परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांची घेतली भेट !
अस्ताना (कझाकिस्तान) – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी रशिया-युक्रेन संघर्ष क्षेत्रात अडकलेल्या भारतियांचे सूत्र उपस्थित केले. ‘जोपर्यंत आमचे सर्व लोक परत येत नाहीत, तोपर्यंत हा प्रश्न सोडवत रहाण्याचा माझा मानस आहे,’ असे जयशंकर यांनी पत्रकारांना माहिती देतांना सांगितले.
याविषयी जयशंकर पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, द्वीपक्षीय चर्चेच्या वेळी मी हे सूत्र अतिशय स्पष्टपणे आणि जोरदारपणे मांडले. रशियाच्या सैन्यात अनेक भारतीय तैनात करण्यात आले आहेत. ते परत आल्यावरच आम्हाला संपूर्ण सत्य समजेल; पण परिस्थिती कशीही असली, तरी इतर देशाच्या सैन्यात आमचे लोक तैनात असून ते युद्धक्षेत्रात कार्यरत आहेत, हे आम्ही मान्य करू शकत नाही. मी त्यांना सांगितले की, आम्हाला रशियाचे सहकार्य हवे आहे आणि तो आमचा मित्र आणि भागीदार आहे. आम्हाला एक मार्ग शोधावा लागेल जेणेकरून आमचे लोक शक्य तितक्या लवकर आणि प्रभावीपणे भारतात परत येतील.