‘साधकत्ववृद्धी शिबिरा’च्या वेळी साधिकांना आलेल्या अनुभूती !

‘१९.१.२०२४ ते २१.१.२०२४ या कालावधीत झालेल्या ‘साधकत्ववृद्धी शिबिरा’साठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर साधिकांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. सौ. ज्योती कुलकर्णी (वय ६५ वर्षे), चिंचवड, पुणे.

सौ. ज्योती कुलकर्णी

अ. ‘आश्रमात प्रवेश करतांना सर्वत्र चैतन्यच चैतन्य आहे’, असे मला जाणवत होते.

आ. आश्रमात प्रवेश करण्याच्या क्षणापासून स्वतःमध्ये एक प्रकारची अंतर्मुखता अनुभवता आली.

इ. माझा नामजप आतूनच सतत होत होता.

ई. प्रवेशद्वारासमोरील यज्ञमंडपात कोणताही यज्ञ चालू नसूनही मला त्या ठिकाणी पुष्कळ शक्ती आणि चैतन्य जाणवत होते.

उ. श्री भवानीमातेचे दर्शन घेत असतांना ‘ती पुष्कळ प्रसन्न असून डोळे उघडून आम्हा सर्वांकडे वात्सल्यभावाने पहात आहे’, असे मला वाटत होते.

ऊ. मी ध्यानमंदिरात बसून नामजप करत असतांना माझे मन पूर्ण निर्विचार आणि शांत झाले. माझा नामजप एकाग्रतेने आणि भावपूर्ण झाला. मला शांतीची अनुभूती आली.’ (२१.१.२०२४)

सौ. सारिका स. मुदकुडे

२. सौ. सारिका स. मुदकुडे, सिंहगड रस्ता, पुणे.

२ अ. गाडीतून आश्रमाकडे येत असतांना साधिकेला उत्कंठा आणि कृतज्ञता वाटणे

‘गाडीतून आश्रमाकडे येत असतांना जसजसा आश्रम जवळ येत होता, तसतशी माझी उत्कंठा वाढत होती. आश्रमाजवळची झाडे, वेली आणि निसर्ग यांच्याकडे पाहून मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. ‘हे किती भाग्यवान आहेत ! सर्वजण साक्षात् नारायणाच्या सान्निध्यात रहात आहेत’, असे वाटत होते.

२ आ. आश्रमात आल्यावर साधिकेला चैतन्य मिळून तिचा नामजप सतत चालू होणे

आश्रमात आल्यावर ‘मी चैतन्याच्या प्रचंड स्रोतात आले आहे’, असे वाटून मला प्रवासामुळे आलेला थकवा आणि आवरण एका क्षणात नाहीसे झाले. मला अंतरंगात आनंद जाणवून हलकेपणा अनुभवता आला. ही स्थिती रात्रभर होती. ‘झोपेतही माझा नामजप चालू आहे’, असे मला जाणवत होते. ‘या चैतन्यापासून एक क्षणही वंचित रहायला नको’, असे मला वाटले.

२ इ. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात गेल्यावर साधिकेवर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होणे

आश्रम बघत असतांना दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात गेल्यावर माझे डोके जड झाले आणि थोडी अस्वस्थता वाटली. तेव्हा ‘माझे सर्व त्रास नष्ट होत आहेत’, असे मला वाटले.

२ ई. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या ठिकाणी साधिकेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन होणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या उपायांच्या वेळी त्यांचे दर्शन झाले. तेव्हा ‘प्रत्यक्ष गुरुमाऊलीच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आहेत’, असे वाटून कृतज्ञता व्यक्त झाली. उपायांच्या वेळी आरंभी धडधडल्यासारखे झाले आणि नंतर हलकेपणा वाटला.’ (२०.१.२०२४)

सौ. मोहिनी मांढरे

३. सौ. मोहिनी मांढरे (वय ५९ वर्षे), कळंबोली, रायगड.

३ अ. साधिकेला शिबिरात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणांचे दर्शन होणे

‘मी शिबिराच्या आरंभापासूनच ‘शिबिराचे सभागृह म्हणजे गुरुचरण आहेत’, असा भाव ठेवला होता. शिबिरात मला अनेक वेळा गुरुमाऊलींच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणांचे दर्शन होत होते.

३ आ. साधिकेला तिच्या शरिरावर दिसलेल्या दैवी कणांच्या माध्यमातून श्रीकृष्णाचे सूक्ष्मातील अस्तित्व जाणवणे

‘श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र सभागृहात फिरत आहे आणि त्यातून चैतन्याचे कण पसरत आहेत’, असे मला दिसले. त्या वेळी शेजारी बसलेल्या एक साधिका मला म्हणाल्या, ‘‘तुमच्या चेहर्‍यावर दैवी कण आहे.’’ मी माझ्या हाताकडे पाहिले. तेव्हा माझ्या हातावरही ५ – ६ दैवी कण दिसले. तेव्हा ‘श्रीकृष्णाने सूक्ष्मातून त्याचे अस्तित्व दर्शवले’, असे वाटून माझी भावजागृती झाली.

३ इ. शिबिराच्या वेळी साधिकेला ‘सर्व जण वेगळ्याच दैवी लोकात बसले आहेत’, असे जाणवणे

शिबिरात जसे विषय पुढे पुढे जात होते, तसे माझे शरीर आणि मन हलके होत गेले. ‘माझ्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय झाले’, असे मी अनुभवले. हे अनुभवत असतांना मला व्यासपिठासह सर्व वक्ते आणि साधक सभागृहात असूनही सर्वत्र पाण्याच्या लहरी पसरतांना दिसल्या आणि सुगंध आला. ‘हे विश्व वेगळे आहे. आम्ही सर्व वेगळ्याच दैवी लोकात बसलो आहोत’, असे मला जाणवले. हे दृश्य आणि त्यातील आनंद मी १० मिनिटे अनुभवत होते.

‘हे गुरुदेवा, तुम्ही सर्वांना चैतन्य आणि शक्ती देत आहात. मला वरील अनुभूती दिल्याबद्दल कोटीशः कृतज्ञ आहे.’ (२०.१.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • दैवी कण : सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्‍या या कणांचे ‘भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असल्याचे सिद्ध झाले. या घटकांच्या मूलद्रव्यांच्या प्रमाणावरून शोधलेले त्यांचे ‘फॉर्म्युले’ सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कणांच्या ‘फॉर्म्युल्या’शी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना ‘दैवी कण’ असे संबोधतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक