्यटकांच्या अतीउत्साहामुळे घडणार्या अशा प्रकारच्या घटना प्राण्यांसह माणसांसाठीही धोकादायक आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्यासाठी येणार्यांची संख्या पुष्कळ आहे. या प्रकल्पामुळे महसूलही मोठ्या प्रमाणात प्राप्त होतो; परंतु वाघाला घेरण्यासारखे प्रकार पर्यटकांसाठी जीवघेणे ठरू शकतात, याचे भान राखणे आवश्यक आहे. वाघीण चवताळली आणि तिने आक्रमण केले असते, तर ते पर्यटकांसाठी जीवघेणेच ठरले असते. सुदैवाने या घटनेत तसे काही झाले नाही. प्रसारमाध्यमांतून हे प्रकरण समोर आल्यानंतर प्रशासन जागे झाले. या प्रकरणात १० जिप्सी वाहनांचे चालक आणि ‘गाईड’ (मार्गदर्शक) यांना एक मासाकरता निलंबित करण्यात आले.
मनुष्याकडून विकासाच्या नावाखाली नैसर्गिक साधनसंपत्तीवर आक्रमण होऊन त्यावर अधिकार गाजवला जात असल्याने नैसर्गिकतेचा र्हास होत आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघिणीला घेरण्याच्या घटना, म्हणजे प्राण्यांच्या उरल्या-सुरल्या निवासात जाऊनही त्यांना त्रास देऊन वेठीस धरण्यासारखे आहे. प्रचंड लोकसंख्यावाढीमुळे सध्या गावांचे शहरीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. जंगले नष्ट करून त्याचे रूपांतर शहरांत होत आहे. त्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्ती असलेली जंगले नष्ट होऊन ‘सिमेंट काँक्रीटची जंगले’ उभी रहात आहेत. साहजिकच त्यामुळे प्राण्यांच्या निवार्यावर आक्रमण होत असल्याने जंगली प्राणी मनुष्यवस्तीत येण्याच्या घटना वाढत आहेत. बहुतांश वेळा वाघ, बिबट्या, गवे इत्यादी हिंस्र प्राणी शहरात वावरण्यात आल्याच्या आणि काही वेळा तर त्यांनी आक्रमण करून त्यात एखाद्याला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्वांना अप्रत्यक्षपणे मानवच कारणीभूत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आज पशू अभयारण्ये अथवा निसर्गरम्य ठिकाणी असणारे माकड, हत्ती इत्यादी प्राण्यांनी पर्यटकांवर आक्रमणे केल्याने पर्यटक घायाळ झाल्याच्या घटनाही घडतात, तसेच यांसारख्या घटनांमुळे असुरक्षिततेची भावना निर्माण होऊन प्राणी अधिक आक्रमक होऊन धोकादायक बनतात. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मनुष्याने अतीउत्साहापोटी, हौसेपोटी अथवा मौजमजा करण्याच्या नादात पशू-पक्ष्यांना त्रास होईल असे वागणे टाळून ‘माणसा’प्रमाणे रहाणे, हाच सूज्ञपणा आहे !
– श्री. संदेश नाणोसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.