१. ‘एप्रिल २०२३ मध्ये माझ्या उजव्या डोळ्यातील मोतीबिंदूचे शस्त्रकर्म झाले. त्या वेळी नेत्ररोग तज्ञांनी मला सांगितले होते, ‘‘तुम्हाला मधुमेहाचा त्रास असल्यामुळे शस्त्रकर्मानंतर १५ दिवसांनी तुमच्या डोळ्यात एक इंजेक्शन द्यावे लागेल.’’ पुढे १५ दिवसांनंतर मला त्या नेत्ररोग तज्ञांकडे जाण्यास अडचण येत होती; म्हणून मी गोव्यातील दुसर्या एका नेत्ररोग तज्ञांची भेट घेतली. त्या वेळी तपासणी केल्यावर त्यांनी मला इंजेक्शनची आवश्यकता नसल्याचे सांगितले आणि ३ मास डोळ्यांत घालण्यासाठी २ – ३ प्रकारची औषधे दिली. या संदर्भात मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नामजपादी उपाय विचारले. तेव्हा त्यांनी मला ‘महाशून्य’ हा नामजप प्रतिदिन २ घंटे करण्यास सांगितला. तो जप मी नियमित करत होते. त्यानंतर ३ मासांनी मी तपासणीला गेल्यावर नेत्ररोग तज्ञांनी संगितले, ‘‘तुमची दृष्टी (Vision) पुष्कळ चांगली आहे आणि इंजेक्शनची आवश्यकता नाही.’’
२. माझ्या डाव्या डोळ्यातील मोतीबिंदूचे शस्त्रकर्म २ वर्षांपूर्वी झाले होते. ‘त्या डोळ्याने मला थोडे अंधुक दिसत आहे’, हे दुसर्या डोळ्याची तपासणी करतांना नेत्ररोग तज्ञांच्या लक्षात आले. यंत्राद्वारे पूर्ण तपासणी केल्यावर बुबुळावर पातळ पडदा आल्याचे त्यांना कळले. नेत्ररोग तज्ञांनी तो पडदा यंत्राद्वारे काढून टाकला; पण मला मधुमेहाचा त्रास असल्यामुळे आणि त्या डोळ्याचे आधीच शस्त्रकर्म झाल्यामुळे तो पडदा पूर्णपणे दूर झाला नाही. नेत्ररोग तज्ञांनी मला दीड मास डोळ्यांत घालण्यासाठी २ – ३ औषधे दिली आणि पुन्हा येण्यास सांगितले. या वेळीही मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना त्रासाविषयी सांगितल्यावर त्यांनी मला ‘महाशून्य’ आणि ‘निर्गुण’ हे २ नामजप करायला सांगितले. मी ते दोन्ही नामजप दीड मास केले. या वेळी नेत्ररोग तज्ञांनी तपासणीनंतर सांगितले, ‘‘तुमचा दृष्टीदोष ९९ टक्के दूर झाला आहे आणि यापुढे डोळ्यांचा काही त्रास होण्याची शक्यता नाही.’’ त्या वेळी मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.
‘खरोखर सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेमुळे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्याकडून आम्हा साधकांना रोगनिवारणासाठी नामजपादी उपाय मिळतात आणि विकार बरे होण्यासाठी त्यांचा लाभही होत आहे’, याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्रीमती सुनीता चितळे (वय ७१ वर्षे), फोंडा, गोवा. (२७.१.२०२४)