१९ डिसेंबरपर्यंत गोवा १०० टक्के साक्षरता असलेले राज्य करण्याचे ध्येय ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, ५ जुलै (वार्ता.) – १९ डिसेंबर २०२४ पर्यंत गोवा राज्य १०० टक्के साक्षर झाले, असे घोषित करण्याचे गोवा सरकारचे ध्येय आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

याविषयी ते म्हणाले, ‘‘या मोहिमेअंतर्गत गोवा राज्यात २ टक्के निरक्षर लोकांना साक्षर करण्याचे प्रयत्न चालू आहेत. सध्या राज्याची साक्षरतेची टक्केवारी ९८ टक्के आहे. केपे, काणकोण आणि सांगे हे तालुके वगळता गोवा राज्यात इतरत्र असलेल्या निरक्षर लोकांच्या संख्येविषयी माहिती मिळाली असून या लोकांना साक्षर करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. आतापर्यंत ३ सहस्र ज्येष्ठ नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्यापैकी ७०० जणांनी पात्रता परीक्षा दिली आहे. उर्वरीत २ सहस्र ७०० जण १४ जुलै २०२४ या दिवशी नियोजित ठिकाणी पात्रता परीक्षा देणार आहेत. केपे, काणकोण आणि सांगे या ३ तालुक्यांतील निरक्षर लोकांची संख्या २ ऑक्टोबर २०२४ पर्यंत निश्चित केली जाणार असून त्या लोकांना प्रशिक्षण देऊन ३० नोव्हेंबर २०२४ या दिवशी त्यांची पात्रता परीक्षा घेतली जाईल. या तालुक्यांतील साक्षरता मोहिमेत भाग घेऊ इच्छिणार्‍या युवकांनी शिक्षण खात्याकडे संपर्क साधावा. त्यांना यासाठी योग्य मानधन देण्यात येईल.’’ सध्या भारतात १०० टक्के साक्षरता असलेले केरळ हे एकमेव राज्य आहे.

संपादकीय भूमिका 

  • राज्यातील जनता केवळ साक्षर नको, तर सुसंस्कारित होण्यासाठी संस्कारांचे आणि नीतमूल्यांचे शिक्षण देणे आवश्यक !
  • आपल्या आधीची पिढी साक्षर नसली, तरी सुसंस्कारित होती. त्यामुळे सामाजिक अपप्रकार अत्यंत अल्प होते !