वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनाचा चौथा दिवस (२७ जून) : राष्ट्र, धर्म, संस्कृती रक्षणाचे प्रयत्न कसे करावेत ?

हिंदुत्वनिष्ठांनी ‘डिजिटल’ योद्धे बनले पाहिजे ! – स्वप्नील सावरकर, संपादक, हिंदुस्थान पोस्ट (डिजिटल मीडिया हाऊस), मुंबई, महाराष्ट्र

(डिजिटल योद्धा म्हणजे सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे होणारे वैचारिक आक्रमण रोखणारी व्यक्ती)

श्री. स्वप्नील सावरकर

विद्याधिराज सभागृह : माध्यमांमध्ये हिंदुत्वाविषयी नकारात्मकता आहे. आज ‘डिजिटल’ युग आहे. आपण या ‘डिजिटल’ युगाच्या नव्या क्रांतीत सहभागी होण्यासाठी सिद्ध आहोत का ? वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवासारख्या मोठ्या कार्यक्रमाला मुख्य प्रवाहातील माध्यमे प्रसिद्धी देत नाहीत. प्रसारमाध्यमांना कसे ‘मॅनेज’ केले जाते, हे लक्षात घेतले पाहिजे. हिंदुत्वनिष्ठांनी ‘डिजिटल’ योद्धे बनले पाहिजे. भ्रमणभाष हे आपले आजच्या काळातील दुहेरी शस्त्र आहे. ते कसे वापरायचे ? हे शिकून घेतले पाहिजे. आज स्वातंत्र्यवीर सावरकर असते, तर त्यांनी हेच सांगितले असते. हिंदु राष्ट्र आपली पुढची पिढी आणू शकेल, त्यामुळे तिला तिच्या भाषेत समजेल, अशी सामुग्री आपण निर्माण केली पाहिजे. ‘राष्ट्र प्रथम’ हा विचार घेऊन काम करणारे ३० सेकंदाचे ‘रील्स’ (लहान व्हिडिओ) बनवावे लागतील. माध्यमांना अशा प्रकारे सिद्ध केलेली बातमी द्यायला हवी, अशी उपायोजनात्मक सूत्रे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे श्री. स्वप्नील सावरकर यांनी मांडली. वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या चौथ्या म्हणजे २७ जून या दिवशीच्या ‘राष्ट्र, धर्म, संस्कृती रक्षणाचे प्रयत्न कसे करावेत ?’ या सत्रात ‘हिंदु संघटनांना प्रभावी मीडिया व्यवस्थापनाची आवश्यकता’ या विषयावर ते बोलत होते.

सावरकर पुढे म्हणाले की, हिंदुत्वनिष्ठ पाठ्यक्रम असलेले पत्रकारितेचे शिक्षण सिद्ध करायला हवे. हिंदुत्वनिष्ठ शिक्षण देणार्‍या संस्था काढायला हव्यात. १० ते १५ वर्षे आपण आपल्या राष्ट्रासाठी माध्यमांवर कष्ट घेतले, तर पुढे हिंदुत्वाला पूरक माध्यमे असतील. आज हिंदू वाघ आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत; परंतु त्यांनी एकत्र आले पाहिजे. सध्याची साम्यवादी विचारसरणी असलेली माध्यमे पालटण्यासाठी सत्तेत असणार्‍यांनी दबाव टाकला पाहिजे आणि तसा दबाव टाकला जाण्यासाठी आपण आपली माध्यमे शक्तीशाली बनवली पाहिजेत.